आम्ही आज शिवाजी पार्क दादर येथे स्वत:चे घर घेतले. मागे वळून बघताना बरेच काही आठवते.
२००७ मध्ये मला मुंबईत नोकरी मिळाली. मग घर कुठे करायचे याच्यावर बरीच चर्चा झाली. दादर,घाटकोपर,मुलूंड,ठाणे,डोंबिवली उतरत्या क्रमाने सगळीच ठिकाणं महाग न परवडणारी म्हणून कल्याण त्यातल्या त्यात बरे म्हणून नक्की केले. पुढची पाच वर्षे कल्याणहून दादर १ तास व तिथून मालाड ४५ मि. व तसाच परतीचा प्रवास दररोज किमान चार तास लागणार.अनेकवेळा वाटले की दादरला शिफ्ट व्हावं.पण मनाची तयारी व्हायची नाही. महाग असेल,परवडणार नाही शाळांचा खर्च परवडेल का? असे प्रश्न.कल्याणहून एकवेळ अमेरिकेत शिफ्ट होणे सोपे असेल पण माझ्या मराठी मनाची दादरला जाण्याची हिम्मत होत नसे.
माझे त्यावेळचे बाॅस आणि त्याहीपेक्षा मित्र श्रीनिवास सावंत हे २०१० ते २०१२ सातत्याने मला कल्याणहून दादरला शिफ्ट होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. मला असं वाटत की त्यांनी उपनगरात राहणाऱ्या मराठी माणसांनी दादरमध्ये रहायला यावे यासाठी सतत प्रयत्न करण्याचा पण केला आहे. शेवटी २०१२ मध्ये मी दादरला राहण्यास यायचे ठरवले. दोन वर्ष लागली मनाची तयारी करायला!
माझ्यासोबत काम करणारी पूजा म्हणाली, "अरे किंग जाॅर्ज शाळेत तुझ्या मुलाच्या प्रवेशासाठी अर्ज तर कर. मिळेल ॲडमिशन". मी अर्ज केला आणि साधारणत: एक महिन्याने मला शाळेतून फोन आला. प्रवेशासाठी तुमच्या मुलास कागदपत्रांसह घेवून या!" अजून दादरमध्ये घर घ्यायचे होते. पण अर्णवला शाळेत घेऊन गेलो. शाळेत त्याला प्रवेश मिळाला पण दादरमध्ये घर असेल तरच असे सांगण्यात आले. तो थोडाच कल्याण ते दादर प्रवास करणार होता!
मग घराची शोधाशोध सुरू झाली. डाॅ. अनंत पंढरे सरांना फोन केला. मी त्यांना संकटमोचक म्हणतो. आजपर्यंतच्या माझ्या यशाचे ते शिल्पकार आहेत. त्यांनी परांजपे काकांचा फोन दिला आणि मग श्री. प्रमोद जोशींची ओळख झाली. त्यांना परदेशात मुलाकडे रहायला जायचे होते व त्यांचे दादरचे घर भाड्याने द्यायचे होते. त्यांनी मला ओळखत असलेल्या दोन व्यक्तींचा फोन द्यायला सांगितला. मी म्हणालो विद्यार्थी परिषदचं मी काम केलं आहे. त्यांनी विनयजी सहस्त्रबुद्धे यांना फोन केला. मग म्हणाले 'विनयजींनी सांगितलं आहे नि:शंकपणे राजेशला घर द्या. तो परिषदेचा कार्यकर्ता आहे." घराची व्यवस्था झाली. प्रमोदकाकांनी मला मागचे पाच वर्षे त्यांच्या मुलासारखे प्रेम केलंय. मग केले नक्की आणि दादरला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.
माझी पत्नी प्रज्ञाने मला पुर्ण साथ दिली आणि आम्ही कल्याणहून दादरला आलो. डाॅ. नियती चितालीया मॅडमनी आम्हाला दादरमध्ये स्थिरावण्यासाठी मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय इथे स्थिरावणे शक्यच नव्हते.
या प्रवासात मदत केलेल्या सर्वांचे आभार, या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे सिमोल्लंघन शक्य झाले.
-राजेश कापसे, 9819915070
deepakniramay@gmail.com
No comments:
Post a Comment