Monday, December 9, 2024

माझे वजनाचे प्रयोग

    वर्ष २००२ पर्यंत (वय २६ वर्ष) माझे वजन ७६ किलो ते ८० किलो या दरम्यान असायचे. माझ्या १७४ से. मी. उंची साठी ते तसे योग्य होते.कारण पोट कधी दिसायचे नाही. २००३ मध्ये लग्न झाले आणि नंतर वजन वाढीने मात्र वेग कधी धरला ते कळलेच नाही. ७६ किलोपासून ८६ किलोपर्यंत एका वर्षात मजल मारली. माझ्या ढेरीने फेर धरायला सुरूवात केली, चपळता कमी झाली. अचानक एक दिवस पाठ दुखायला सुरूवात झाली.     फिजीयोथेरपिस्टकडे गेलो आणि त्यांनी व्यायाम करावयास आणि वजन कमी करायला सांगितले. त्यांनी विचारले, “तुमचे कॅालेजात शिकत असतांना वजन किती होते?” मी म्हणालो ७६ किलो.” त्या म्हणाल्या, “ दहा किलो वजन कमी करा.” माझे वजन कमी करण्याचे प्रयोग सुरू झाले.

    मी सहज बोलून गेलो, “ दहा किलो वजन कमी करायचे आहे.” आपल्या देशात ९०% लोक डाएटिशीयन आहेत हे माझ्या लगेच लक्षात आले. मी फक्त वजन हा शब्द उच्चारला आणि मला अनेक सल्ले फुकट मिळाले.

1. भात बंद करा

2. रात्रीचे जेवण बंद करा

3. गोड बंद करा

4. चहा बंद करा

5. फळे खा

6. किमान एक तास चाला, व्यायाम करा.

7. ८०% डायट आणि २०% व्यायाम याने वजन कमी होते

8. पोहायला जा

9. सायकल चालवा

10. कपालभाती करा (तेंव्हा रामदेव बाबा नुकतेच उदयास येत होते )

11. आयुर्वेदिक औषधे सुरू करा

12. गरम पाणी, लिंबू, मध असे सकाळी उपाशी पोटी घ्या.

13. योगा करा

14. जोर दंड बैठका काढल्या तरी खुप आहे.अमुक एक वैद्य या वयात २०० दंड बैठका काढतात

15. तू डबल हाडी आहेस, म्हणून वजन जास्त आहे, उगाच ते कमी करायच्या फंदात पडू नको.

16. त्या काळी दिक्षीत आणि दिवेकर प्रकाशझोतामध्ये यायचे होते.त्यामुळे मला दोन वेळा खा किंवा दोन दोन तासांनी खा, असा सल्ला कोणीही दिला नाही.

17. तुझे मसल मास जास्त आहे, स्नायूंचे वजन जास्त आहे, काळजी करू नकोस

    अशा अनेक सल्ल्यांपैकी मी नेमके काय करावे ? हा गहन प्रश्न होता. माझे एक जवळचे आयुर्वेदिक डॅाक्टर मित्र वजन कमी करण्याचा दवाखाना चालवायचे. ते एक विशिष्ट तेल प्यायला द्यायचे आणि मग औषधे आणि  डाएटने वजन कमी करायचे. ते वजन कमी करण्यासाठी खुप प्रसिध्द झाले होते. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी एका मशीनने माझ्या शरीरात किती फॅट आहेत ते तपासले आणि काही रक्ताच्या तपासण्या केल्या. साधारणतः आयुर्वेदिक डॉक्टर नाडी तपासतात. पण हे जरा वेगळे वैद्य होते. मी सर्व काही त्यांनी सांगितले तसे केले. डॉक्टरांनी मला एक तेलाची बाटली आणि काही       आयुर्वेदिक गोळ्या दिल्या. ते तेल वाढत्या क्रमाने प्यायचे होते (३०, ४०, ५०, ६०, ९०,१२० मिली). जिभेला लिंबू लाऊन मी ते तेल पीत असे. हा सगळ्यात अवघड प्रकार होता. ते तेल प्यायल्यानंतर दिवसभर भूक लागत नसे. रात्री भूक लागल्यानंतर मी एक पोळी आणि वरण असे जेवण घेत असे. त्या तेलात आणि गोळ्यात काय औषधे आहेत हे मात्र त्या डॉक्टरांनी सांगितले नाही. मोघम असे काहीतरी सांगितले म्हणजे त्यात तीळाचे तेल आहे त्रिफळा आहे इ .आयुर्वेदिक डॉक्टर असे काही सांगत नसतात असा माझा अनुभव आहे. पहिल्या सहा दिवसातच माझे तीन किलो वजन कमी झाले. एकदम हलके वाटायला लागले. नंतर त्यांनी मला सकाळी एक पोळी/भाकरी आणि एक वाटी वरण आणि रात्री परत तेच असा आहार सांगितला. फळे, भाज्या, साखर, गूळ, मध, बटाटे, भात, पोहे, उपमा, साबुदाणा असे सर्व बंद करायला सांगितले. सुरुवातीला केवळ दोन वेळा आणि ते सुद्धा फक्त एक पोळी आणि वरण असे खाल्ल्यामुळे डोके दुखत असे. पण नंतर सवय झाली आणि म्हणता म्हणता केवळ तीन महिन्यात माझे १२ किलो वजन कमी झाले. एकदम हलके वाटायला लागले, मला माझे सर्व कपडे बदलावे लागले. आता एकदम मी दहा वर्षांनी लहान दिसायला लागलो! पण कुठलीच अवस्था चिरंतन नसते. मला वाटले की आता वजन कधीच वाढणार नाही. डॉक्टरांनी डायट वजन कमी झाल्यानंतरही सुरु ठेवायला सांगितले पण मी मात्र त्यांचा तो सल्ला काही मनावर घेतला नाही. मला वाटले आता वजन कमी झाले आहे ते कधीच वाढणार नाही. मी व्यायामही करत नव्हतो.यथेच्छ गोड, तीन वेळा जेवण, अधून मधून आईस्क्रिम,वड़ा पाव……पुढील केवळ एक वर्षात मी परत ९२ किलोपर्यंत कधी पोचलो ते कळलेच नाही. परत तेच… वाढलेली ढेरी, चालताना होणारा त्रास, वाढलेला आळस….

    आता वजन कमी करण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. मी संभाजीनगरला (औरंगाबाद) काही कामासाठी गेलो होतो. तिथे अनेक वर्षांनंतर माझे एक मित्र भेटले. सुरुवातीस मी त्यांना ओळखलेच नाही. कारण त्यांनी किमान सात किलो वजन कमी केले होते. स्वाभाविकच मी त्यांना वजन कमी करण्यासाठी काय केले? हा प्रश्न विचारला. ते म्हणाले “दिक्षीत डाएट “. तेंव्हा दिक्षीत डाएट नुकतेच फेमस होत होते. त्यांनी मला     डॅा. दिक्षीतांचा फोन नंबर दिला. मी त्यांच्याशी संपर्क केला आणि माझ्या वाढलेल्या वजनाबद्दल सांगितले. त्यांनी काही प्रश्न विचारले आणि मला एका वॅाट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. माझ्यासारखाच ओबेसिटीचा पॅटर्न असलेल्या समवयस्क व्यक्तीची ओळख करून दिली. त्याने मला दिक्षीत डाएट समजावून सांगितले.

1. दोनच वेळा खायचे. अगदी गोळ्यासुद्धा त्याच वेळी घ्यायच्या.

2. जेवणात प्रोटीन, कार्ब, सलाड असावे, गोड कमी, साखरेचा चहा, कॉफी वगैरे सगळं बंद.

3. अगदीच भूक लागली तर ताक किंवा एखादा टोमॅटो चालेल.

    असे काहीसे डाएट करायला सांगितले. मी ते लगेच सुरू केले. सकाळी ११ वाजता पहिले जेवण आणि रात्री ८ वाजता दुसरे जेवण असा क्रम सुरू केला. ४५ मिनिटे चालायला सुरवात केली. म्हणता म्हणता माझे वजन कमी व्हायला सुरुवात झाली. मी पुन्हा ७६ किलोचा झालो. हलके वाटायला लागले. ब्लड प्रेशरची गोळी ५ मिलीग्राम वरून २.५ मिलीग्रामवर आली. सगळेजण कौतुकाने चौकशी करायला लागले. कांहीजण म्हणाले, “दिक्षीतांची मात्रा लागू पडली वाटतं!” पण कांहीच दिवसांनी दिवाळी आली आणि मी दिक्षीतांची रजा घेतली ती कायमची… पुढच्या एक वर्षात मी परत ९२ किलोचा कधी झालो ते कळलेच नाही! परत तेच… वाढलेली ढेरी, चालताना होणारा त्रास, वाढलेला आळस….

परत दिक्षीत डाएट सुरू करावे असे वाटले पण नंतर मी ते करू शकलो नाही. एकदोन दिवस करायचो आणि परत किचनमध्ये जाऊन फ्रिजमध्ये असलेली चॅाकलेट्स, आईस्क्रीमवर ताव मारत असे. मग मी दिक्षीतांचा नाद कायमचा सोडला. पुढे काही महिने तसेच गेले.

एक मित्र अनेक दिवसांनी भेटला. म्हणाला, “किती वजन वाढलंय. काहीतरी कर मित्रा. करिनाने बघ झिरो फिगर केली आहे दिवेकरांच्या मदतीने. मी दिवेकरांचे पुस्तक विकत घेतले आणि अधाश्यासारखे वाचून काढले. त्या पुस्तकाच्या आधारे दर दोन तासांनी काय आणि कसे खायचे याचे वेळापत्रक तयार केले. पण झाले भलतेच..ज्या प्रमाणात खायचे ते मात्र मी कधीच पाळले नाही. दोन दोन तासांनी यथेच्छ खाल्ले आणि मी वजनाची शंभरी कधी पार केली ते कळलेच नाही. मला आता अनेक त्रास सुरू झाले होते..गुडघे दुखी, धाप लागणे, ब्लड प्रेशर वाढणे, छातीत दुखणे….

माझ्या हॅास्पिटलमधील हाऊसकिपींग सुपरवायझर मला भेटायला आले होते. त्यांना मी अनेक महिन्यांनी भेटलो होतो. ते एकदम सडपातळ दिसत होते. त्यांनी २५ किलो वजन कमी केले होते.वास्तविकपणे मी त्यांना सल्ला विचारला…ते म्हणाले, “सर, काळजी करू नका. मी आता डाएट कोच आहे. तीन महिन्यात तुमचे २० किलो वजन कमी करून देतो.” ते लगेच वजनकाटा घेऊन आले. माझे वजन, उंची, बी.एम.आय.ची मोजमापे घेतली आणि म्हणाले, “सर दोन वेळा शेक घ्यायचा, चहाची तलफ आली तर ही पावडर एक चमचा गरम पाण्यात टाकायची आणि प्यायचे. सकाळी आमचा एक वॅाटसॲप ग्रुप आहे त्यामध्ये ५ ते ६ व्यायाम करायचा. म्हणता म्हणता २० किलो कमी..” मी हे सगळे सुरू केले. वजन कमी करण्याचा हा माझा नवीन प्रयोग होता. दोन महिने हे सर्व केले पण फारसा फरक पडला नाही. मग सोडून दिले. माझे वजन फार कमी झाले नाही.

त्याच दरम्यान मला पाठदुखीचा त्रास होऊ लागला. मी माझ्या एका ॲार्थोपेडीक सर्जन मित्राकडे गेलो. तो म्हणाला, “ काय राजेश, काय बेढब झाला आहेस. पाठ दुखणारच. गोळ्या लिहून देतो, पण वजन कमी करावेच लागेल.” त्याने मला किटो डाएट करायला सांगितले. हेच काय ते शिल्लक राहिले होते. मी ते नेटाने केले आणि माझे वजन कमी व्हायला सुरुवात झाली. मी परत २० किलो वजन कमी करू शकलो. आता परत एकदा हलके वाटत होते. मित्र म्हणाला, “हे बघ. आता डाएट हा तुझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. सोडलेस तर परत वजन वाढेल. भात,भाकरी कमी कर, पोळी पूर्ण बंद. वरण, पनीर,अंडी, मासे, चिकन याचे प्रमाण जरा जास्त ठेव. तुप किंवा खोबरेल तेल वापर. गोड पूर्ण बंद. जेवण औषध आहे, ते प्रमाणातच खाल्ले पाहिजे. दररोज व्यायाम हवाच.” यावेळी वजन कमी केल्यानंतर मी मात्र कानाला खडा लावला आणि खाणे नियंत्रित केले. दररोज चालायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्टीची सवय व्हायला वेळ लागतो. पण एकदा सवय झाली की ते अंगवळणी पडते. मग त्याचा त्रास होत नाही. आई सदैव म्हणते त्याचे महत्त्व पटले, “ अन्न तारी,अन्न मारी,अन्न विकार करी…”.

राजेश कापसे

९८१९९१५०७०

11 comments:

  1. राजेश अत्यंत वास्तववादी लेख तसेच इतरांना मोलाचं मार्गदर्शन ह्या लेखातून आपोआप होत आहे ,लेखन शैली नेहमी सारखीच ओघवती
    छान
    कर्नल मदन देशपांडे व्हि एस एम

    ReplyDelete
  2. लेख अत्यंत आवडला. जणू काही माझ्या मनातील भावनाच व्यक्त केल्या. अजुन ही माझे स्वतःच्या वजनाशी संघर्ष चालू आहे. ह्या लेखामुळे आणखीन प्रेरणा मिळाली. शुभेच्छा!💐🙏

    ReplyDelete
    Replies
    1. सर, खुप खुप आभार! आपला मराठवाड्यातील आहार , भाकरी पिठलं, ठेचा हा सर्वोत्तम आहे हे मला आता कळले आहे. त्यामुळे वजन नक्की कमी होते.

      Delete
  3. अगदी बरोबर आणि वास्तववादी विषय मांडला आहे. माणूस हा सवयीचा गुलाम झाला आहे. जशा सवयी लाऊ तसे त्याचे परिणाम. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर. 😊

    ReplyDelete
    Replies
    1. खरे आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य उत्तम राहावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

      Delete
  4. मस्त लेख.वजन घटवण्याचे उत्तम प्रयत्न 👌👌👍

    ReplyDelete
  5. उपयुक्त माहिती आहे

    ReplyDelete
  6. लेख वाचन कधी पूर्ण झालं समझल नाही, खूप छान लेख, नियमी प्रमाणे

    ReplyDelete
  7. धन्यवाद कृष्णा जी

    ReplyDelete