Thursday, October 9, 2025

कल्याण ते दादर: असेही एक सिमोल्लंघन!

आम्ही आज शिवाजी पार्क दादर येथे स्वत:चे घर घेतले. मागे वळून बघताना बरेच काही आठवते.

२००७ मध्ये मला मुंबईत नोकरी मिळाली. मग घर कुठे करायचे याच्यावर बरीच चर्चा झाली. दादर,घाटकोपर,मुलूंड,ठाणे,डोंबिवली उतरत्या क्रमाने सगळीच ठिकाणं महाग न परवडणारी म्हणून कल्याण त्यातल्या त्यात बरे म्हणून नक्की केले. पुढची पाच वर्षे कल्याणहून दादर १ तास व तिथून मालाड ४५ मि. व तसाच परतीचा प्रवास दररोज किमान चार तास लागणार.अनेकवेळा वाटले की दादरला शिफ्ट व्हावं.पण मनाची तयारी व्हायची नाही. महाग असेल,परवडणार नाही शाळांचा खर्च परवडेल का? असे प्रश्न.कल्याणहून एकवेळ अमेरिकेत शिफ्ट होणे सोपे असेल पण माझ्या मराठी मनाची दादरला जाण्याची हिम्मत होत नसे.

माझे त्यावेळचे बाॅस आणि त्याहीपेक्षा मित्र श्रीनिवास सावंत हे २०१० ते २०१२ सातत्याने मला कल्याणहून दादरला शिफ्ट होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. मला असं वाटत की त्यांनी उपनगरात राहणाऱ्या मराठी माणसांनी दादरमध्ये रहायला यावे यासाठी सतत प्रयत्न करण्याचा पण केला आहे. शेवटी २०१२ मध्ये मी दादरला राहण्यास यायचे ठरवले. दोन वर्ष लागली मनाची तयारी करायला!

माझ्यासोबत काम करणारी पूजा म्हणाली, "अरे किंग जाॅर्ज शाळेत तुझ्या मुलाच्या प्रवेशासाठी अर्ज तर कर. मिळेल ॲडमिशन". मी अर्ज केला आणि साधारणत: एक महिन्याने मला शाळेतून फोन आला. प्रवेशासाठी तुमच्या मुलास कागदपत्रांसह घेवून या!" अजून दादरमध्ये घर घ्यायचे होते. पण अर्णवला शाळेत घेऊन गेलो. शाळेत त्याला प्रवेश मिळाला पण दादरमध्ये घर असेल तरच असे सांगण्यात आले. तो थोडाच कल्याण ते दादर प्रवास करणार होता!

मग घराची शोधाशोध सुरू झाली. डाॅ. अनंत पंढरे सरांना फोन केला. मी त्यांना संकटमोचक म्हणतो. आजपर्यंतच्या माझ्या यशाचे ते शिल्पकार आहेत. त्यांनी परांजपे काकांचा फोन दिला आणि मग श्री. प्रमोद जोशींची ओळख झाली. त्यांना परदेशात मुलाकडे रहायला जायचे होते व त्यांचे दादरचे घर भाड्याने द्यायचे होते. त्यांनी मला ओळखत असलेल्या दोन व्यक्तींचा फोन द्यायला सांगितला. मी म्हणालो विद्यार्थी परिषदचं मी काम केलं आहे. त्यांनी विनयजी सहस्त्रबुद्धे यांना फोन केला. मग म्हणाले 'विनयजींनी सांगितलं आहे नि:शंकपणे राजेशला घर द्या. तो परिषदेचा कार्यकर्ता आहे." घराची व्यवस्था झाली. प्रमोदकाकांनी मला मागचे पाच वर्षे त्यांच्या मुलासारखे प्रेम केलंय. मग केले नक्की आणि दादरला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.

माझी पत्नी प्रज्ञाने मला पुर्ण साथ दिली आणि आम्ही कल्याणहून दादरला आलो. डाॅ. नियती चितालीया मॅडमनी आम्हाला दादरमध्ये स्थिरावण्यासाठी मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय इथे स्थिरावणे शक्यच नव्हते.

या प्रवासात मदत केलेल्या सर्वांचे आभार, या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे सिमोल्लंघन शक्य झाले.

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

Saturday, October 4, 2025

शेवटचे दिवस


शेवटचे दिवस नेहमीच अवघड ठरतात.

जन्म देऊन, काळजाचा ठाव काढून वाढवलेली लेकरं,

आनंदाने ओतप्रोत खर्चून केलेली लग्नं,

घरातली गजबज, हशा, आरास…

पण आयुष्याच्या संध्याकाळी

ते सारेच कसे दुरावून जातात!

घरात उरतो केवळ एक शांतपणा—

भिंतींवर घुमणाऱ्या आठवणींचा,

आणि सोबतीला असते एक अनोळखी कामवाली.

तिलाही जगण्यासाठी पर्याय नसतो,

म्हणून तीच ठरते खरी सोबतीण

त्या अखेरच्या क्षणांची.

शेवटचे दिवस सरले की मात्र,

पुन्हा उमटतात ओळखीचे चेहरे.

आठवणींनी भारलेली लेकरं,

दुःखाच्या सावल्या पुसायला धावणारे नातेवाईक,

आणि मग घरभर पसरेल

गोडजेवणाचा सुगंध—

जणू मृत्यूही झाला असेल

फक्त एक सोहळा.

-राजेश कापसे 

Saturday, June 7, 2025

माप!

आज सकाळी काही जुने भांड्यांचे डबे उघडले आणि त्यात हे “माप” सापडले. गंगाखेडच्या कितीतरी आठवणी जाग्या झाल्या. दरवर्षी ज्वारी, गहू दुष्काळात मिलो मोजून घेताना आई हे माप वापरायची. आठ मापं म्हणजे पाच किलो! गेले ते दिवस.काळागणीक अनेक गोष्टी बदलतात. हे मापही बदलले आहे.

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

Tuesday, May 27, 2025

संन्यस्त साधू आणि त्यांचे आई बाबा !

साधारणतः एक वर्षापूर्वी माझी ओळख एका संन्यासी स्वामींबरोबर झाली. माझ्या एका डॉक्टर मित्राने मला फोन केला आणि सांगितले,”अरे माझा M.B.B.S चा एक मित्र स्वामी योगी अनंत (नाव बदलले आहे) तुझ्या हॉस्पिटलजवळच एका आश्रमात राहतो आणि तिथे त्याला मोफत नेत्र शिबीर घ्यायचे आहे. अनेक मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांना त्याचा फायदा होईल. त्यांना भेट नक्की.” मला जरा आश्चर्यच वाटले. कारण M.B.B.S चा क्लासमेट, संन्यासी हे जरा माझ्यासाठी अजबच होते. मी लगेच गाडी काढली आणि त्यांच्या आश्रमाकडे निघालो. त्या आश्रमामध्ये स्वामींची ओळख झाली. त्यांनी माझे खूप प्रेमाने आणि विनम्रपणे स्वागत केले, “नमो नारायण डॉ राजेश! तुमचे स्वागत आहे.” त्यांनी त्या आश्रमात एक आरोग्य केंद्र सुरु केले होते आणि जवळपासच्या ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांमध्ये ते आरोग्य सेवा देण्याचे काम करत होते. 

   “M.B.B.S झाल्यानंतर का संन्यास घेतला असेल?” हा प्रश्न माझ्या मनात आहे हे त्यांनी माझ्या चेहऱ्यावरील हावभावांवरून ओळखले. अनेक जण M.B.B.S करून पुढे M.D, D.M असे बरेच शिक्षण घेऊन श्रीमंत होण्याची स्वप्न बघतात. अकरावी, बारावीमध्ये तर दिवस रात्र एक करून अभ्यास करून सर्वोत्तम मार्क मिळाले तरच M.B.B.S साठी प्रवेश मिळतो. काही पालक तर करोडो रुपये देऊन या अभ्यासक्रमाला आपल्या मुलांना प्रवेश मिळवून देतात. M.B.B.S साठी काहीपण अशी मानसिकता असणारे अनेक पालक आणि विदयार्थी मी बघितले आहेत. किंबहुना मी सुद्धा त्यापैकीच एक होतो आणि या माणसाने नामवंत अशा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून M.B.B.S चे शिक्षण अत्यंत चांगल्या मार्काने पूर्ण करून चक्क संन्यास घेतला! स्वामीजी मला म्हणाले, “राजेश, हे बघ ही ईश्वरी इच्छा होती. तुम्ही लोक संसार करून समाजासाठी मोठे योगदान देता. मी संन्यस्त राहून वैद्यकीय सेवा देतो. प्रत्येकाचा मार्ग आणि त्यातून मिळणार आनंद वेगळा.” मी त्यांना भेटून भारावून गेलो. मग आम्ही त्यांच्या आश्रमात मोफत नेत्र शिबिरे घ्यायला सुरुवात केली. अनेक रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आमच्या आय हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या. स्वामीजी स्वतः त्या रुग्णांसोबत हॉस्पिटलमध्ये येत असत. आमची खूप चांगली ओळख झाली. 

   एक दिवस मला स्वामीजींचा फोन आला. म्हणाले, “राजेश, तुझ्या हॉस्पिटलमध्ये श्री व सौ राणे (नाव बदलले आहे) येतील. ते साधारणतः ८५ आणि ८० वर्षांचे आहेत आणि त्यांना डोळ्यांची तपासणी करायची आहे. त्यांची योग्य ती काळजी घे. ते डायबेटिक आहेत. त्यामुळे जरा वेळेत उपचार होतील असे बघ.” मी त्या दोघांना हॉस्पिटलच्या स्वागत कक्षात भेटलो आणि त्यांची तपासणी व उपचार लवकर होतील याची व्यवस्था केली. त्या काकांना बघितल्यानंतर मला स्वामीजी आणि त्यांच्यामध्ये खूप साम्य जाणवले. मी विचार करत होतो, “हे स्वामीजींचे आई वडील तर नसतील?” त्याची तपासणी झाल्यानंतर त्यांना सोडण्यासाठी मी त्यांच्या कारपर्यंत गेलो. माझ्या मनात जे चालले होते, ते न राहवून मी व्यक्त केले, “काका, स्वामीजी तुमच्यासारखे दिसतात.” ते म्हणाले, “हो, ते माझे चिरंजीव होते. ते आता संन्यासी आहेत.” हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. दुसरे कुणी असते तर दु:खी कष्टी दिसले असते पण मुलाने M.B.B.S झाल्यानंतर घेतलेला संन्यास त्यांनी सहजपणे आनंदाने स्वीकारला होता. आपल्या अपेक्षांचे ओझे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मुलांवर ठेवणारे पालक आणि एकुलत्या एक मुलाने M.B.B.S झाल्यानंतर घेतलेला संन्यास सहज स्वीकारणारे हे पालक बघून आश्चर्य आणि आदर या संमिश्र भावनांनी मी त्यांना निरोप दिला.

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

Friday, May 23, 2025

चढा आणि उतरलेला तबला

परवा बासरीचा क्लास संपल्यानंतर गुरूजी तबला उतरवून ठेवत होते. मी सहज विचारले, “सर, उद्या परत लागणार आहे तबला. उतरवून का ठेवताय?” म्हणाले, “अरे उन्हाळ्यात त्याचा स्वर खूप चढतो. म्हणून उतरवावा लागतो. नाहीतर उद्या नीट स्वर लागणार नाही. हिवाळ्यात याच्या उलट असते. तो खूप उतरतो. मग त्याचा स्वर चढवून ठेवावा लागतो.” मी विचार केला, "आपल्या मनाच्या अवस्थाही तबल्यासारख्याच असतात नाही का ? कधी सूर चढलेला तर कधी खूप उतरलेला ! ते स्वीकारून योग्य सूर लागण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. उतरलेल्या सूराला जरा वर चढवावे लागते तर चढलेले सूर उतरवावे लागतात तरच षड्ज चांगला लागतो !"

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

Saturday, April 5, 2025

परिसस्पर्श!

काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपलं आयुष्यच बदलून जातं. २००५ मध्ये मी संभाजीनगरच्या (औरंगाबाद) सार्वजनिक वाचनालयात काही पुस्तकं शोधत होतो आणि पुर्णिया हाती लागलं आणि दिवसभरात ते मी वाचून संपवलं. मला त्यातली सहज सरळ लिखाणाची शैली इतकी आवडली की त्यानंतर महिन्याभरात डॅा. अनिल अवचटांची त्या वाचनालयातील सगळी पुस्तकं वाचून काढली. आणि पुण्यात जावून त्यांना एकदा भेटायचं ठरवलं.

एवढा मोठा माणूस मला भेटेल का? किती वेळ देईल? जरा मनात भीती होतीच. त्यांचा फोन नंबर  शोधायला सुरुवात केली.माझ्या विद्यार्थी परिषदेतील मित्र रत्नाकर पाटील यांनी त्यांचा नंबर मला दिला. फोन केला तो त्यांनीच उचलला.काय बोलावे सुचेना, मी म्हणालो तुम्हाला भेटायचे आहे. त्यांनी सांगितलं, “अरे मी आज जरा व्यस्त आहे, तू उद्या सकाळी ये ८ वाजता.” घराचा पत्ता दिला. माझं जवळचं कुणीतरी माझ्याशी बोलत आहे असं वाटलं. काही माणसांशी आपण क्षणात जोडले जातो.

भेटल्यानंतर ते म्हणाले, “ मला तू  ए बाबा म्हण!” मला संकोचाने एवढ्या मोठ्या व्यक्तीला अरेतुरे कसे म्हणायचे ते कळेना.त्यांनी दहा वेळा तसं म्हणवून घेतलं आणि मी त्यांचा जवळचा मुलगा झालो कायमचा! माझे वडील मी लहान असतांनाच वारले. अनेक वर्षांनी बाबा मिळाला. मग आम्ही खूप गप्पा मारल्या.त्यांनी बासरी वाजवली. मी ही बासरी शिकायचो. मी भुप वाजवायचा प्रयत्न केला. न कंटाळता त्यांनी तो ऐकला आणि म्हणाला, ‘एक सुर वाजवल्यानंतर त्यातूनच सहज दुसरा सुर लागला पाहिजे,अगदी अलगद.बघ प्रयत्न कर !’ मी त्या भेटीत खुप काही शिकलो.त्यांना संभाजीनगरला (औरंगाबादला) आलात की नक्की या म्हणालो. त्यांनी ओरिगामीने तयार केलेला मोर मला दिला. ते संभाजीनगरला (औरंगाबादला) एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर अनेकजण त्यांच्या बरोबर होते. मी त्यांना 'बाबा मी राजेश 'असं म्हणालो. त्यांनी जवळ घेतलं. हा माझा मुलगा राजेश !अशी ओळख करून दिली.’ ते रूग्णालय बघायला आले. सगळ्यांशी गप्पा झाल्या.माझ्या घरीही आले. एवढा मोठा माणूस पण कुठलाही अहंभाव नाही.

हेडगेवार रूग्णालयाच्या वतीने मी त्सुनामी मदत कार्यासाठी अंदमानला जातोय असे त्यांना सांगितले. लगेच त्यांनी मला त्याच्या ओळखीच्या आय.पी.एस. अधिकाऱ्याचा नंबर दिला.मी तिथे येतोय, त्याला काही मदत लागली तर नक्की करा असेही सांगितले. मी अंदमानला गेल्यानंतर त्या पोलिस अधिक्षक मॅडम मला घ्यायला आल्या!

काही वर्षांनंतर मी माझी नोकरी सोडायचा निर्णय घेतला आणि मुंबईत जायचे ठरवले. मला मुंबईत काम काही जमत नव्हते. मी खूप निराश झालो. डिपरेशनमध्ये गेलो. बाबाला फोन केला. त्याने मला पुण्याला बोलावले.मला त्याच्या गाडीत स्वत: ड्राईव्ह करत एका जवळच्याच डोंगरावर घेऊन गेला. भरपूर गप्पा मारल्या. डॉ.आनंद नाडकर्णींचा मला नंबर दिला. त्यांना फोन करून माझी काळजी घ्यायला सांगितले. म्हणाला, “ डॅा. आनंदला भेट, आनंदी होशील.” मी बरा झालो.मग प्रमोशन झालं. परदेशात गेलो. माझ्या करिअरमध्ये खुप प्रगती केली.

एकदा माझ्या जवळच्याच मित्राने मला फसविले. मी खूप अस्वस्थ होतो. बाबाला फोन केला. त्याने एक सुंदर दोहा सांगितला, “जावे सो मेरा नहीं मेरा सो जावे नही”.

मागच्या १७ वर्षांत अनेकवेळा अनेक चढउतारांमध्ये बाबाकडे गेलो. त्याला भेटलं की एक नवीन उत्साह, नवीन एनर्जी मिळायची.

कांही वर्षां पूर्वी मी बाबाला फोन केला होता. त्याचा आवाज खूपच थकलेला जाणवला. मी म्हणालो, “बाबा, मी राग भैरव शिकलो आहे, वाजवू का?” ‘जागो मोहन प्यारे 'ही बंदिश मी वाजवली. तो म्हणाला, “वा ! वा! छान वाजवलीस. मला नक्की पाठव.”

     दोन दिवसांनी कळले की, बाबा गेला.काही माणसं ही परिसासारखी असतात. त्यांच्या स्पर्शाने सोनं होतं. माझ्यासारख्या असंख्य मुलांची आयुष्य बाबानी घडवली. Baba We miss you!

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

Saturday, March 22, 2025

माझे ओपन हाऊस !

माझ्या मुलाची (ओजसची) युनिट टेस्ट संपल्यावर ओपन हाऊससाठी शाळेची ई मेल आली. मी रजा टाकली आणि आम्ही ओपन हाऊससाठी शाळेत गेलो. जरा लवकरच पोचलो. कारण गर्दी झाली असती. सगळ्यात आधी त्याच्या वर्गात गेलो. मग त्याच्या क्लास टीचरने त्याचे सर्व पेपर काढून दिले. आम्ही  प्रत्येक विषयाचे पेपर बघितले आणि त्यात काय चुकले ते समजून घेतले. मार्क चांगले मिळाले होते.मी ओजसचे अभिनंदन केले आणि “अजून चांगला अभ्यास कर!” असा सल्ला दिला. मग आम्ही क्लास टीचरना भेटलो आणि नेहमीप्रमाणे “कसा काय नीट अभ्यास करतो ना हा? वर्गात नीट वागतो ना?” असे प्रश्न विचारले. त्या म्हणाल्या, “ तो हुशार आहे, व्यवस्थित लक्ष देतो, प्रश्न विचारतो.गुणी आहे मुलगा. जरा बडबड जास्त करतो पण ठीक आहे. सिली मिस्टेक टाळायला हव्यात.हस्ताक्षर चांगले करायला पाहिजे.”  सही करून आम्ही त्याच्या वर्गातून बाहेर पडलो. मग तो मला त्याच्या विविध विषयांच्या शिक्षकांना भेटायला घेऊन गेला. सर्वांनी त्याचे कौतुक केले. मला त्याची प्रगती पाहून अभिमान वाटला. बाबाला सर्वांनी चांगले सांगितले होते त्यामुळे आमचे चिरंजीव आनंदात होते. मग आम्ही कॅंटीनमध्ये नाश्ता केला आणि निघालो.

घरी आल्यावर मनात विचार आला, “प्रत्येक तीन महिन्यांनी माझेही असेच ओपन हाऊस झाले तर?” मग मी कल्पना विश्वात रमून गेलो. “कसे असेल माझे ओपन हाऊस?” माझ्या हॅास्पिटलचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, माझे बासरीचे गुरूजी, माझ्या पुस्तकाचे प्रकाशक, माझे आर्थिक सल्लागार वसंत कुळकर्णी, माझे कार्डिओलॅाजिस्ट, हे सगळे माझे तीन महिन्यांचे स्कोअर कार्ड घेऊन बसलेले असतील. आता आई थकली आहे.अण्णा कधीचेच हे जग सोडून गेले.त्यांच्यापैकी कोणी येणार नाही ओपन हाऊससाठी! मीच असेन, माझे यश अपयशाचे स्कोअर कार्ड तपासायला! आपण मोठे होतो, पायावर उभे राहतो.आई-वडील थकलेले असतात किंवा दोघांपैकी एक किंवा दोघेही नसतात.कधी पालक जिवंत असतानाही आपण आपल्याला पोरके करून टाकतो! काय हरकत आहे आपले विचार त्यांच्या बरोबर शेअर करायला? जसा मला अभिमान वाटला,आनंद झाला तसेच त्यांनाही वाटेल नक्कीच! जरा या विचाराने डोळे पाणावले. मग विचार चक्र सुरू झाले.

माझे बोर्ड ॲाफ डिरेक्टर्स नंबर्स आणि नफा यांच्या मी तयार केलेल्या प्रेझेंटेशनवर मला तासतील.डेफिसीट कमी करण्यासाठी, बिझनेस वाढविण्यासाठी स्टॅटर्जीज सांगतील.मग ओपन हाऊस (त्रैमासिक मिटींग) संपेल.त्यातले तसे काही डिरेक्टर म्हणतील, “राजेश, you are doing good but you know you need to work hard to achieve more numbers!!” काहीजण जरा त्रागा व्यक्त करतील. मग लंच करून ओपन हाऊस संपेल.८०% टार्गेट पूर्ण केल्यामुळे “सा** नोकरी नाही जाणार.” हे समाधान आणि पुढच्या तीन महिन्यांचे टार्गेटचे ओझे घेवून मी बाहेर येईन..

मग बासरीचे ठाकूर गुरूजी म्हणतील, “राजेश तिसऱ्या परीक्षेचे सात राग चांगले तयार झाले आहेत. पण भैरवी नीट नाही झाली.जरा कोमल रिषभ चढा लागतो.बासरीची फुंक अजून मजबूत व्हायला हवी.प्रत्येक स्वर चांगलाच वाजायला हवा. पण खूप सुधारणा आहे.कौतुक आहे हो तुमचं.युनिट हेड म्हणून काम करूनही खूप वेळ काढून बासरी शिकताय तुम्ही! तुमचा वृंदावनी सारंग मस्त जमला आहे!”

आर्थिक सल्लागार कुळकर्णी म्हणतील, “राजेश तुमचा पोर्टफोलीओ बरा आहे पण अजून गुंतवणूक वाढवायला हवी.तुम्हाला पेन्शन नाही.मुले मोठी होत आहेत,त्यांच्या शिक्षणाची सोय करायला हवी पण ठीक आहे एकूण १२% रिटर्न मिळतो आहे. छान!”

मग रक्त, ईसिजी, स्ट्रेस टेस्ट, 2D Echo, वजन असे रिपोर्ट बघून कार्डिओलॅाजीस्ट म्हणतील,” कोलेस्टेरॅाल जरा वाढले आहे राजेश. ब्लड प्रेशर ठीक आहे.बाकी रिपोर्ट नीट आहेत पण वजन वाढले आहे खूप.जरा डायट करा.खूप स्ट्रेस घेताय तुम्ही.रात्री झोप लागायला हवी.गोळ्या चुकवू नका. जरा मीठ कमी करा.व्यायामासाठी वेळ काढा.मेडिटेशन करा.” मग ते प्रिस्क्रिप्शन देतील आणि मी रिलॅक्स होऊन बाहेर पडेन.

संध्याकाळची 6.37 ची वडाळा लोकल पकडून वडाळ्याला माझ्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशकाकडे जाईन. ते म्हणतील, “राजेश, पुस्तक बरं झालं आहे पण काही ठिकाणी भरकटले आहे.जरा काही भाग काढून टाकला पाहिजे. मग ते १६०-१७० पानांचे झाले की वाचनीय होईल. तुमचे लिखाण वाचून छान वाटले.तीन महिन्यांनी प्रकाशित करू आपण!” मी एकदम आनंदाने तिथून बाहेर पडून स्कूटर स्टार्ट करून मग दादरला घरी येईन. ओपन हाऊस तसे बरे झालेले. त्यामुळे मग आम्ही सगळे जेवायला बाहेर जाऊ.शिवाजी पार्कला फिरताना बायकोबरोबर दिवसभराच्या गप्पा होतील.घराचा ई एम आय,शिल्लक कर्ज, मालवणच्या घराचे काम,मोठ्या मुलाची CET, त्याचा अभ्यास,पुढच्या तीन महिन्यातील आमच्या दोघांचे कामामुळे होणारे प्रवास,घराचे नियोजन म्हणता म्हणता रात्रीचे अकरा कधी वाजतील ते कळणार नाही. ओपन हाऊस संपताना मनात विचार असतील, “पुढच्या तिमाहीत मला किती नंबर्स करायचे आहेत, किती नफा व्हायला हवा नाहीतर पुढची बोर्ड मिटींग अवघड असेल, वजन कमी करण्यासाठी परत दिक्षीत डायट करायला पाहिजे बॅास, नाहीतर परत कार्डिओलॅाजिस्ट ओरडतील.बासरीच्या परीक्षेतील थेअरी राहिली आहे, झपताल अजून लक्षात रहात नाही,बायको म्हणेल, “अरे सकाळी ७.१० ची लोकल पकडायची आहे ना? नाहीतर लेट मार्क होईल. बस झाले विचार करणे, झोप आता.”

मग सकाळची ७.१० ची लोकल, हॅास्पिटल,नंबर्स, पेशंट, बासरी क्लास पुढच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळण्यासाठी प्रयत्न.पुढच्या ओपन हाऊस ची तयारी.असो "ये जीवन है, इस जीवनका यही है रंगरूप..."

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

Saturday, March 15, 2025

थंड हवेची झुळूक...

पुण्यात काम करताना, माझं केबिन हॉस्पिटल परिसरांत तसं बरच उंचीवर होतं. तिथं पोचेपर्यंत धाप लागत असे. केबिनमध्ये गेल्यानंतर पहिलं काम म्हणजे लाईट लावणे आणि ए.सी. चालू करणे आणि मग कामाला सुरूवात. बऱ्याच वर्षांत अंगवळणी पडलेली ही सवय. त्यामुळे केबिनची खिडकी उघडून बघावं असं कधी सुचलच नाही.

एकदा डॅा. अनिल अवचटांकडे गेलो होतो. गप्पा मारतांना मी सहज म्हणालो, "टेम्प्रेचर फार वाढलंय. काहीच सुचत नाही. ए.सी. नसेल तर जीव तगमगतो." ते म्हणाले,'अरे खुप गरम व्हायला लागलं आणि खिडकीतून हवेची झुळूक आली की त्यात जो आनंद असतो तो निराळाच!" त्यांच हे वाक्य मनावर कोरले गेले . मनातल्या मनात म्हणालो, "खरंतर मनाची तयारीच नसते शरीराला थोडाही त्रास करून घेण्याची."

दुसरे दिवशी कामावर पोचलो.केबिन उघडले आणि जरा माझ्या अंगवळणी पडलेल्या सवयीत बदल केला. खिडकी उघडली, केबिनच दार उघडं ठेवलं. दिवसभर ना ए.सी. लावायला लागला ना ट्युब. बरं माझ्या समोरच्या केबिनमध्ये काम करणारा सहकारी म्हणाला,' सर, तुमच्या ह्या प्रयोगामुळे माझ्या रूमपर्यंत हवा खेळती आहे. आज फ्रेश वाटतय.'

-राजेश कापसे 9819915070

Wednesday, February 26, 2025

कपाळ, कुंकू, आई आणि तारा भवाळकर

प्रति, आदरणीय (डॅा.) श्रीमती तारा भवाळकर,

कुंकू आणि महिलांचे मानसिक आरोग्य, विधवा याबद्दल जे विचार आपण मांडले आहेत त्याबद्दल खरेतर मी काही लिहिणार नव्हतो. मी ते ऐकले आणि हल्लीच्या मराठीत सांगायचे झाले तर त्याला इग्नोअर मारले होते!

काल रात्री माझ्या ८५ वर्षांच्या इयत्ता ४ थी पास आई सोबत गप्पा मारताना तुमचा विषय निघाला. मी आईला कुंकवाबद्दलचे तुमचे संशोधनपर विचार सांगितले आणि आपण Ph.D डॅाक्टर, लेखिका आहात हेही सांगितले. तिची प्रतिक्रिया मला आवडली आणि ती आपल्यापर्यंत या जाहीर पत्रातून शेअर करावी असे वाटले.

आई म्हणाली, “ त्या बाईंना सांग, मी अशिक्षित आहे आणि मला हे कुणी सांगितले नव्हते की कुंकू लावले की मन आनंदित होते. तरीपण लग्न झाल्यावर मी तुझे वडील जिवंत असेपर्यंत कुंकू लावले. कपाळावरचे कुंकू हे माझ्यासाठी सौभाग्य होते. तुझ्या वडिलांवरील असलेल्या प्रेमाचे प्रतीक होते.तुझ्या वडिलांचा मुंबईत अपघात झाला व चार दिवसांनी एक पोलीस गंगाखेडला निरोप देण्यासाठी घरी आला. त्याने तुझे वडील सिरियस आहेत व तुम्ही लगेच मुंबईला या असे सांगितले तेंव्हा मनात शंका आली. आपल्या बाजूच्या भाभी दुसऱ्या धर्माच्या होत्या पण त्यांनी देवघरासमोरील करंड्यातील कुंकू एका कागदात बांधून ती पुडी मला ठेवायला दिली.माझं सौभाग्य टिकून राहण्यासाठी!पण ते गेले हे जेव्हा कळले तेंव्हा मी स्वतःच माझ्या कपाळावरचे कुंकू पुसले. कारण माझं सौभाग्य मला सोडून गेलं होत आणि आजपर्यंत मी कुंकू लावले नाही. त्यामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर काही परिणाम झाला नाही. दु:ख मात्र मनात कायम आहे. त्या भवाळकर बाईंना सांग, “प्रत्येक गोष्टीची नको ती चिकित्सा करायची नसते. भावना भावनेच्या ठिकाणी योग्य असतात. "

हे ऐकल्यावर मी स्तब्ध झालो. पण तुम्हाला परत काहीतरी सांगावेसे वाटले. हे पत्र लिहिण्याआधी मी तुमच्याबद्दल थोडे वाचले. आपण संशोधन केले आहे आणि आपल्या काही विद्यार्थ्यांना Ph.D देखील प्राप्त झाली आहे. मी स्वतः एक संशोधक आहे. University of London येथे M.Sc. केले आहे आणि प्रसिध्द जर्नल्समध्ये माझे शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. हे सांगण्याचे कारण असे की कोणत्याही संशोधनाबद्दल माहिती देताना त्याचा शास्त्रीय संदर्भ अभ्यासावा लागतो व मगच त्यावर चर्चा केली जाते. आपण अ.भा. साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठावरून जे काही सांगितले आहे त्याचा शास्त्रीय संदर्भ आपल्याला माहिती होता का? जर रस्त्यावर जाता येता आपण काही ऐकले असेल तर कोणत्याही शास्रीय संदर्भाशिवाय आपण मनात येईल ते बोलणे योग्य आहे का?

ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांना असे संशोधन सांगितले तर त्या ते ऐकणार नाहीत आणि शहरी सुशिक्षित स्री त्यावर विश्वास ठेवणार नाही. तसे झाले असते तर कदाचित नवरात्रात नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या टिकल्या कपाळावर दिसल्या नसत्या.

आपण जे काही व्यक्त केले त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील प्रथा परंपरांचे पालन करणाऱ्या असंख्य स्त्रियांचा अपमान केला आहे.प्रथा परंपरा या भावभावनांशी संबंधित असतात. त्यांची अनावश्यक चिकित्सा करायची नसते हा सदसदविवेक तुमच्यासारख्या लेखिकेला असू नये याचे वैषम्य वाटते.

हिंदू धर्म व त्याच्या प्रथा/ रुढी हे दोन्हीही सनातन आहेत. (सनातनचा मूळ अर्थ जे चांगलं आहे ते टिकवणं, वाईट ते सोडून देणं व नवीन स्वीकारणं- थोडक्यात परिवर्तनशीलता . सनातनचा सध्याचा अर्थ वेगळा आहे!)

त्यामुळे टिकली न लावण्याची प्रथा पाळणाऱ्या किंवा टिकली/ कुंकू लावणाऱ्या दोन्ही महिला हिंदू धर्मातच आढळतात. विधवा-टिकली हे विषय मागे टाकून हिंदू समाज पुढे गेलाय हे तुम्हाला अजून उमजलेले नाही. तुम्ही अजून ५० वर्षांपूर्वीचाच विचार धरून बसला आहात.

हे मी माझे व्यक्त केलेले विचार आहेत. आपण दुखावल्या गेला असाल तर क्षमस्व.

-राजेश कापसे, ९८१९९१५०७०

Monday, February 24, 2025

80% फुल!

परवा माझा फोन चार्जिंग करायला ठेवला होता. बॅटरीचा रंग हिरवा झाला आणि ८०% फुल.बॅटरी चार्ज झाली आहे.तुम्ही फोन वापरू शकता, अशी सुचना फोनवर दिसली. बॅटरी पुर्णपणे चार्ज होण्यासाठी ८०% पुरेसे होते. १००% चार्ज होण्याची गरज नव्हती!

माझे विचार चक्र सुरू झाले…

सकाळी ध्यान करत असताना, Headspace या मोबाईल ॲप वर ८०% फुल-Hara hachi bun me (腹八分目) ही जपानी संकल्पना ऐकली. त्याचा अर्थ असा की पोट ८०% भरेल एवढे अन्न खायला हवे. २०% भाग रिकामाच ठेवायला हवा. असे केल्यास आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. चायनीज वैद्यकीय तज्ञ म्हणतात "Chīfàn qī fēn bǎo, sān fēn han" (吃飯七分飽、三分寒) जेवण पोटाचे सात भाग भरतील एवढेच करा, एक भाग रिकामा ठेवा. अरब देशांमध्ये सुर्फैत (Surfeit) (अती खाणे) टाळावे असा सल्ला दिला जातो. आपल्याकडेही आपण स-अवकाश (सावकाश) जेवा असे म्हणतो. आम्हालाआयुर्वेद शिकवत असताना डॅा. नियती बडे चितालीया सदैव सांगत, “तुमच्या आमाशयाचे तीन भाग आहेत. एक भाग जेवण, एक भाग पाणी आणि एक भाग वायूसाठी रिकामा ठेवला तर ते आरोग्यदायी असते.”

सहज विचार केला, स-अवकाश.. ८०% पूर्ण २०% रिकामे हे जसे शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर असते तसेच ते मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही नक्कीच उपयोगी ठरू शकेल!

नवीन वर्ष सुरू झाले की मी ठरवायचो दररोज व्यायाम करायचा. मग मोबाईल ॲपवर दिवसागणिक कळायचे की किती दिवस व्यायाम केला किंवा चालायला गेलो. २५-३० दिवस झाले की काही तरी कारण, आजारपण, घरची अडचण इत्यादीमुळे त्यात खंड पडायचा. मग विचार येत असे , “नाही जमणार आपल्याला.” मग हा व्यायामाचा विषय कायमचा बंद होत असे आणि त्याहूनही मोठा परिणाम होता “मला हे नाही जमणार,मी असाच आरंभशूर आहे असे अनेक विचार मनात येत व स्वतःला आरोपी ठरवले जायचे. पण त्या ऐवजी जर २०% वेळा व्यायाम करायला जमणार नाही, ८०% वेळा जमले तरी हरकत नाही हे ठरवले असते तर कदाचित ही चांगली सवय कायमची बंद झाली नसती.

सगळे काही काटेकोरपणे झाले पाहिजे असा अट्टाहास करणारी माणसं आणि त्यांचा त्रागा बघितला की खुप वाईट वाटतं. घरातील स्वच्छता, वस्तू जागच्या जागी असणे, बेडवर बेडशीट १००% नीटनेटकी असलीच पाहिजे ह्या टोकाच्या आग्रहामुळे अनेकदा मानसिक स्वास्थ्य बिघडते. असा दुराग्रह करणारी काटेकोर व्यक्ती आणि तो सहन करणारी व्यक्ती असे दोघेही यामुळे अस्वस्थ होतात. त्या ऐवजी ८०% नीटनेटके असेल तर २०% अव्यवस्थितपणा स्वीकारायला काय हरकत आहे? त्यामुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते व सुधारणा शक्य होते. रॅाकेट सायन्समध्ये किंवा एखाद्या हृदयाच्या सर्जरीमध्ये सगळे काही १००% परिपूर्णच असायला हवे पण दररोजच्या सहज साध्या गोष्टींमध्ये २०% चूका असतील तर त्यांचा स्वीकार करून सुधारणेसाठी अवकाश ठेवायला हरकत नसावी. त्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहील असे वाटते.

-राजेश कापसे, ९८१९९१५०७०

Monday, January 13, 2025

माझे आडनाव माझी जात आणि मी..

मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो," कापसे म्हणजे ?' प्रश्नकर्त्याला खरेतर माझी जात कोणती आहे हे विचारायचे असते हे मला लगेच लक्षात येते. मी उत्तर देतो. ' अहो मी तुमच्यापैकीच आहे." मग त्यांना बरे वाटते.

माझे आडनाव कुलकर्णी,जोशी, कर्वे, बर्वे, देशपांडे, जाधव, जगदाळे, भोसले, कांबळे, गायकवाड इ.असते तर साधारणतः माझ्या जातीचा अंदाज, मला प्रश्न विचारणा-यांना आला असता.'कापसे' हे आडनाव तसे जातवाचक नसल्याने अनेकांना मी जातीने कोण ? असा प्रश्न पडतो.

समजा मी एकाच ठिकाणी इमानेइतबारे नोकरी केली असती तरी फार अडचण झाली नसती. कारण एकाच ठिकाणी ५-१० वर्ष काम केले की सहसा आपल्या देशात सर्वकाही माहिती होते किंवा माहित करून घेतले जाते. मी पडलो 'मॉडर्न' भटका विमुक्त'! मागच्या वीस वर्षात मी तीन देश आणि सात नोकऱ्या असा विक्रम केला आहे. दर तीन वर्षांनी नोकरी बदलत असल्याने विविध जाती आणि धर्माच्या लोकांना भेटतो आणि त्यांच्याबरोबर जवळून काम करतो. त्यामुळे मी कोण? हा प्रश्न माझ्या सहकार्यांना पडणे अत्यंत स्वाभाविक !

परदेशात 'Are you from India? 'yes' एवढेच पुरेसे होते. फारतर धर्म माहिती करण्याचा क्वचित प्रयत्न व्हायचा पण त्यापलिकडे कुणी फार चिकित्सा केली नाही. पण आपल्याकडे मात्र विचारू नका. मी माझी जात सांगितली नाही , की लगेच पुढचा प्रश्न, " अहो, तुमचे आजोळ कुठले ?" माझे उत्तर 'नांदेड: मामांचे नाव- देशमुख. प्रश्नकर्ता अधिकच गोंधळात पडायचा," काय करतात ?" "शेती“ मग प्रश्न विचारणारा “हो का ? बरं बरं आमच्यापैकीच वाटतं!" असे अनेकांना वाटत असे. कुणी अधिक चिकित्सक भेटला तर तो अजून काही प्रश्न विचारायचा," सासर कोणते?" वहिनींचे माहेरचे आडनांव काय?" "साबडे" हे उत्तर देताच त्याच्या चेह-यावर अजून मोठे प्रश्न चिन्ह दिसायचे. मग सहज पुढचा प्रश्न,बहीण, भाऊ काय करतात? कुठे असतात? लग्न झाली का?" त्यामध्ये उत्तर देताना बहिणीचे सासरचे नाव सांगितले की यांना हायसे वाटायचे !मग पुढे चर्चा व्हायची. " देशस्थ का ?" मला प्रश्न पडायचा एवढ्या चौकश्या का ? काय मिळतं जात समजून घेऊन ? काय साधतो आपण?

लहान असतांना गंगाखेडला आम्ही एकमेकांना जातीने हाक मारायचो पण त्यामध्ये कधी द्वेष नव्हता. आम्ही सर्व मुलं नवबौद्ध वस्तीमधील साळवे सरांकडे इंग्रजीच्या शिकवणीसाठी जात असू. अनेकवेळा मी इतर जातीच्या मित्राकडे रहायला जात असे. आमच्या घराच्या आसपास सगळीच घरे लिंगायत समाजाची होती. जातीमुळे आमच्या वागण्या बोलण्यात,एकमेकांच्या घरी जेवायला जाण्यात काही अंतर नसायचे. एक प्रकारची समरसता होती असेच म्हणावे लागेल.'कापसे 'या आडनावाची फारशी चिकित्सा कुणी केली नाही.

बारावीपर्यंत जात -आडनाव हा विषय फार कधी महत्वाचा वाटला नाही. पण १२ वीचा अभ्यास करताना मात्र आरक्षणामुळे 'जात' हा विषय जाणवायला सुरुवात झाली. पण ते तेवढ्यापुरतेच होते. १२ वी संपली. मार्क कमी मिळाले आणि M.B.B.S.ऐवजी B.A.M.S ला प्रवेश घ्यावा लागला. पुढे मुंबईला आल्यानंतरही आडनावावरून जातीची चौकशी कुणी केली नाही. पण आमच्या वर्गामध्ये जातीमध्ये विभागलेले ग्रुप मात्र तयार झाले होते. हॉस्टेलवरही थोड्याफार प्रमाणात हे जाती नुसार वर्गीकरण होते. 

पहिल्या वर्षात हॉस्टेलला प्रवेश घेतल्यानंतर तळ मजल्यावर असणाऱ्या खोलीमध्ये मला रहायला जागा मिळाली. माझ्या आडनावावरून माझ्या सिनियरला माझ्या जातीचा अंदाज आला नाही पण चार पाच महिने तिथे राहिल्या नंतर जेंव्हा माझ्या जातीचा अंदाज त्याला आला तेंव्हा मात्र त्याने मला रूम बदलायला सांगितली आणि मी हॉस्टेलच्या पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये रहायला सुरुवात केली. 'आडनाव' आणि जात' याचे चटके, भीषणता मला जाणवायला लागली.पण मुंबईत इतरत्र जात हा विषय तसा फार महत्त्वाचा नव्हता. 'मराठी' या नावाखाली सर्वच जातींचे मराठी भाषिक असं समीकरण होते.

मुंबईतील शिक्षण संपल्यानंतर मी जेव्हा संभाजीनगर (औरंगाबाद) येथे नोकरीसाठी आलो तिथे डॉ. हेडगेवार रुग्णालयात काम करतांना मला माझे आडनाव आणि माझी जात कुणीच विचारली नाही. रुग्णालयाच्या सेवावस्ती प्रकल्पामध्ये नंतर मी काम करायाला सुरुवात केली. तिथे काम करतांना 'जात' हा विषय अधिक विषण्ण करून गेला आणि मी सामाजिक समरसता मंचच्या जातींना जोडणाऱ्या, समरस करणाऱ्या कामाला सुरुवात केली.

हेडगेवार रुग्णालयातील नोकरी सोडल्यानंतर अनेक वर्ष मी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केले.लंडनला शिकायला गेलो.पण कुठेच कुणी आडनाव आणि त्यावरून जात विचारली नाही किंवा त्याची त्यांना गरजच वाटली नसावी. कारण मला माझ्या राजेश याच नावाने बोलले आणि ओळखले जायचे.​

माझ्याबरोबर काम करणारे अनेकजण दक्षिण भारतातील होते. त्यांच्याकडे तर आडनाव ही पद्धतच नव्हती. त्यामुळे जात कोणती हा प्रश्नच मनात येत नसे किंवा कुणी विचारत नसे. तिथे 'महाराष्ट्रीयन', ' कन्नडा', तमीळ इ.पुरेसे असायचे. पुढे लंडनला गेल्यानंतर एशियन पुरेसे असायचे. फारतर 'Indian' एवढीच कधीतरी चौकशी व्हायची. white, Brown, Black अशी कुजबुज कानावर येत असे कधीकधी, मी “व्हाईट”(गोरा) नाही असा विचार यायचा मनात कधी कधी. पण त्यामुळे त्रास झाला असे काही आठवत नाही. पुढे मी नायजेरियात गेलो आणि तिथे मला चक्क 'व्हाईट मॅन ' मास्टर असं काहीस संबोधण्यात येत असे. इंग्लंडमध्ये काळा असणारा मी आफ्रिकेत पांढरा झालो!!! तिथे आडनावापेक्षा रंगाने उजळ ही ओळख जास्त महत्वाची होती. चौकशी फारतर 'इंडियन का? एवढीच!

महाराष्ट्रात आडनाव-जात, देशात साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, परदेशात वर्ण, एशियन, BROWN, BLACK AFRICAN , त्वचेचा रंग पांढरा, काळा, गव्हाळ इ. वर्ण आणि धर्म यामध्ये विभागलेली हाडामासाची रक्ताची माणसं बघताना मन अस्वस्थ होते.

नायजेरियातील काम संपवून मी पुण्यात कामाला सुरुवात केली आणि जातीपातीमधील अंतर खूपच असल्याचे मला जाणवले. सगळ्यात सुरुवातीला विचारले जायचे ते आडनाव ! मी म्हणायचो,' कापसे.' उत्तर असायचे "अरे वा!आमच्यापैकीच ?" तरीपण माझी जात कोणती? हा प्रश्न अनेकांना होता. बरेचजण हा प्रश्न विचारायचेच. पुण्यात काम करताना तिथल्या एका मित्राला मी त्यांच्याच जातीचा आहे असे वाटायचे. तो सर्वांना अभिमानाने सांगायचा, 'हे आपल्यापैकीच आहेत बरं का ?                                   एकदा माझे आत्ये मामा त्यांच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आले होते. साहजिकच वार्डमधील नर्सला मी त्याबद्दल सांगितले. त्यांचे आडनाव बघताच मी कोणत्या जातीचा आहे याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. नंतर काहीजणांनी तर स्पष्टच विचारले," तुम्ही 'कापसे' मात्र तुमचे आत्ये — कसे? तुम्ही जात नक्की काय?" मला मात्र या प्रकाराचा वीट आला होता.मी उत्तर दिले," मी आर्य समाजी हिंदू आहे. आमच्यात जातीभेद नसतो." ते शांत झाले.   

पुण्यातच पुढे अजून एक गमतीशीर प्रसंग घडला. एकाने विचारले, तुम्ही कापसे म्हणजे देशावरचे का? तुमचे गोत्र काय? मी म्हणालो, "देवरात" . तो पुढे म्हणाला, “तुम्ही देशावरचे असे म्हणता. अहो देवरात हे गोत्र तिकडे नसते. जरा शोध घ्या. तुम्ही कण्व असाल." आधी धर्म, मग आडनाव, त्यावरची जात, मग त्याची उपजात, मग गोत्र, गोत्रावरून उपजातीची नको ती चौकशी हा किळसवाणा प्रकार अस्वस्थ करून गेला. गरज होती का त्याची ? 

माझे आडनाव आणि त्यावरून जात विचारणाऱ्या सर्वांना नंतर मी नम्रपणे सांगायला सुरुवात केली," मी आर्य समाजी हिंदू आहे किंवा भागवत संप्रदायाचा आहे “ हे सांगितल्यानंतर हल्ली फार कुणी चौकशीच्या फंदात पडत नाही आणि मी माझी आडनाव आणि जात यातून सुटका करून घेतली आहे ती कायमची.

पण काही वर्षांपासून एक नविन जातीभेद मी अनुभवत आहे..तुम्ही “डॅा. कापसे का? म्हणजे नेमके काय…BAMS, BHMS, DHMS की MBBS! मी त्यावर एक रामबाण उपाय शोधला आहे. माझ्या WhatsApp वरील DP वर सरळ “राजूभाई BAMS” असे लिहिले आहे…

-राजेश कापसे,

९८१९९१५०७०

deepakniramay@gmail.com

Sunday, January 5, 2025

मॅनजेमेंटचे कानमंत्र देणारे माझे गुरु : कर्नल डॉ मदन देशपांडे

२०११ मध्ये मी नुकताच लंडनहून शिक्षण घेऊन परत आलो होतो. मध्यप्रदेशातील सेवासदन आय हॉस्पिटल मध्ये एका कॉन्फरन्ससाठी गेलो असताना माझी ओळख मैत्रीच म्हणा ना कर्नल डॉ. मदन देशपांडे सरांबरोबर झाली. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. भोपाळहून मुंबईला परत येत असताना आम्ही बरोबरच निघालो.दोघांचे विमानही एकाच वेळेस होते. सर अग्निहोत्र न चुकता दररोज करतात हे मला कळले. त्यांना अग्निहोत्राबद्दल विचारले. ते कसे करायचे हे सरांनी समजावून सांगितले आणि क्षणार्धात त्यांच्याजवळ असलेले अग्निहोत्र पात्र आणि इतर अग्निहोत्राचे साहित्यही दिले. मला खूप आश्चर्य वाटले. मी त्यांना म्हणालो, "सर, इतक्या लवकर तुम्ही तुमच्या जवळचे अग्निहोत्र पात्र आणि साहित्यही मला दिलेत?" सर म्हणाले, "अरे, चांगल्या कामाला उशीर कधी करू नये.तू तयारी दाखवलीस, अगत्याने चौकशी केलीस. मग तुला ते दररोज करायचे असेल आणि मी तुला त्यात मदत करू शकत असेन तर तो निर्णय क्षणार्धात व्हायला हवा." मी One minute Manager हे पुस्तक वाचले होते पण त्याचा प्रत्यय आला!

नंतर सर व्हिजन २०२० चे अध्यक्ष झाले आणि परत एकदा माझी त्यांची भेट दिल्ली विमानतळावर झाली. मी जरा चिंतेत असल्याचे सरांना जाणवले. आम्ही दोघेही एकाच कॉन्फरन्सला जात होतो. मग एकाच कारमध्ये निघालो. जातांना त्यांनी सहज चौकशी केली, "काय झाले राजेश?" मी माझ्या अडचणी सांगितल्या. त्यांनी मला अत्यंत महत्वाचे डिप्लोमसीचे तत्व सांगितले. म्हणाले, "राजेश एक श्लोक लक्षात ठेव. दुष्ट तोचि ओळखावा, परी कळोची न द्यावा. महत्व देवोनी वाढवावा वेळोवेळी. राखावी बहुतांची अंतरे, फळ येती तदनंतरे." "हे बघ, कुठेही काही करताना सगळ्यात आधी तिथे दुष्ट कोण आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याला महत्व हवे असते.ते त्याला द्यायचे. त्याला मोठे म्हणायचे.त्यानी आपले काही बिघडत नाही. किमान तो आपल्या बाजूने होतो आणि बऱ्याच अडचणी टळतात. अनेकांची अंतरे म्हणजे मने राखावी लागतात आणि मग यश मिळते. बघ हे सूत्र वापरून नक्की उपयोग होईल." मी त्यांच्याकडून दुसरे महत्वाचे व्यवस्थापनाचे सूत्र शिकलो.

नंतर मी नायजेरियाला गेलो आणि एक दोन वर्षे सरांची भेट झाली नाही. फोनवर बोलणे होत असत. मी नायजेरियाहून परत यायचे ठरवले तेव्हा सरांना फोन केला. क्षणाचाही विचार न करता ते म्हणाले, 'जॉईन हो एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलमध्ये सी.इ.ओ म्हणून. संध्याकाळपर्यंत मला माझे नियुक्ती पत्र त्यांनी ई-मेल केले होते. सरांसोबत काम करण्याची सुवर्ण संधी मला मिळाली होती. मी ती स्वीकारली आणि पुण्याच्या एच. व्ही.देसाई आय हॉस्पिटलमध्ये सी.इ.ओ म्हणून रुजू झालो. तो शनिवारचा दिवस होता. माझ्या जॉईनिंग फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या. त्यांनी मला केबिन दिली. मग मी दुपारी त्यांना भेटलो. ते म्हणाले, 'अरे मुंबईला तुझे कुटुंब वाट बघत असेल.अनेक वर्षांनी परदेशातून परत आला आहेस. काही दिवस त्यांच्या सोबत घालव, मग ये आणि काम सुरु कर." आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी, गरजा ओळखून त्याने काही विचारण्याच्या आत त्याला मदत केली पाहिजे आणि कामाबरोबर कुटुंबही तितकेच महत्वाचे असते हे प्रत्येक प्रमुखाने लक्षात ठेवले पाहिजे हे व्यवस्थापनाचे तिसरे तत्व मी शिकलो. पुढे काम करताना कुणी कर्मचारी नीट वागला नाही तर त्याला लगेच मेमो देण्याऐवजी त्याची अडचण समजून घेण्याची सवय मी स्वतःला लावून घेतली. सरांनी ते वळण लावले.अत्यंत खेळीमेळीचे सहज वातावरण त्यांनी एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये तयार केले होते. जिथे कामासोबतच व्यक्तिगत आयुष्यही तितकेच महत्व होते.

कर्मचाऱ्यांना रजा न देण्याचा माझा स्वभाव होता. त्यांना कुणीतरी हे सांगितले. त्यांनी मला बोलावून घेतले आणि म्हणाले, "राजेश, जर कुणी रजा मागितली ती कधी नाकारायची नाही. कारण तो कर्मचारी काहीतरी कामासाठी रजा घेत असतो. रजा नाही दिलीस तर, तो काम नीट करणार नाही आणि हो जर कुणी राजीनामा दिला तर तोसुद्धा नाकारायचा नाही. त्याला शुभेच्छा देऊन मार्गस्थ करायचे. कारण जो राजीनामा देतो तो नंतर कधीच आनंदाने काम करत नाही." मी व्यवस्थापनाचे चवथे तत्व शिकलो.

सरांना कुठली परवानगी मागितली तर ते काही सेकंदात हो किंवा नाही असा निर्णय देत असत. त्यांना विचारणे मात्र गरजेचे असे. त्यांना त्याबद्दल एकदा विचारले. ते म्हणाले, 'बघ, उगाच ताटकळत कुणाला ठेवायचे नाही. तुला अधिकारी म्हणून तुझ्यासोबत असणारे सहकारी काय करणार आहेत हे माहीत असलेच पाहिजे. कारण शेवटी तू जबाबदार असणार आहेस परिणामांसाठी!" हे व्यवस्थापनाचे पाचवे तत्व त्यांनी शिकवले.

"बाप दाखव नाही तर श्राद्ध कर!" हे त्यांचे खूप आवडते तत्व. जो परिणामकारकता सिद्ध करेल त्यालाच अधिकार मिळतील. फक्त बडबड करून काहीच उपयोग नाही. स्वतःला सिद्ध करता आले पाहिजे. पुढे सरांनी मला NABH चे काम दिले आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारही दिले. त्यांच्या पाठींब्यामुळेच मी ते अवघड काम केवळ ९ महिन्यात पूर्ण करू शकलो. हे काम करताना मध्ये एक वेळ अशी आली होती की, काही कारणांनी ते मिळणार नाही. मी सरांना फोन केला. सर म्हणाले, "ठीक आहे. नाही मिळाले तर नाही. विसरून जा. दुसऱ्या कामाला लाग. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या. तू प्रयत्न केलेस हे मला माहिती आहे. ते कधीच वाया जाणार नाहीत. जो काही ८-९ लाख खर्च झाला आहे, त्याबद्दल ट्रस्टीना मी उत्तर देईन!" मी अवाक झालो आणि व्यवस्थापनापलीकडेही माणूस महत्वाचा असतो हे व्यवस्थापनाचे सहावे तत्व मी त्यांच्याकडून शिकलो. मी परत जोमाने कामाला लागलो आणि पुढे काही दिवसातच आम्हाला NABH मिळाले.

NABH मिळाले म्हणून सरांनी सर्व ट्रस्टीना बोलावून मोठा कार्यक्रम ठेवला आणि माझा सत्कार केला. नंतर गमतीने म्हणाले, "एखादे काम पूर्ण व्हायचे असेल तर चार शहाण्यांसोबत एक मेहनत करणारे गाढव असावे लागते." आम्ही दोघेही खूप हसलो आणि मी व्यवस्थापनाचे सातवे आणि महत्वाचे तत्व शिकलो.

करोना साथीनंतर मी एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल सोडून मुंबईला परत जाण्याचा निर्णय घेतला आणि सरांना ते सांगायला गेलो. त्यांच्या व्यवस्थापन तत्वानुसार त्यांनी "शुभास्ते पंथानःअस्तु!" म्हणून आशीर्वाद दिला. भारतातील नेत्र आरोग्य विषयातील एका उत्तुंग गुरुकडून मी खऱ्या अर्थाने व्यवस्थापनाची मौल्यवान तत्व शिकलो आणि आजही त्याचा उपयोग माझ्या दररोजच्या कामात होतो. सर आजही तितकेच उत्साहात मला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याकडून नवनवीन तत्व शिकायला मिळतात.अशी आयुष्यातील मौल्यवान तत्व शिकवणाऱ्या गुरूंना माझे प्रणाम!

-राजेश कापसे