आज सकाळी जरा निवांत उठलो. सावकाश उठून ब्रश केला, स्वच्छ आंघोळ केली. मग नवीन कपडे घातले आणि आवडता सुगंध लावला. बरेच दिवस देवाची पूजा केली नव्हती, म्हणून आज मनापासून पूजा केली. देवांना पाणी घातले, स्वच्छ पुसले, सुंदर सजवले, फुले वाहिली, सुगंध लावला आणि दिवा लावला. घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण झाले.
थोड्या वेळाने कामवाली बाई आली. तिने संपूर्ण घर स्वच्छ केले. सगळ्या वस्तू नीट लावल्या, कचरा साफ केला, भांडी घासली, कपडे नीट ठेवले. तिच्या त्या कामामुळे घर आणखी सुंदर आणि शांत वाटू लागले. तिचं कामही एक प्रकारची पूजाच वाटली.
नंतर हॉस्पिटलमध्ये आलो. बाहेर गणपती बाप्पाची पूजा सुरू होती. मूर्ती स्वच्छ धुतली जात होती, सुंदर वस्त्र परिधान केली जात होती, फुले आणि सुगंध अर्पण केला जात होता. वातावरण भक्तिमय झाले होते.
हॉस्पिटलमध्ये आत गेल्यावर पाहिले, हाऊसकीपिंग स्टाफ प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवण्यासाठी मनापासून मेहनत करत होता. कुठे फरशी पुसली जात होती, कुठे कचरा उचलला जात होता, तर कुठे वस्तू नीट लावल्या जात होत्या. ते फक्त साफसफाई करत नव्हते, तर जणू त्या जागेची पूजा करत होते.
मग सहज एक विचार मनात आला —
आपण आंघोळ करतो, म्हणजे स्वतःची पूजा करतो.
देवाला स्नान घालतो, म्हणजे देवाची पूजा करतो.
घर स्वच्छ करणारी कामवाली बाई घराची पूजा करते.
हॉस्पिटल स्वच्छ ठेवणारा हाऊसकीपिंग स्टाफ त्या सेवास्थानाची पूजा करतो.
पूजेची रूपं वेगवेगळी असतात, जागा वेगवेगळ्या असतात, पण मूळ भावना एकच असते —
स्वच्छता, नीटनेटकेपणा, सौंदर्य आणि प्रसन्नता निर्माण करणे.
-राजेश कापसे
९८१९९१५०७०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा