माझ्या मोठ्या मुलाने मला एकदा प्रश्न विचारला “डॅड, तू कधी ब्रोक झाला आहेस का?” मी विचारले “मला कळले नाही. ब्रोक होणे म्हणजे नेमके काय असते?” तो म्हणाला, “अरे सगळे पैसे खतम…सगळे काही गहाण ठेवून बरबाद होणे म्हणजे ब्रोक होणे..” मी म्हणालो, “नाही अरे तसे नाही झाले कधी.. मी आर्थिक नियोजन व्यवस्थित केले आहे…आणि करतो आहे.” मला २५ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. माझे मामा श्री मधुकर कुलकर्णी यांनी मला आर्थिक नियोजन कसे करायचे ते शिकविले.
माझं बी.ए.एम.एस.चे शिक्षण पूर्ण झाले आणि मी संभाजीनगर येथील चितेगावला माझी प्रॅक्टिस करायचे ठरवले. प्रॅक्टिस सुरु करण्यापूर्वी माझे मामा श्री मधुकर कुलकर्णी यांनी एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, "हे बघ, आता तू व्यावहारिक जीवन जगायला सुरुवात करत आहेस. तुझ्या खिशात सदैव ५०० रुपयांची नोट असली पाहिजे. खर्च झाले की लगेच ते ५०० रुपये परत पाकीटात जमा झाले पाहिजेत. तो बेसिक बॅलेन्स तुझ्या पाकीटात असणे गरजेचे आहे." २००१ मध्ये रुपये ५०० ही रक्कम मोठी होती. मी त्यांचा सल्ला ऐकला आणि तेवढे पैसे माझ्याजवळ ठेवायला सुरुवात केली.नंतर जशी मिळकत वाढली तशी पाकिटातील बॅलेन्स रक्कमही मी वाढवत गेलो. मी कधीच गरजा वाढवल्या नाहीत आणि कधी माझ्या पाकीटातील रक्कमही कमी होऊ दिली नाही. या मोलाच्या आर्थिक नियोजनाच्या सल्ल्यामुळे आजतागायत असंख्य फायदे झाले आहेत.
नंतर लग्न ठरले.त्याआधी स्वतःचे घर असले पाहिजे असा आग्रह सुरु झाला. मला पगार कमी होता.त्यामुळे गृह कर्ज मिळणे शक्य नव्हते. मग माझी मोठी बहीण सौ.ज्योती व भाऊजी श्री गोविंद पाटील यांनी मला त्यांच्या नावावर कर्ज मिळवून दिले आणि मी घर घेतले. दोन लाख रुपये कर्ज घेतले. घर झाले, पण लग्नासाठी जेंव्हा आम्ही चर्चेला बसलो आणि खर्च काढला तेव्हा एक दिवसाच्या या लग्न नावाच्या इव्हेंटचा खर्च होता अडीच लाख रुपये. मी, माझ्या आणि बायकोच्या घरच्यांना सांगायचा प्रयत्न केला, "अहो हा खर्च करण्यापेक्षा मी माझ्या घराचे कर्ज फेडतो आणि लग्न साधे करू." पण कुणीच ऐकले नाही. वर आणि वधु पक्षांनी ५०:५० टक्के असे पैसे खर्च करून हा आमचा लग्न नावाचा एक दिवसाचा इव्हेंट पार पडला. नंतर मी पुढील दहा वर्ष माझ्या घराचे कर्ज व्याजासहीत फेडत राहिलो. योग्य निर्णय घेतला असता तर कदाचित पुढील अनेक वर्ष कर्ज फेडत बसावे लागले नसते
घराचे कर्ज, कमी पगार, घराचा खर्च हे सगळे गणित मी एका डायरीवर महिन्याच्या सुरुवातीला लिहीत असे. माझ्या खिशातील बॅलन्स कसा सुरक्षित ठेवायचा त्याचा विचार मनात असायचा. ताळमेळ चुकत होता. मी जास्त पगाराची नोकरी शोधायला सुरुवात केली. ती मिळालीही पण हे लक्षात आले की जिथे जास्त पैसा असतो तिथे समाधान नसते आणि जिथे समाधान असते तिथे पैसा फारसा नसतो! एक दिवसाच्या लग्न नावाच्या इव्हेंटसाठी मी पैसे नावाच्या रॅट रेस मध्ये अडकलो तो कायमचा! पैसे नसताना कर्ज घेऊन घर घेणे, पैसे नसताना एक दिवसाच्या इव्हेंटवर अमाप खर्च करणे हे गरजेचे असते का? पैसे असतील तर ठीक आहे पण नसताना? युधिष्ठिराला यक्षाने जे प्रश्न विचारले होते त्यापैकी एक प्रश्न होता, "जगात दुःखी कोण असतो?" त्यावर त्याचे उत्तर होते, "ज्या व्यक्तीवर कर्ज असते तो!" हा यक्ष प्रश्न आणि युधिष्ठिराचे उत्तर मला सदैव विचार करायला प्रवृत्त करते.
पुढे मला जास्त पगाराची नोकरी मिळाली आणि त्यासोबत त्या नोकरीच्या चिंताही पॅकेज मध्ये मिळाल्या. मी मुंबई नावाच्या महानगरीत कल्याण ते मालाड लोकल ट्रेनने प्रवास करणारा चाकरमानी झालो. पैसे जास्त मिळायचे पण खर्च आणि ताणतणावही वाढले. माझ्या पाकीटातील ५०० रुपयाचा बॅलन्स बिघडलेलाच होता. माझा एक गुजराथी मित्र विपुल ज्याच्याकडे कधीच वानवा नसे. त्याला मी गमतीने विपुल कॉ-ऑप बँक म्हणत असे, तो मला जेव्हा लागतील तेव्हा पैसे द्यायचा. एकदा मी त्याला विचारले, "विपुल मला पैसे कधीच पुरत नाहीत. तुझ्याकडे मात्र पैसे सदैव असतात. मला जरा आर्थिक नियोजन शिकव ना." त्याने मला मोलाचा सल्ला दिला, "हे बघ, आपली कमाई आपल्यालाच माहीत असली पाहिजे. लोकांना सांगितली की गणित बिघडते. आपण बडेजावात जातो आणि हॉटेल, पार्टी, घरच्यांच्या दागिन्यांच्या अपेक्षा एक ना अनेक या नको त्या वस्तूंमध्ये रुपया खर्च करतो. आपण जेवढे पैसे कमावतो त्यापेक्षा किमान ३०% कमी पैसे मिळतात असे समजून राहिलेले पैसे बचत करायचे आणि घरच्यांना सांगतानाही मिळणारा पगार ३०% कमी सांगायचा. मग आर्थिक गणित नीट बसते." आर्थिक नियोजनाचा हा कानमंत्र मला सदैव मदत करत आला आहे.
कल्याणला असताना मी व माझ्या पत्नीने संभाजीनगरच्या घराचे कर्ज फेडले. आम्ही कल्याणला भाड्याच्या घरात राहत होतो. संभाजीनगरच्या घराचे भाडे येत होते.कर्ज नव्हते.आता जरा बरे दिवस आले होते. मग घरातील सर्वानी आग्रह सुरु केला, "मुंबईत घर पाहिजे. नाहीतर काही खरे नाही. किती दिवस भाड्याच्या घरात राहणार." आम्ही परत दबावाला बळी पडलो.कर्ज-हप्ता-पगार-हातउसने या दुष्ट चक्रात अडकलो आणि 'स्वतःचे घर' या भ्रामक कल्पनेसाठी पुढील 20 वर्षांसाठी बँकेचा गुलाम झालो. बचत शून्य, कर्ज मोठे, हप्ता मोठा, हातउसने घेतलेल्यांचा हप्ता मोठा.. या चक्रव्यूहात आम्ही अडकलो. घरी वास्तूशांती झाली. सर्वांनी मुंबईत घर झाले म्हणून कौतुक केले.हॉल मोठा आहे हां, बेडरूम गार्डन फेसिंग आहे असे बरेच काही ऐकवले. आम्हाला मात्र कर्जाचा डोंगर कसा फेडायचा हा यक्ष प्रश्न भेडसावत होता. माझ्या पाकीटातील रुपये ५०० चे बॅलन्स परत बिघडत होते. मग परत त्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी हाच पर्याय होता. त्या नोकरीतील पॅकेजसोबत येणारे ताणतणावाचे पॅकेजही सोबत होतेच! मला नशिबाने जास्त पगाराची नोकरी मिळाली व बायकोनेही नोकरी करायला सुरुवात केली, पण जगण्यासाठी वेळ मात्र मिळत नव्हता. विपुल एक दिवस म्हणाला, 'राजेश सगळ्यात महाग कोणती वस्तू असेल तर ती वेळ आहे. ती परत कधीच येत नाही. विचार कर." गुजराथी मित्रांचा वस्तू हा शब्द मला खूप आवडतो. विपुलने वेळ या वस्तूबद्दल मला विचारात टाकले. नऊ तासाची नोकरी, पाच तास प्रवास, मग घरातील कामे यानंतर स्वतःसाठी आणि घरासाठी वेळ तसा कधीच मिळत नव्हता!
याच दरम्यान माझी ओळख लोकसत्तामध्ये अर्थविषयक लेख लिहिणारे श्री वसंत कुलकर्णी यांच्यासोबत झाली. त्यांनी मला काही मोलाचे सल्ले दिले आणि मी ते अंमलात आणले. ते म्हणाले प्रथम कर्ज आहे हे वास्तव स्वीकार, ज्या गुंतवणुकीसोबत इन्शुरन्स आहे अशी गुंतवणूक बंद कर. चांगला हेल्थ इन्शुरन्स घे. चुकून काही बरे वाईट झाले तर आपल्यानंतर कुटुंबाला मदत व्हावी व कर्जाचा डोंगर त्यांच्यावर पडू नये म्हणून एक करोड रुपयांचा टर्म इन्शुरन्स घे आणि जर चुकून अपघात झाला व अपंगत्व आले तर ते कव्हर होण्यासाठी अपंगत्व विमा काढ तो खूप स्वस्त असतो. त्याचबरोबर त्यांनी अजून दोन महत्वाचे सल्ले दिले. न चुकता म्युच्युअल फंड मध्ये थोडी थोडीशी गुंतवणूक कर आणि मुलांची वार्षिक फी, गाडीचा विमा, आरोग्य विमा, कौटुंबिक सहल, वार्षिक सण यासाठी प्रत्येक महिन्यात एक ठराविक रक्कम जमा कर ज्यामुळे कुणाकडून कर्ज घ्यावे लागणार नाही. मी त्यांचे हे सर्व सल्ले काटेकोरपणे पाळले आणि त्याचा परिणाम असा झाला की मला कधीच कुणाकडून हातउसने घ्यावे लागले नाहीत. मुलांच्या शाळेच्या फी किंवा गाडीचा वार्षिक विमा, कर्जाचा हप्ता कधी चुकला नाही. काही वर्षातच कर्जही आटोक्यात येऊ लागले. तीन चार मोठी आजारपणे होऊन गेली पण आरोग्य विमा असल्यामुळे त्याचा आर्थिक फटका कधी बसला नाही. माझे व्यक्तिगत अर्थव्यवस्थेचे आरोग्य आजपर्यंत उत्तम राहिले आहे,आणि हो, माझ्या खिशातील ५०० रुपयांची नोटही अबाधित आहे! श्री मधुकर कुलकर्णी, डॉ. विपुल कक्कड, श्री वसंत कुळकर्णी ह्या माझ्या अर्थकारणातील गुरुंमुळे माझे आर्थिक व्यवस्थापन उत्तम झाले आहे.
Lekha Khupach Sundar aahe.
ReplyDeleteवर्णन भावना व नियोजन खुप खुप सुंदर लिहिले आहेस तुला आता कुठलीच मार्गदर्शन ची आवश्यकता भासणार नाही पुढील आयुष्य छानच जाणार माझा आशिर्वाद आहेच 🌹🌹ALL THE BEST 🌹Madhukar Kulkarni
ReplyDelete