आरसपानी

📖 About Araspani आरसपानी — मनाच्या ओलाव्यातून उमटलेले शब्द. (Araspani – Words born from the quiet drizzle of thought.) लेखक: डॉ. राजेश कापसे ✨ अनुभव, विचार आणि जीवनातील छोट्या क्षणांची गोष्ट. 🌐 www.rajeshkapsebooks.com 📸 Instagram: @rajubhai_bams

About Araspani / आरसपानी विषयी

📖 About Araspani आरसपानी — मनाच्या ओलाव्यातून उमटलेले शब्द. (Araspani – Words born from the quiet drizzle of thought.) लेखक: डॉ. राजेश कापसे ✨ अनुभव, विचार आणि जीवनातील छोट्या क्षणांची गोष्ट. 🌐 www.rajeshkapsebooks.com 📸 Instagram: @rajubhai_bams

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

जर आयुष्य पाच वर्षं फास्ट फॉरवर्ड करता आलं तर…

आज हॉस्पिटलची सगळी धावपळ संपली. दिवसभरातल्या काही अडचणी, नको असलेले फोन कॉल, काही प्रॉब्लेम्स, काही कटकटी… हे सगळं आता रोजच्या आयुष्याचा इतका अविभाज्य भाग झालंय की, त्रास होतोय हे जाणवायलाही कधी कधी वेळ मिळत नाही.

हॉस्पिटलमधून निघालो आणि खांदेश्वर स्टेशनवर लोकल पकडली. लोकलच्या खिडकीतून बाहेर बघत होतो. बाहेरची माणसं धावत होती, गाड्या धावत होत्या, स्टेशनं मागे पडत होती… आणि त्या सगळ्या धावपळीच्या मध्ये अचानक मनात एक विचार आला—

कंटाळा आलाय आता या नोकरीचा…
दररोजचे नऊ तास, चार तासांचं ट्रॅव्हलिंग आणि ही सततची पळापळ.

सकाळी घरातून निघताना घड्याळाशी सुरू होणारी शर्यत, दिवसभर कामाच्या जबाबदाऱ्या, सतत वाजणारा फोन, न संपणाऱ्या अडचणी आणि संध्याकाळी थकून घरी परतताना उरलेली शक्तीही कुठेतरी रस्त्यातच संपून गेलेली…

क्षणभर वाटलं—

आयुष्य जर पटकन पाच वर्षं फास्ट फॉरवर्ड करता आलं तर किती बरं होईल!

त्या एका विचाराने मनातले सगळे त्रास, फ्रस्ट्रेशन आणि कटकटीचे विचार क्षणभर दूर झाले. जणू कोणीतरी वर्तमानाच्या गोंगाटावर हलकंसं शांततेचं झाकण ठेवलं.

पाच वर्षांनी कदाचित नोकरीतून मोकळा झालो असेन. सकाळी उठण्यासाठी अलार्मची गरज नसेल. कुठे पोहोचायचं आहे, कोणाला उत्तर द्यायचं आहे, कोणता फोन उचलायचा आहे, याची घाई नसेल.

वेळच वेळ असेल.

मालवणच्या घरी निवांत आठवडाभर राहता येईल. तिथल्या निसर्गात मनसोक्त फिरता येईल. सकाळचा चहा घाईघाईने संपवण्याऐवजी त्याचा प्रत्येक घोट अनुभवता येईल. घराच्या अंगणात बसून छान बासरी वाजवत दिवस घालवता येईल. आज ज्या क्षणांसाठी मन आतुर होतं, ते क्षण तेव्हा हाताशी असतील.

मोठ्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल. तो कामाला लागलेला असेल. छोट्या मुलाची बारावी झालेली असेल आणि तो पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजमध्ये गेलेला असेल. आज त्यांच्या भविष्यासाठी धावताना जे वर्तमान हातातून निसटतंय, तेव्हा कदाचित त्यांच्यासोबत निवांत बसता येईल.

मग कधीतरी दादरला सकाळी उशिरा उठून प्रकाशमध्ये जावं. आवडते वांगी-पोहे आणि साबुदाणा वडा निवांत खावेत. कुठलीही घाई नसावी. घड्याळाकडे पाहण्याची गरज नसावी. गप्पा मारत, चवीने खात अकरा वाजता तिथून बाहेर पडावं.

मग मनीज मध्ये जाऊन निवांतपणे एक छानसा चहा प्यावा. आज ज्या चहासाठी वेळ काढावा लागतो, तो तेव्हा वेळ घालवण्याचं निमित्त असेल.

शिवाजी पार्कला दुपारपर्यंत निवांत राउंड मारावा. पावलांना घाई नसावी, मनाला कुठलीही चिंता नसावी. मग आस्वादमध्ये जाऊन आवडतं पिठलं-भाकरी, भात मनसोक्त खावं.

घरी परतल्यावर दुपारची आवडती एक-दोन तासांची निवांत झोप घ्यावी. अशी झोप, जिच्या आधी मनात उद्याच्या कामांची यादी नसेल आणि उठल्यावर लगेच फोन तपासण्याची घाई नसेल.

संध्याकाळी बासरीचा रियाज.

ज्याला आत्ताच्या धावपळीच्या आयुष्यात वेळच मिळत नाही, तो दोन-तीन तासांचा निवांत रियाज… फक्त बासरी आणि आपण. स्वरांमध्ये हरवून जाणं. बाहेरचं जग काही काळ विसरणं. आज मनात असलेली अनेक गाणी वेळेअभावी ओठांवर येत नाहीत; तेव्हा ती बासरीतून अलगद उमटतील.

आणि संध्याकाळ झाली की वरळी सीफेसवर जाऊन समुद्रासमोर बायकोसोबत निवांत बसावं. काही बोलायची गरज नसावी. दिवसभराच्या थकव्याची कारणं सांगायची गरज नसावी. फक्त समोर समुद्र असावा, कानात लाटांचा आवाज असावा आणि सोबत आपली माणसं असावीत.

आज एकमेकांसाठी वेळ काढताना जी धावपळ होते, ती तेव्हा नसेल. एकत्र बसणं ही एखादी दुर्मीळ संधी नसेल; तेच रोजच्या आयुष्याचं साधं, सुंदर वास्तव असेल.

कधीतरी सकाळी उठून तिला गाडीतून पोदारला सोडायला जावं. तिथे बाय-बाय करून निवांत घरी परतावं. परतीच्या रस्त्यावर कुठे जायची घाई नसेल. मनात फक्त तिच्यासोबत घालवलेल्या त्या छोट्याशा वेळाची ऊब असेल.

आईसोबत जो वेळ कधीच घालवता आला नाही, त्या गप्पा मारता याव्यात. तिच्याजवळ निवांत बसता यावं. तिच्या जुन्या आठवणी ऐकता याव्यात. आज कामाच्या, प्रवासाच्या आणि जबाबदाऱ्यांच्या गर्दीत हरवलेले तिचे कितीतरी शब्द तेव्हा शांतपणे ऐकता येतील.

आणि कधीतरी अचानक गाडी काढून बहिणींकडे नाशिकला, ठाण्याला किंवा पुण्याला जावं. दोन-तीन दिवस त्यांच्या घरी राहावं. भरपूर गप्पा माराव्यात. जुन्या आठवणी काढाव्यात. मनसोक्त हसावं. भेटण्यासाठी तारीख, वेळ आणि सुट्टी जुळवण्याची गरज नसावी. नात्यांना वेळ देण्यासाठी वेळ मागावा लागू नये.

कदाचित आयुष्य खरंच बदललेलं असेल.

एखाद्या नवीन पुस्तकाचा विषय सुचेल. त्या पुस्तकावर निवांतपणे काम करता येईल. एखाद्या आवडत्या विषयाचा अभ्यास करता येईल. त्यावर सुंदर लेख लिहिता येईल आणि एखाद्या वर्तमानपत्राला तो देता येईल.

आज मनात येणारे कितीतरी विचार कामाच्या गडबडीत अर्धवट राहतात. कितीतरी कल्पना फोनच्या नोट्समध्ये बंदिस्त होतात. कितीतरी लेख लिहायचे राहून जातात. तेव्हा कदाचित त्या सगळ्यांना आकार देता येईल.

किती मस्त आयुष्य असेल ना?

जिथे दिवस संपत नाहीत, तर निवांत उलगडत जातात. जिथे वेळ पाठलाग करत नाही, तर सोबत चालतो. जिथे जगणं म्हणजे फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करणं नसतं, तर प्रत्येक क्षण अनुभवणं असतं.

जर आयुष्य पाच वर्षांनी पटकन फास्ट फॉरवर्ड झालं तर…

पण मग एक विचार मनात येतो—

कदाचित मला पाच वर्षं पुढे जायची गरजच नाही.

कदाचित त्या भविष्यातल्या निवांत आयुष्याची पूर्ण वाट पाहण्याची गरज नाही. कदाचित त्या आयुष्याचे छोटे छोटे तुकडे आजपासूनच वर्तमानात आणता येतील.

आजच्या धावपळीतून थोडा वेळ चोरता येईल.
थोडा निवांतपणा.
थोडा बासरीचा रियाज.
थोडा समुद्र.
थोडा निसर्ग.
थोड्या गप्पा.
आईजवळ बसण्याचा थोडा वेळ.
आपल्या माणसांसोबत मनापासून हसण्याचा थोडा क्षण.
आणि थोडं स्वतःसाठी जगणं.

कारण शेवटी…

पाच वर्षांनी मिळणारं आयुष्य सुंदर असेलच,
पण त्या आयुष्याची थोडीशी चव आजही घेता आली,
तर कदाचित आजचं धावपळीचं आयुष्यही हळूहळू सुंदर होईल.

कदाचित फास्ट फॉरवर्ड करण्याची गरज आयुष्याला नाही…

कदाचित गरज आहे ती फक्त थोडं थांबण्याची.

-राजेश कापसे


सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

आयुष्य खरंच इतकं क्षणभंगुर आहे…

जवळचे मित्र अचानक निघून जातात, तेव्हा मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मागच्या पंधरा दिवसांत घडलेल्या दोन घटनांनी मला अक्षरशः आतून हलवून टाकलं.

माझा जवळचा मित्र गजानन देशमुख.

मी पोदारमध्ये शिकत असताना तो नालासोपाऱ्यातील आयुर्वेद कॉलेजमध्ये BAMS करत होता. माझ्याच गावचा असल्यामुळे आमची खूप चांगली मैत्री झाली होती. परीक्षेच्या दिवसांत तो आवर्जून माझ्या हॉस्टेलवर यायचा, माझ्यासोबत राहायचा. पुढे आम्ही संभाजीनगरमध्ये सोबत प्रॅक्टिसही केली. रोज संध्याकाळी भेटणं, गप्पा मारणं, जुन्या आठवणींमध्ये रमणं… आयुष्याचा तो एक सुंदर काळ होता.

नंतर तो पुण्याला शिफ्ट झाला. काही काळ आमचा संपर्क कमी झाला. माझं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याने ते आवर्जून वाचलं. मला अनेकदा फोन करून म्हणायचा,

“अरे वा! तू खूप सुंदर काम करतोयस. क्रिएटिव्ह काम सगळ्यांना जमत नाही. मला तुझा अभिमान वाटतो.”

त्याचं हे कौतुक मनात कायम राहिलं.

एक दिवस अचानक त्याचा फोन आला.

“राजेश, मला हार्ट अटॅक आला. मी रुबी हॉलमध्ये ॲडमिट आहे.”

मी त्याला भेटायला निघणार, इतक्यात त्याचाच पुन्हा फोन आला.

“अरे, अँजिओप्लास्टी झाली. आता डिस्चार्ज मिळालाय.”

मी म्हटलं, “ठीक आहे, मी तुला घरी येऊन भेटतो.”

पण कामाच्या गडबडीत ती भेट राहून गेली.

मनात होतं — चार-पाच दिवसांनी भेटू. आता तो ठीक असेल.

पण पाच दिवसांनी त्याच्या पत्नीचा फोन आला…

“राजेश, गजाननला परत हार्ट अटॅक आला… आणि तो गेला.”

काही क्षण मन सुन्न झालं.

ज्याला भेटायचं राहून गेलं, त्याच्याशी पुन्हा कधीच भेट होणार नाही, ही जाणीव फार वेदनादायक असते.

त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आमच्या जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होत्या. डोळ्यात पाणी येत होतं आणि मनात एकच विचार घोळत होता —

आयुष्य खरंच किती क्षणभंगुर आहे!

आणि त्यानंतर दुसरा धक्का…

माझा शाळेपासूनचा मित्र माधव आयाचित.

गंगाखेडमध्ये धार्मिक विधी आणि अंत्यविधींच्या कामात तो पारंगत होता. आम्ही लहानाचे मोठे झालो. बऱ्याच वर्षांनी माझं पुस्तक लिहिताना अंत्यविधींबद्दल काही माहिती हवी होती म्हणून त्याच्याशी पुन्हा संपर्क झाला. त्याने अत्यंत सविस्तरपणे मला सगळी माहिती दिली.

मागच्या महिन्यात वडिलांचं श्राद्ध होतं. माधवने अत्यंत व्यवस्थितपणे सगळा विधी करून दिला. आमचं बोलणं झालं —

“पुढच्या वर्षी परत भेटू. श्राद्धविधीही तुझ्याकडूनच करून घेईन.”

मनात होतं की आता दरवर्षी त्याची भेट होईल.

आणि काल फेसबुकवर त्याच्या निधनाची बातमी पाहिली.

ब्लड प्रेशरचा त्रास झाला. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. तिसऱ्या दिवशी मेंदूत रक्तस्राव झाला. कोमात गेला… आणि तोही निघून गेला.

पुन्हा एकदा तेच जाणवलं — पन्नाशीच्या आसपासचा माणूस, कालपर्यंत आपल्याशी गप्पा मारणारा मित्र… आणि आज अचानक सगळं संपलेलं.

या दोन घटनांनी मनात खूप काही बदलून टाकलं आहे.

आपण आयुष्यात किती गोष्टी धरून ठेवतो…

राग, लोभ, अपेक्षा, अहंकार, आकांक्षा, स्पर्धा, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, कोणीतरी आपल्याशी असं का बोललं, कोणीतरी आपल्याला महत्त्व का दिलं नाही, आपल्याला अजून हे मिळवायचं आहे, अजून तिथे पोहोचायचं आहे…

पण शेवटी?

कधी कोणता क्षण शेवटचा ठरेल, हे कोणालाच माहीत नाही.

म्हणून कदाचित आयुष्याकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहायला हवं.

मनात राग असेल तर शक्य असेल तेव्हा सोडून द्यायला हवं.

कोणाची आठवण येत असेल तर फोन करायला हवा.

कोणाला भेटायचं असेल तर “नंतर भेटू” असं म्हणत राहण्यापेक्षा शक्य असेल तेव्हा भेटायला हवं.

ज्यांच्यावर प्रेम आहे, त्यांना ते सांगायला हवं.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे — आयुष्य जगायला हवं.

कारण उद्या आपल्यासाठी आहे, याची कोणतीही खात्री नाही.

गजानन आणि माधव गेले… पण त्यांनी मागे ठेवलेल्या आठवणी कायम राहतील.

कदाचित त्यांच्या जाण्याने मला पुन्हा एकदा शिकवलं —

आयुष्य मोठं असण्यापेक्षा ते मनापासून जगलेलं असणं महत्त्वाचं आहे.

आज आपण आहोत. आपली माणसं आहेत. आपल्या हातात हा क्षण आहे.

म्हणून राग-लोभ, अपेक्षा-आकांक्षा, तक्रारी आणि मनस्ताप यापेक्षा…

थोडं अधिक प्रेम करूया.
थोडं अधिक हसूया.
थोडं अधिक भेटूया.
आणि मिळालेलं आयुष्य मनापासून जगूया.

कारण…

कधी कोणता क्षण शेवटचा असेल, खरंच सांगता येत नाही.

गजानन आणि माधव —
तुम्ही दोघेही कायम आठवणीत राहाल.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏


गुरुवार, १६ जुलै, २०२६

मी आता त्यातून बाहेर आली आहे” — अष्टावक्र गीतेचा एक जिवंत अनुभव

माझ्या आईचे वय आता ८६ वर्षे आहे. काल तिला थोड्या चकरा येत होत्या आणि ती अस्वस्थ होती. तिची प्रकृती पाहून मला पुन्हा एकदा तोच जुना विषय आठवला.

मी तिला अनेक वेळा म्हणायचो, “आई, कधी तू आजारी पडलीस आणि तुला स्वयंपाक करणे शक्य झाले नाही, तर मी हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून तुझ्यासाठी डबा आणीन.”

पण तिचे उत्तर नेहमी ठाम असायचे. “नको. मला तो डबा चालणार नाही.”

या विषयावर आमच्यात अनेकदा चर्चा आणि वादही झाले. मी तिला विचारायचो, “काय कारण आहे? तो डबा इतर जातीच्या किंवा इतर पंथाच्या व्यक्तींनी बनवला असेल म्हणून तुला नको आहे का?” ती यावर स्पष्ट काही बोलत नसे. पण तिच्या मनात एक संस्कार, एक संकोच आणि एक अदृश्य भिंत असल्याचे जाणवत असे. त्यामुळे कितीही आजारी असली, तरी ती स्वतःचे जेवण स्वतःच बनवून खायची.

पण काल काहीतरी वेगळे घडले.

ती अस्वस्थ होती. मी पुन्हा विचारले, “आई, आज कॅन्टीनमधून डबा आणू का?”

यावेळी ती शांतपणे म्हणाली, “हो. नक्की घेऊन ये. मला चालेल. ते कुठल्याही जातीचे असतील, कुठल्याही पंथाचे असतील, तरी मी आनंदाने खाईन. मी आता त्यातून बाहेर आली आहे.”

तिचे हे शब्द ऐकून मी काही क्षण निःशब्द झालो.

हे केवळ कॅन्टीनच्या डब्याला दिलेले होकार नव्हते. तो अनेक दशकांपासून मनात रुजलेल्या एका संस्कारावर मिळवलेला विजय होता. माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याचा तो क्षण होता.

त्याच वेळी मला अष्टावक्र गीतेतील वचन आठवले—

“असङ्गोऽसि निराकारो विश्वसाक्षी सुखी भव.”

‘निराकार’ म्हणजे केवळ शरीराचा आकार नसणे नव्हे. ‘निराकार’ म्हणजे आपण स्वतःभोवती उभ्या केलेल्या जात, पंथ, अहंकार, पूर्वग्रह आणि भेदभाव यांच्या चौकटींच्या पलीकडे जाणे. आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख या सर्व बाह्य ओळखींपेक्षा मोठी आहे, याची जाणीव होणे.

आईने काल कोणतेही तत्त्वज्ञान मांडले नाही. तिने अष्टावक्र गीतेचा एकही श्लोक उच्चारला नाही. पण तिचे एक साधे वाक्य—“मी आता त्यातून बाहेर आली आहे”—यातून मला अष्टावक्र गीतेचा अर्थ नव्याने समजला.

आध्यात्मिक प्रगती ही मोठमोठ्या प्रवचनांत किंवा ग्रंथांच्या अभ्यासातच दिसते असे नाही. ती आपल्या विचारांत, आपल्या वागण्यात आणि इतर माणसांविषयीच्या आपल्या दृष्टीकोनात दिसते.

त्या दिवशी माझ्या आईने मला एक मौल्यवान धडा शिकवला—काही वेळा आयुष्यभर जपलेले संस्कार सोडण्याची तयारीच खरी मुक्ती असते. आणि कदाचित, त्या मुक्तीच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल म्हणजेच अष्टावक्रांनी सांगितलेल्या ‘निराकार’ अवस्थेकडे जाणारी वाट असते.

-राजेश कापसे

9819915070

सोमवार, ११ मे, २०२६

बाबा चुकतो तेव्हा…


चार दिवसांपूर्वीची गोष्ट.

माझा छोटा मुलगा ओजस क्रिकेट खेळायला गेला होता. त्याच्यासाठी खास घेतलेला नवीन लेदरचा बॉल घेऊनच तो मैदानावर गेला होता. खेळून घरी आल्यानंतर मात्र तो बॉल काही सापडेना.


मी खूप चिडलो. त्याच्यावर बरंच ओरडलो. त्याला घेऊन पुन्हा ग्राउंडवर गेलो. तिथेही खूप शोधला, पण बॉल सापडला नाही. रागाच्या भरात त्याला म्हणालो,

“इथून पुढे तुझं क्रिकेट बंद! तू खूप बेजबाबदारपणे वागतोस.”


घरी परत आलो. थोड्या वेळाने त्याची क्रिकेटची बॅग उघडली आणि काय आश्चर्य…

तो बॉल बॅगेतच होता!


पण तोपर्यंत मी त्याला खूप काही बोलून गेलो होतो. तो बिचारा घाबरला होता, रडला होता.


आज अगदी असाच प्रसंग माझ्याबाबतीत घडला.

माझा खूप महागडा बीट्सचा हेडफोन — जो कायम माझ्या बॅगेत असतो — तो मला सापडेना. मी लगेच घरी फोन केला. ओजसला सांगितलं,

“जरा शोध बघू घरी आहे का?”


त्याने शोधला, पण घरातही तो सापडला नाही.

मी घरी आलो तेव्हा थोडा नाराजच होतो. तेवढ्यात ओजस माझ्याजवळ आला आणि शांतपणे म्हणाला,

“बाबा, काळजी करू नकोस. आपण आयफोनमधून तुझा बीट्स हेडफोन शोधू.”


त्या क्षणी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.

जेव्हा ओजसकडून चूक झाली होती, तेव्हा मी त्याच्यावर रागावलो होतो. पण अगदी तसाच प्रसंग माझ्यावर आला तेव्हा मुलाची प्रतिक्रिया मात्र किती समजूतदार आणि सकारात्मक होती!


त्याने मला दोष दिला नाही, टोमणे मारले नाहीत, “तू बेजबाबदार आहेस” असंही म्हटलं नाही. उलट मला धीर दिला.


आणि तेव्हा जाणवलं —

लहान मुलांकडून शिकण्यासारखं खूप काही असतं.


आपण मोठे म्हणून त्यांच्यावर ओरडतो, त्यांना चुका दाखवतो, बेजबाबदार म्हणतो. पण अशाच चुका जेव्हा आपल्याकडून होतात, तेव्हा त्या सहज माफ केल्या जातात. कारण आपण “मोठे” असतो.


खरं तर, त्या दिवशी माझ्या मुलाने मला माफ करण्याची, समजून घेण्याची आणि शांतपणे साथ देण्याची जी पद्धत दाखवली…

तसंच जर मी त्याच्याशी वागलो असतो, तर कदाचित तो रडला नसता.


कधी कधी मुलं आपल्याला शब्दांनी नाही, तर त्यांच्या वागण्यातून खूप मोठे धडे देऊन जातात.

मंगळवार, ५ मे, २०२६

पूजा!

आज सकाळी जरा निवांत उठलो. सावकाश उठून ब्रश केला, स्वच्छ आंघोळ केली. मग नवीन कपडे घातले आणि आवडता सुगंध लावला. बरेच दिवस देवाची पूजा केली नव्हती, म्हणून आज मनापासून पूजा केली. देवांना पाणी घातले, स्वच्छ पुसले, सुंदर सजवले, फुले वाहिली, सुगंध लावला आणि दिवा लावला. घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण झाले.


थोड्या वेळाने कामवाली बाई आली. तिने संपूर्ण घर स्वच्छ केले. सगळ्या वस्तू नीट लावल्या, कचरा साफ केला, भांडी घासली, कपडे नीट ठेवले. तिच्या त्या कामामुळे घर आणखी सुंदर आणि शांत वाटू लागले. तिचं कामही एक प्रकारची पूजाच वाटली.


नंतर हॉस्पिटलमध्ये आलो. बाहेर गणपती बाप्पाची पूजा सुरू होती. मूर्ती स्वच्छ धुतली जात होती, सुंदर वस्त्र परिधान केली जात होती, फुले आणि सुगंध अर्पण केला जात होता. वातावरण भक्तिमय झाले होते.


हॉस्पिटलमध्ये आत गेल्यावर पाहिले, हाऊसकीपिंग स्टाफ प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवण्यासाठी मनापासून मेहनत करत होता. कुठे फरशी पुसली जात होती, कुठे कचरा उचलला जात होता, तर कुठे वस्तू नीट लावल्या जात होत्या. ते फक्त साफसफाई करत नव्हते, तर जणू त्या जागेची पूजा करत होते.


मग सहज एक विचार मनात आला —
आपण आंघोळ करतो, म्हणजे स्वतःची पूजा करतो.
देवाला स्नान घालतो, म्हणजे देवाची पूजा करतो.
घर स्वच्छ करणारी कामवाली बाई घराची पूजा करते.
हॉस्पिटल स्वच्छ ठेवणारा हाऊसकीपिंग स्टाफ त्या सेवास्थानाची पूजा करतो.


पूजेची रूपं वेगवेगळी असतात, जागा वेगवेगळ्या असतात, पण मूळ भावना एकच असते —
स्वच्छता, नीटनेटकेपणा, सौंदर्य आणि प्रसन्नता निर्माण करणे.

-राजेश कापसे

९८१९९१५०७०

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

राजूभाई बी.ए.एम.एस. प्रकाशित झाले

मनोगत


माझ्या नायजेरिया या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुरू होताजाणकार वाचकस्नेही मित्रमंडळी आणि हितचिंतक या कार्यक्रमालाउपस्थित होतेहा सोहळा यूट्यूब लाईव्हवरही सुरू होता. कार्यक्रमसंपल्यानंतर माझा एक बालमित्र — मोहन मोहोळकरजो सध्या अमेरिकेतस्थायिक आहे — याचा मला फोन आला. तो म्हणाला, राजेशतुझं पुस्तकआणि हा प्रकाशन सोहळा दोन्ही अतिशय सुंदर झाले आहेतपण मलावाटतंतू राजूभाई बीएएमएस’ नावाचं एक नवं पुस्तक लिहायलाच हवंतूपोदार आयुर्वेद कॉलेजमध्ये शिकत असताना काही दिवस मी तुझ्यासोबतहॉस्टेलवर राहिलो होतो. तुझे संस्कृतचे विषयइंग्रजीतील ॲलोपॅथीचे धडेआयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक दोन्ही शिकण्यासाठीची तुझी धडपडकॉलेजमधलं रॅगिंगहॉस्टेलवरील गमतीजमतीअभ्यासाचे दिवसपरीक्षांचीतणावपूर्ण वेळ — हे सगळं मी जवळून पाहिलं आहे. गंगाखेड → परभणी → मुंबईचं पोदार कॉलेज → लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन→ आणि थेट नायजेरियात प्राथमिक आरोग्य सेवांचा संचालक — हा प्रवासलोकांनी वाचायलाच हवा. त्याची ही कल्पना मला मनापासून आवडली.आणि मग या पुस्तकाचा जन्म झाला.


मी मूळचा संत जनाबाईंच्या गंगाखेडचा. लहानपणापासून आई सांगायची कीजनाबाई ही एक दासी होतीपण भक्तीकष्टश्रद्धा आणि निष्ठेच्या बळावरती संतपदापर्यंत पोहोचली. एक वेळ अशी आली की विठ्ठल स्वतः तिच्याघरी दळण दळायला आला. सामान्य माणूससुद्धा श्रद्धाकष्ट आणिप्रामाणिकपणाच्या जोरावर असामान्य होऊ शकतो.


माझ्या प्रवासात अनेक खाचखळगे आलेमी कधी पंढरपूरला विठू माऊलीच्या दर्शनासाठी गेलो नाही  पण आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मला विठ्ठलवेगवेगळ्या रूपांत भेटत गेला. वडील गेल्यानंतर माझ्या बहिणी आणिभाऊजींनी घेतलेल्या जबाबदारीतबारावीच्या काळात घारेसरांनी दिलेल्यामदतीतपोदार कॉलेजमध्ये मुंबईच्या वातावरणात मला सामावून घेणाऱ्यामित्रं-मैत्रिणींतविद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यामध्ये मी विठ्ठल पाहिलासंकटांच्या काळात खंबीरपणे उभं राहिलेल्या माझ्या आईमध्येडॉहेडगेवाररुग्णालयात डॉअनंत पंढरे,डॉआनंद फाटक,डॉप्रसन्न पाटील,डॉदिवाकरकुलकर्णी यांच्या रूपात मी विठ्ठल पाहिलामुंबईत डिप्रेशनच्या अंधारातूनबाहेर काढणारे डॉअनिल अवचट आणि डॉआनंद नाडकर्णी यांच्यारूपात मी विठ्ठल पाहिला. तर साईटसेवर्समध्ये काम करताना आयुष्यालानविन वळण देणाऱ्या श्रीनिवास सावंत सारख्या बॉस च्या रूपात मी विठ्ठलपाहिला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कुठे ना कुठे विठ्ठल मला भेटत गेलाकधी माणसाच्या रूपात,कधी संधीच्या रूपात, कधी आधाराच्या रूपात.आणि त्यातूनच हा प्रवास घडत गेला गंगाखेडपासूननायजेरियापर्यंत.


हे पुस्तक लिहिताना ज्यांनी मला साथ दिली, त्यांचे मी मनापासून आभारमानतो माझ्या सासूबाई सौप्रिया साबडेमित्र योगेश प्रभूणेश्री रविगोळेडॉगिरीश टिल्लूडॉसंदीप भारस्वाडकरडॉरोहित जाधवडॉ विद्यापाटीलश्री रत्नाकर पाटीलमाझी पत्नी डॉप्रज्ञा कापसेकृत्रिम प्रज्ञा(एआय), माझी आई दमयंती कापसेमाझ्या सर्व बहिणीभावजी (डॉदेवीदास मुळे  सौकल्पना मुळेश्री सतीश देशपांडे  सौअनुराधादेशपांडेश्री गणेश देशपांडे  डॉसौ.सुनीता देशपांडेडॉश्री गोविंद पाटील सौ.ज्योती पाटीलखरंतरया सगळ्यांमुळेच माझं आयुष्य घडलं आहे.


राजूभाई बी..एम.एस. हा एका सामान्य बी..एम.एसडॉक्टरचा श्रद्धेचासंघर्षाचा आणि कृतज्ञतेचा प्रवास आहे.

आपल्याला हे पुस्तक नक्की आवडेल, ही मला मनापासून अपेक्षा.

 

धन्यवाद.

 

राजूभाई बी..एम.एस.

डॉ राजेश कापसे

पुस्तकाचे नाव : राजूभाई बी.ए.एम.एस.

लेखक : डॉ. राजेश कापसे

प्रस्तावना : प्रवीण दवणे

प्रकाशन : विवेक पुस्तक प्रकाशन

‘राजूभाई बी.ए.एम.एस.’ या पुस्तकातील अनुभव हे डॉ. राजेश कापसे यांना आलेले असले तरी, ते त्यांच्या एकट्या पुरते मर्यादित राहात नाहीत. तर त्यांचे हे अनुभव आजच्या युवकांसाठी आश्वासक ठरतात. डॉक्टर बनण्यासाठी त्यांना करावी लागलेली झुंज असेल, त्यानंतर केवळ पेशा म्हणून काम न करता त्यांना आलेले सामाजिक अनुभव असतील. त्यातून अंदमानच्या बेटावरील त्यांचे सामाजिक काम असेल. आजही उघडपणे बोललं जात नाही, अशा एचआयव्ही, एड्सच्या दुनियेतील त्यांचे काम असेल, नेत्र, अंध, अपंग, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक पातळ्यांवर यांनी केलेले काम पुस्तक वाचताना थक्क करून जाते. 

म्हणूनच त्यांचे हे पुस्तक आत्मकथन न राहाता, या क्षेत्रातून पुढे येणार्‍या प्रत्येक भावी डॉक्टरांसाठी दस्तावेज बनले आहे.

आपली नोकरी, व्यवसाय सांभाळत सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचावे. 

मूळ किंमत : रु. 275/-

सवलत मूल्य : रु. 247.50/- 

आपली प्रत आजच नोंदवा.

संपर्क : 9594961858/7506732905