






वयाच्या चाळीशीत टक्कल पडायला सुरुवात झाली. सुरुवातीला वाटलं — “अरे दोन केस गेले तर काय होतं?”
पण ४५ व्या वर्षी परिस्थिती अशी झाली की डोक्यावरचा “प्लॉट” पूर्ण रिकामा झाला.
आरशात बघताना वाटायचं — “हा मी की माझ्या आजोबांचा फोटो?”
हॉस्पिटलमध्ये माझा डॉक्टर मित्र Hair Transplant करून आला. ६–७ महिन्यांत तर त्याचे केस असे भरले की पाहून मला वाटलं — अरे बाप रे, हा तर परत २५ चा झालाय!
तेव्हा मीही मनाशी ठरवलं, “बस्स! आता माझ्या टकलावरही शेती करायचीच.”
पण मुद्दे कठीण:
खर्च — भारी!
संपूर्ण टक्कल करणे — दु:खद!
दाढीचे केस उपटणे — भीषण!
लोकल अॅनेस्थेशिया — सुयांचा पाऊस!
मित्र म्हणाला “कर रे! काही होत नाही!”
बायको म्हणाली “करायलाच पाहिजे! मला माझा नवरा पुन्हा तरुण दिसायला हवा!”
(आणि इथेच माझा निर्णय पक्का झाला.)
Transplant center मध्ये गेल्यावर माझी तपासणी झाली. मग माझे केस टक्कल करून मार्किंग सुरू झाले.
लोकल अॅनेस्थेशिया देताना इतक्या सुया टोचल्या की मला वाटलं — “हे भयंकर आहे. शक्य होईल का मला?”
दाढीचे केस काढताना काय वेदना! आणि मग तेच केस सुयांनी टोचून माझ्या टकलावर रोपण!
मी मनात म्हणत होतो — “डोक्यावर शेती करण्यापेक्षा ऊसाची शेती केली असती तर बरे झाले असते. किमान गोड तरी लागले असते!”
दुसऱ्या दिवशी उठलो तर चेहरा पूर्ण सुजलेला!
क्षणभर वाटलं — “हे काय… केस वाढवायला आलो होतो आणि सुजलेला भयंकर चेहरा घेऊन घरी आलो?”
डॉक्टर शांत स्वरात म्हणाले : “दोन दिवसात उतरते.”
मी घाबरलेला: “माझं आयुष्य उतरतंय की सुज उतरतेय?”
आठवड्यानंतर खपल्या काढल्या. मग सुरू झाली प्रतिक्षा…
दररोज आरशात बघणे सुरू झाले — जणू काही IPL auction मधला खेळाडू जसा आपला नंबर कधी लागतोय म्हणून वाट पाहतो, तसा मी केस कधी उगवतील म्हणून वाट बघत होतो.
५–६ महिन्यांनी शेवटी पहिला केस उगवला!
तो एक केस पाहून मी इतका आनंदी झालो जसा शेतकऱ्याला पहिला मोसमी पाऊस आला की होतो.
मग गोळ्या, लोशन, खास शॅम्पू, बिसलेरीचे पाणी — माझा टक्कल राजा आता VIP treatment घेत होता.
हळूहळू “शेती” भरभरून यायला लागली.
आणि आज…
पाहता पाहता टक्कल केसांनी भरून गेले..आणि माझा आत्मविश्वास परत आला आणि मीही किमान 10 वर्षांनी तरी कमी वयाचा दिसायला लागलो!
-राजेश कापसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा