आरसपानी

📖 About Araspani आरसपानी — मनाच्या ओलाव्यातून उमटलेले शब्द. (Araspani – Words born from the quiet drizzle of thought.) लेखक: डॉ. राजेश कापसे ✨ अनुभव, विचार आणि जीवनातील छोट्या क्षणांची गोष्ट. 🌐 www.rajeshkapsebooks.com 📸 Instagram: @rajubhai_bams

About Araspani / आरसपानी विषयी

📖 About Araspani आरसपानी — मनाच्या ओलाव्यातून उमटलेले शब्द. (Araspani – Words born from the quiet drizzle of thought.) लेखक: डॉ. राजेश कापसे ✨ अनुभव, विचार आणि जीवनातील छोट्या क्षणांची गोष्ट. 🌐 www.rajeshkapsebooks.com 📸 Instagram: @rajubhai_bams

सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

असा रविवार, ५२ आठवडे यावा!

शनिवारी रात्री ११ वाजता हॅास्पिटलचे काम संपवून परतलो. थकलो होतो खुप.सकाळच्या सातच्या लोकलची चिंता नव्हती. गाढ झोप लागली.सकाळी ९ वाजता खिडकीत आलेल्या कबूतराच्या आवाजाने झोप मोडली.

डाव्या हाताला ठेवलेल्या बासरीच्या कव्हरने खिडकीला मारले.कबूतराचा आवाज बंद झाला.

आईच्या नऊवारी पातळाची गोधडी डोक्यावर घेऊन परत गाढ झोपलो.वाटले तिच्या कुशीत झोपलो आहे अनेक वर्षांनी!चक्क ११ वाजता उठलो.आंघोळ,पूजा आटोपली.

ओट्सचा नाश्ता, काळी कॅाफी घेऊन तंबोरा लावला आणि रियाज सुरू!

ई स्केलच्या बासरीवर षड्ज, ऋषभ, कोमल गंधार, मध्यम, पंचम, धैवत, कोमल निषाद या स्वरांमध्ये हरवून गेलो. "खेलो श्यामसंग आज होली "ही काफी रागाची बंदिश मस्त जमली. तासभर कुठे गेला कळलेच नाही.

मग स्वतःच भाकरी तयार करायचा प्रयोग केला.बायको भाजी तयार करून मिटींगसाठी गेली होती.जेवण आटोपले आणि मग ओशोचे Empty Boat ऐकत बसलो.मग तासभर काहीच केले नाही.पूर्ण रिकामा, फोन नाही, फेसबुक नाही, WhatsApp नाही.ऑफिसचा फोन नाही,निवांत एकांत!!

ओजस सोबत माऊंट मेरी, मन्नत, बॅंडस्टॅंडवर मनसोक्त फिरून आलो.

संध्याकाळी बायकोसोबत कवि सौमित्रच्या कवितांचा कार्यक्रम ऐकायला गेलो. असा रविवार..वर्षभर ५२ आठवडे यावा!

-राजेश कापसे

९८१९९१५०७०

एक वर्तुळ पुर्ण झाले!

वर्ष २००० मध्ये मी B.A.M.S.चे शिक्षण पूर्ण केले आणि पुढे काय? हा प्रश्न मनात होता. मुळात पर्याय नव्हता म्हणून मी B.A.M.S. शिकलो होतो. १२ वीमधे केमिस्ट्रीमध्ये ५ मार्क कमी मिळाले आणि M.B.B.S. हुकले. अर्थात मार्क चांगले असणे हाच एक पर्याय होता. M.B.B.S. चे शिक्षण विकत घेण्यासाठी पैसेही नव्हते. शेवटी B.A.M.S. चा पर्याय स्वीकारला.

B.A.M.S.संपल्यानंतर मनात विचार आला, जरा वेगळे काही करावे, शिकावे,मग कुणीतरी T.I.S.S.मधून Masters in Hospital Administration बद्दल सुचवले.मी तिथे गेलो.वाटले द्यावी प्रवेश परीक्षा आणि घ्यावा प्रवेश. शक्य होतं ते, पण,थांबलो क्षणभर आणि विचार केला, “बहिणींना आणि आईला किती त्रास द्यायचा.दिला तेवढा आर्थिक ताण खुप झाला,स्वत:च्या पायावर उभे रहायला हवे.” सरळ औरंगाबाद गाठले आणि जवळच्या चितेगावला प्रॅक्टीस सुरू केली.आधी M.B.B.S. आणि मग T.I.S.S चे Masters in Hospital Administration नाही जमले.पैसे मिळायचे पण चितेगावच्या प्रॅक्टीसमध्ये मन रमेना.वेगळे काहीतरी करायचे होते.मग सरळ डॅा. हेडगेवार रूग्णालयात नोकरी करायला सुरवात केली. मेडिसीन विभागात केलेले काम, मग सेवावस्ती प्रकल्पातील काम,HIV-AIDS प्रकल्पातील काम सुंदर दिवस होते ते!

Health Management आवडायला लागले आणि मुंबईत Avert Society मध्ये नोकरी पकडली. वेश्या, हिजडे, कैदी, समलिंगी व्यक्ती एक ना अनेक समाजघटकांत काम करायची संधी मिळाली.शेवटी तिथे मन रमेना.मग Sightsavers मध्ये नोकरी मिळाली आणि सार्वजनिक नेत्र आरोग्य या विषयावर काम करायची संधी मिळाली. जगभर फिरलो. लंडनला London School of Hygiene and Tropical Medicine या संस्थेत M.Sc.करायला गेलो.परत आल्यानंतर नायजेरियात जाऊन आलो आणि मग Hospital Management मध्ये रस निर्माण झाला आणि एच.व्ही.देसाई आय हॅास्पिटल आणि आता शंकरा आय हॅास्पिटलमध्ये हॅास्पिटल मॅनेजमेंटमध्ये काम करतोय. B.A.M.S. संपल्यानंतर सरळ T.I.S.S. मधून Masters in Hospital Administration केले असते तर सरळ कुठल्यातरी हॅास्पिटलमध्ये नोकरी मिळाली असती.पण हा सुंदर प्रवास झाला नसता. या प्रवासात किती माणसं भेटली. झोपडपट्ट्या ते वेश्या वस्त्यांपर्यंतचे अनेक विषय कळले.खरेतर समृध्द झालो.

T.I.S.S.मधील Masters in Hospital Administration च्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी शंकरा आय हॅास्पिटलने मला पाठवले होते.त्या सुंदर झाडांमध्ये असलेल्या T.I.S.S.च्या कॅम्पसमध्ये माझा २३ वर्षांच्या भूतकाळात रमून गेलो. एक वर्तुळ पुर्ण झाले!

-राजेश कापसे, ९८१९९१५०७०

संगीत आपल्याला वर्तमानात आणते!

मला अनेक वेळा प्रश्न पडायचा, आपण गाणे का ऐकतो? गाणे भान हरपून ऐकतो. नेमकं काय असतं त्यात भान हरपण्यासारखं? जेव्हा बासरी शिकायला लागलो तेव्हा त्याचा उलगडा झाला. माझ्या मनात दिवसभरात झालेल्या घटनांबद्दलचे, कधीकाळी झालेल्या अपमानाचे तर कधी मिळालेल्या पुरस्काराचे आणि कौतुकाचे विचार घोंगावत असतात. एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला बघितले की लगेच मन दूर भविष्यात घेऊन जाते. ही विचारांची भूत आणि भविष्यकाळातील ये जा कायमची सुरु असते. त्यात आनंद, दुःख, ताण-तणाव, उदासीनता अशा अनेक गोष्टी असतात आणि या विचारांचा अतिरेक झाला की आपण अस्वस्थ होतो.

या विचारांच्या धावपळीत मात्र आपण वर्तमानात खूपच कमी वेळ असतो.आपले मन कधी भविष्यात तर कधी भूतकाळात, कधी कुणाबद्दल द्वेष तर कुणाबद्दल प्रेम यात असते.भानावर येणे जमतच नाही, ते कायम पुढे मागे असते. ते कधी हरवतही नाही. शांत झोप लागल्यानंतर जरा विश्रांती मिळते पण जागेपणी मात्र मनाचे उपदव्याप सुरूच असतात. याबद्दल खूप वेळा विचार केला पण उत्तर कधी मिळाले नाही.

एकदिवस बासरी वाजवताना मला षड्ज वाजवता येत नव्हता. गुरुजी म्हणाले, डॉक्टर षड्ज नीट लागायला हवा असेल तर तुम्ही इथे शरीराने आणि मनाने उपस्थित असायला पाहिजे. मी त्यावेळी हॉस्पिटलच्याच विचारात होतो. माझा फोन कधी वाजेल आणि कधी हॉस्पिटलला जावे लागेल हाच विचार मनात होता. जेंव्हा त्यातून स्वतःला सावरले, फोन बंद केला आणि तंबोऱ्यासोबत षड्ज लावला आणि तो लागला तेव्हा मी फक्त तिथे त्या स्वरासोबत होतो.भान हरपून...वर्तमानात! गाणं आपल्याला रिलॅक्स करत, कारण त्यात आपण आपल्याला विसरतो आणि केवळ वर्तमानात असतो त्या गाण्यासोबत, त्या स्वरांसोबत!

-राजेश कापसे

९८१९९१५०७०

आयुष्यातील शेवटच्या क्षणांमध्ये साथ देणारी : पॅलिएटिव्ह केयर     

काही दिवसांपूर्वी सिप्ला फाउंडेशनच्या कार्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो. तिथे पॅलिएटिव्ह केयर बद्दल एक पत्रक वाचले. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात कॅन्सर (३४%), दमा-श्वसनाचे विकार असलेले रुग्ण (१०.%), हृदय रोग (३८.५%), एड्स (५.%), मधुमेह (४.६%) अश्या आजारांनी पीडित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक शारीरिक आणि मानसिकरित्या त्रासलेले असतात. रुग्णाला मरण यातना सहन होत नाहीत आणि नातलगांना त्या बघवत नाहीत. अशा परिस्थितीत गरज असते पॅलिएटिव्ह केयरची म्हणजेच वेदना कमी करण्यासाठी लागणारी औषधे वेळेत दिली जाणे आणि नातलगांना मानसिक आधार देणे, त्यांचे समुपदेशन करणे महत्वाचे असते.

    प्रामुख्याने तीव्र वेदना आणि श्वासोश्वासाला त्रास होणे या दोन गोष्टींचा सामना हे रुग्ण करत असतात. त्यांना गरज असते वेदनाशामक औषधांची आणि योग्य प्रमाणात प्राणवायू देण्याची. हे उपचार वेळेत दिले गेले तर मरण यातना काही प्रमाणात कमी होऊन मृत्यू तरी सुखद होतो. आपला आजार बरा होणार नाही हे सत्य रुग्णांनी स्वीकारलेले असते. कधीतरी प्राणज्योत मालवणार आहे हे सुद्धा मनाने स्वीकारलेले असते पण मरण यातना असह्य झालेल्या असतात. कधी एकदाचा मुक्त होतो अशी अवस्था अनेक रुग्णांची असते. मृत्यूने हे सर्व प्रश्न सुटणारे असतात पण त्याबाबतची अनिश्चितता आणि वेदना असह्य अशा असतात. किमोथेरपी घेऊनही बरा न होणार कॅन्सर, असह्य वेदना, एखादी बरी न होणारी जखम आयुष्य नकोनकोसे करून टाकते. दमा-श्वसनाच्या विकाराने खोकून खोकून रुग्ण हैराण होतात. श्वास घेताना होणार त्रास असह्य झालेला असतो. तीच अवस्था असते एड्सच्या शेवटच्या अवस्थेतील रुग्णांची, खंगलेले शरीर, विविध आजारांमुळे आणि वेदनांनी अत्यवस्थ झालेले रुग्ण आणि त्याहूनही त्रासलेले नातलग बघितले की मृत्यू किती वेदनादाई असू शकतो याची कल्पनाही करवत नाही.

    सिप्ला फाउंडेशनतर्फे अशा रुग्णांना वेळेत मदत केली जाते. योग्य ती वेदनाशामक औषधे, ऑक्सिजन, दमा काही करण्यासाठीची औषधे दिली जातात. तसेच रुग्ण आणि नातलगांना मानसिक आधार देण्याचे काम ही संस्था करते. शेवटच्या या वेदनादायी क्षणांमध्ये साथ देण्यासाठी त्यांनी 'साथ साथ' ही हेल्पलाईन सुरु केली आहे. ज्यांना मदतीची आवश्यकता आहे असे रुग्ण किंवा त्यांचे नातलग 1800-202-7777 या क्रमांकावर संपर्क करून योग्य ती मदत मिळवू शकतात. शेवटच्या वेदनादायी क्षणांमध्ये साथ देणाऱ्या सिप्ला फौंडेशनला सलाम!

रविवार, २२ डिसेंबर, २०२४

आर्थिक नियोजनाची बाराखडी गिरवताना!

माझ्या मोठ्या मुलाने मला एकदा प्रश्न विचारला “डॅड, तू कधी ब्रोक झाला आहेस का?” मी विचारले “मला कळले नाही. ब्रोक होणे म्हणजे नेमके काय असते?” तो म्हणाला, “अरे सगळे पैसे खतम…सगळे काही गहाण ठेवून बरबाद होणे म्हणजे ब्रोक होणे..” मी म्हणालो, “नाही अरे तसे नाही झाले कधी.. मी आर्थिक नियोजन व्यवस्थित केले आहे…आणि करतो आहे.” मला २५ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. माझे मामा श्री मधुकर कुलकर्णी यांनी मला आर्थिक नियोजन कसे करायचे ते शिकविले.

माझं बी.ए.एम.एस.चे शिक्षण पूर्ण झाले आणि मी संभाजीनगर येथील चितेगावला माझी प्रॅक्टिस करायचे ठरवले. प्रॅक्टिस सुरु करण्यापूर्वी माझे मामा श्री मधुकर कुलकर्णी यांनी एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, "हे बघ, आता तू व्यावहारिक जीवन जगायला सुरुवात करत आहेस. तुझ्या खिशात सदैव ५०० रुपयांची नोट असली पाहिजे. खर्च झाले की लगेच ते ५०० रुपये परत पाकीटात जमा झाले पाहिजेत. तो बेसिक बॅलेन्स तुझ्या पाकीटात असणे गरजेचे आहे." २००१ मध्ये रुपये ५०० ही रक्कम मोठी होती. मी त्यांचा सल्ला ऐकला आणि तेवढे पैसे माझ्याजवळ ठेवायला सुरुवात केली.नंतर जशी मिळकत वाढली तशी पाकिटातील बॅलेन्स रक्कमही मी वाढवत गेलो. मी कधीच गरजा वाढवल्या नाहीत आणि कधी माझ्या पाकीटातील रक्कमही कमी होऊ दिली नाही. या मोलाच्या आर्थिक नियोजनाच्या सल्ल्यामुळे आजतागायत असंख्य फायदे झाले आहेत.

नंतर लग्न ठरले.त्याआधी स्वतःचे घर असले पाहिजे असा आग्रह सुरु झाला. मला पगार कमी होता.त्यामुळे गृह कर्ज मिळणे शक्य नव्हते. मग माझी मोठी बहीण सौ.ज्योती व भाऊजी श्री गोविंद पाटील यांनी मला त्यांच्या नावावर कर्ज मिळवून दिले आणि मी घर घेतले. दोन लाख रुपये कर्ज घेतले. घर झाले, पण लग्नासाठी जेंव्हा आम्ही चर्चेला बसलो आणि खर्च काढला तेव्हा एक दिवसाच्या या लग्न नावाच्या इव्हेंटचा खर्च होता अडीच लाख रुपये. मी, माझ्या आणि बायकोच्या घरच्यांना सांगायचा प्रयत्न केला, "अहो हा खर्च करण्यापेक्षा मी माझ्या घराचे कर्ज फेडतो आणि लग्न साधे करू." पण कुणीच ऐकले नाही. वर आणि वधु पक्षांनी ५०:५० टक्के असे पैसे खर्च करून हा आमचा लग्न नावाचा एक दिवसाचा इव्हेंट पार पडला. नंतर मी पुढील दहा वर्ष माझ्या घराचे कर्ज व्याजासहीत फेडत राहिलो. योग्य निर्णय घेतला असता तर कदाचित पुढील अनेक वर्ष कर्ज फेडत बसावे लागले नसते

घराचे कर्ज, कमी पगार, घराचा खर्च हे सगळे गणित मी एका डायरीवर महिन्याच्या सुरुवातीला लिहीत असे. माझ्या खिशातील बॅलन्स कसा सुरक्षित ठेवायचा त्याचा विचार मनात असायचा. ताळमेळ चुकत होता. मी जास्त पगाराची नोकरी शोधायला सुरुवात केली. ती मिळालीही पण हे लक्षात आले की जिथे जास्त पैसा असतो तिथे समाधान नसते आणि जिथे समाधान असते तिथे पैसा फारसा नसतो! एक दिवसाच्या लग्न नावाच्या इव्हेंटसाठी मी पैसे नावाच्या रॅट रेस मध्ये अडकलो तो कायमचा! पैसे नसताना कर्ज घेऊन घर घेणे, पैसे नसताना एक दिवसाच्या इव्हेंटवर अमाप खर्च करणे हे गरजेचे असते का? पैसे असतील तर ठीक आहे पण नसताना? युधिष्ठिराला यक्षाने जे प्रश्न विचारले होते त्यापैकी एक प्रश्न होता, "जगात दुःखी कोण असतो?" त्यावर त्याचे उत्तर होते, "ज्या व्यक्तीवर कर्ज असते तो!" हा यक्ष प्रश्न आणि युधिष्ठिराचे उत्तर मला सदैव विचार करायला प्रवृत्त करते.

पुढे मला जास्त पगाराची नोकरी मिळाली आणि त्यासोबत त्या नोकरीच्या चिंताही पॅकेज मध्ये मिळाल्या. मी मुंबई नावाच्या महानगरीत कल्याण ते मालाड लोकल ट्रेनने प्रवास करणारा चाकरमानी झालो. पैसे जास्त मिळायचे पण खर्च आणि ताणतणावही वाढले. माझ्या पाकीटातील ५०० रुपयाचा बॅलन्स बिघडलेलाच होता. माझा एक गुजराथी मित्र विपुल ज्याच्याकडे कधीच वानवा नसे. त्याला मी गमतीने विपुल कॉ-ऑप बँक म्हणत असे, तो मला जेव्हा लागतील तेव्हा पैसे द्यायचा. एकदा मी त्याला विचारले, "विपुल मला पैसे कधीच पुरत नाहीत. तुझ्याकडे मात्र पैसे सदैव असतात. मला जरा आर्थिक नियोजन शिकव ना." त्याने मला मोलाचा सल्ला दिला, "हे बघ, आपली कमाई आपल्यालाच माहीत असली पाहिजे. लोकांना सांगितली की गणित बिघडते. आपण बडेजावात जातो आणि हॉटेल, पार्टी, घरच्यांच्या दागिन्यांच्या अपेक्षा एक ना अनेक या नको त्या वस्तूंमध्ये रुपया खर्च करतो. आपण जेवढे पैसे कमावतो त्यापेक्षा किमान ३०% कमी पैसे मिळतात असे समजून राहिलेले पैसे बचत करायचे आणि घरच्यांना सांगतानाही मिळणारा पगार ३०% कमी सांगायचा. मग आर्थिक गणित नीट बसते." आर्थिक नियोजनाचा हा कानमंत्र मला सदैव मदत करत आला आहे.

कल्याणला असताना मी व माझ्या पत्नीने संभाजीनगरच्या घराचे कर्ज फेडले. आम्ही कल्याणला भाड्याच्या घरात राहत होतो. संभाजीनगरच्या घराचे भाडे येत होते.कर्ज नव्हते.आता जरा बरे दिवस आले होते. मग घरातील सर्वानी आग्रह सुरु केला, "मुंबईत घर पाहिजे. नाहीतर काही खरे नाही. किती दिवस भाड्याच्या घरात राहणार." आम्ही परत दबावाला बळी पडलो.कर्ज-हप्ता-पगार-हातउसने या दुष्ट चक्रात अडकलो आणि 'स्वतःचे घर' या भ्रामक कल्पनेसाठी पुढील 20 वर्षांसाठी बँकेचा गुलाम झालो. बचत शून्य, कर्ज मोठे, हप्ता मोठा, हातउसने घेतलेल्यांचा हप्ता मोठा.. या चक्रव्यूहात आम्ही अडकलो. घरी वास्तूशांती झाली. सर्वांनी मुंबईत घर झाले म्हणून कौतुक केले.हॉल मोठा आहे हां, बेडरूम गार्डन फेसिंग आहे असे बरेच काही ऐकवले. आम्हाला मात्र कर्जाचा डोंगर कसा फेडायचा हा यक्ष प्रश्न भेडसावत होता. माझ्या पाकीटातील रुपये ५०० चे बॅलन्स परत बिघडत होते. मग परत त्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी हाच पर्याय होता. त्या नोकरीतील पॅकेजसोबत येणारे ताणतणावाचे पॅकेजही सोबत होतेच! मला नशिबाने जास्त पगाराची नोकरी मिळाली व बायकोनेही नोकरी करायला सुरुवात केली, पण जगण्यासाठी वेळ मात्र मिळत नव्हता. विपुल एक दिवस म्हणाला, 'राजेश सगळ्यात महाग कोणती वस्तू असेल तर ती वेळ आहे. ती परत कधीच येत नाही. विचार कर." गुजराथी मित्रांचा वस्तू हा शब्द मला खूप आवडतो. विपुलने वेळ या वस्तूबद्दल मला विचारात टाकले. नऊ तासाची नोकरी, पाच तास प्रवास, मग घरातील कामे यानंतर स्वतःसाठी आणि घरासाठी वेळ तसा कधीच मिळत नव्हता!

याच दरम्यान माझी ओळख लोकसत्तामध्ये अर्थविषयक लेख लिहिणारे श्री वसंत कुलकर्णी यांच्यासोबत झाली. त्यांनी मला काही मोलाचे सल्ले दिले आणि मी ते अंमलात आणले. ते म्हणाले प्रथम कर्ज आहे हे वास्तव स्वीकार, ज्या गुंतवणुकीसोबत इन्शुरन्स आहे अशी गुंतवणूक बंद कर. चांगला हेल्थ इन्शुरन्स घे. चुकून काही बरे वाईट झाले तर आपल्यानंतर कुटुंबाला मदत व्हावी व कर्जाचा डोंगर त्यांच्यावर पडू नये म्हणून एक करोड रुपयांचा टर्म इन्शुरन्स घे आणि जर चुकून अपघात झाला व अपंगत्व आले तर ते कव्हर होण्यासाठी अपंगत्व विमा काढ तो खूप स्वस्त असतो. त्याचबरोबर त्यांनी अजून दोन महत्वाचे सल्ले दिले. न चुकता म्युच्युअल फंड मध्ये थोडी थोडीशी गुंतवणूक कर आणि मुलांची वार्षिक फी, गाडीचा विमा, आरोग्य विमा, कौटुंबिक सहल, वार्षिक सण यासाठी प्रत्येक महिन्यात एक ठराविक रक्कम जमा कर ज्यामुळे कुणाकडून कर्ज घ्यावे लागणार नाही. मी त्यांचे हे सर्व सल्ले काटेकोरपणे पाळले आणि त्याचा परिणाम असा झाला की मला कधीच कुणाकडून हातउसने घ्यावे लागले नाहीत. मुलांच्या शाळेच्या फी किंवा गाडीचा वार्षिक विमा, कर्जाचा हप्ता कधी चुकला नाही. काही वर्षातच कर्जही आटोक्यात येऊ लागले. तीन चार मोठी आजारपणे होऊन गेली पण आरोग्य विमा असल्यामुळे त्याचा आर्थिक फटका कधी बसला नाही. माझे व्यक्तिगत अर्थव्यवस्थेचे आरोग्य आजपर्यंत उत्तम राहिले आहे,आणि हो, माझ्या खिशातील ५०० रुपयांची नोटही अबाधित आहे! श्री मधुकर कुलकर्णी, डॉ. विपुल कक्कड, श्री वसंत कुळकर्णी ह्या माझ्या अर्थकारणातील गुरुंमुळे माझे आर्थिक व्यवस्थापन उत्तम झाले आहे.

हळुवार मनाचा बॉस श्रीनिवास !

एव्हर्ट सोसायटीमध्ये आणि HIV-एड्स या विषयावर काम करण्याचा खूप कंटाळा आला होता. अनेक वर्षांपासून मी HIV-एड्स या विषयावर काम करत होतो. दुसरे म्हणजे मुंबईतील नवीन ठिकाणी काम करणे मला कठीण वाटत होते. मुंबईत स्थलांतरित होण्याचा निर्णय, घराची संपूर्ण जबाबदारी आणि नवीन नोकरीतील अडचणी अश्या अनिश्चित वातावरणात मी मुंबईत नवीन नोकरी शोधायला सुरुवात केली. माझ्यासोबत काम करणारे श्री खाडिलकर सर मला म्हणाले, "डॉक्टर खूप अस्वस्थ दिसताय. नवीन नोकरी शोधताय असे कळले. एक काम करा,' साइटसेव्हर्स ' या संस्थेमध्ये प्रोग्राम ऑफिसर या पदासाठी जागा निघाली आहे. बघा अर्ज करून.मी अर्ज केला आणि मला मुलाखतीला बोलावण्यात आले. त्यावेळी मी काही कामासाठी दिल्लीत गेलो होतो.

मला फोन आला, "मी श्रीनिवास सावंत बोलतोय, साइटसेव्हर्स मधून. तुमची मुलाखत (इंटरव्ह्यू)आहे १५ तारखेला." मी एकदम आनंदी झालो. समोरचा आवाजही आश्वासक होता. मी मुंबईत परतलो आणि मालाडला साइटसेव्हर्सच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे माझी प्रोग्राम ऑफिसर या पदासाठी मुलाखत घेण्यात आली.आधी ग्रुप डिस्कशन मग प्रेझेंटेशन नंतर मुलाखत असा क्रम होता. मुलाखतीसाठी सात आठजण आले होते. अगदी फर्डे इंग्लिश बोलणारे. त्यांच्यापुढे माझा निभाव लागेल की नाही अशी शं का मनात होती. पण आश्चर्य म्हणजे माझे प्रेझेंटेशन सर्वांपेक्षा चांगले झाले. मुलाखतही उत्तम झाली. एक आठवड्यानंतर मला एच.आर.मॅनेजर ऍंथोनी यांचा फोन आला, 'अहो तुमची निवड झाली आहे पण तुमचा बायोडाटा जरा व्यवस्थित लिहा. जे काम आत्तापर्यंत केले आहे ते नीट येऊ द्या त्यात." मी श्रीनिवास सावंतांना भेटलो. ते म्हणाले, 'अरे काय राजेश, एवढा चांगला इंटरव्ह्यू दिलास, तुझा बायोडेटा असा कसा लिहिला आहेस. चल मी तुला सांगतो तसे बदल कर आणि तो परत पाठव.' श्रीनिवास यांनी मला मार्गदर्शन केले आणि माझ्याकडून उत्तम बायोडाटा लिहून घेतला. मला प्रश्न पडला, 'का मदत केली असेल यांनी मला?" माझ्यासारख्या अनोळखी माणसाला का कोण मदत करेल? हा माणूस वेगळा आहे." साधारणतः एक आठवड्यानंतर मला श्रीनिवास यांचा फोन आला, ' राजेश, अभिनंदन तुझी निवड झाली आहे. २ मे रोजी कामावर रुजू हो. मिळून काम करू." या माणसाचे आभार कसे मानू ? माझ्याकडे शब्द नव्हते!

कामावर रुजू झालो आणि सार्वजनिक नेत्र आरोग्य या विषयात काम कसे करायचे, प्रोजेक्ट प्रपोजल कसे लिहायचे, नवीन पार्टनर संस्थांचे परीक्षण कसे करायचे अशा अनेक गोष्टी श्रीनिवास यांनी मला शिकवल्या. मग आम्ही सोबत प्रवास केला आणि अनेक संस्थांना भेटी दिल्या. प्रवास करताना सामाजिक काम कसे करायचे याचे प्रशिक्षण मला श्रीनिवास यांच्याकडून मिळाले. हा माणूस हाडाचा समाजसेवक असल्याची जाणीव मला झाली. साधारणतः तीन महिन्यानंतर श्रीनिवास यांनी मला भेटायला बोलावले आणि म्हणाले, 'हे बघ, तुझे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तुला मी आय हॉस्पिटलचे सर्व प्रकल्प सोपवतो. योग्य नियोजन कर आणि कामाला सुरुवात कर. ऑल द बेस्ट!" काम करतांना त्यांनी कधीच बॉसगिरी केली नाही की अनावश्यक सूचना केल्या नाहीत. पूर्ण विश्वास टाकून, मला काम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ते माझे एक उत्तम मित्र झाले,बॉस नाही! त्यांच्यासोबत बोलतांना कधी भीती वाटली नाही. त्यांना भेटल्यानंतर एक वेगळा आत्मविश्वास निर्माण व्हायचा.

त्यांनी आमची एक सुंदर टीम तयार केली होती. श्रीनिवास, मी, सबित्रा, कल्पना, केतन, श्वेता असे आम्ही सर्वजण मिळून अंधत्व निवारण, अपंगांचे पुनर्वसन अशा विविध विषयांवर चर्चा करत असू व त्यातून त्या विषयावर प्रकल्प तयार करून आम्ही ते यशस्वीपणे राबवत असू. आमच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौ एलिझाबेथ कुरियन यांच्या मार्गदर्शनाने व श्रीनिवासजींच्या प्रयत्नाने आम्ही अंधत्व निवारणासाठी विदर्भात मोठे प्रकल्प सुरू केले, रेटीनोपथी ॲाफ प्रिमॅच्युरिटी या नवजात बालकांमघ्ये अंधत्व निर्माण करण्याऱ्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्रात मोठा प्रकल्प राबवला आणि आजही तो सुरू आहे.

दादर ते मालाड आम्ही सोबत प्रवास करत असू. या दरम्यान अनेक विषयांवर चर्चा होत असत. मी एकदा त्यांना म्हणालो, "श्रीनिवास, मला लंडन स्कूल ऑफ हायजिन मध्ये M.Sc.करायचे आहे." ते म्हणाले, 'तुझी इच्छा आहे ना, मग ते नक्की होईल. पुढील दोन वर्षे मला व्यवस्थित काम करून दाखव. मी तुला मदत करीन." पुढील दोन वर्षे मी अनेक प्रकल्प सुरु केले आणि मन लावून काम केले. आणि त्यांना म्हणालो, 'श्रीनिवास , दोन वर्ष झाली आहेत आणि मी माझ्या परीने कामही केले आहे. आजही माझी M.Sc. करण्याची इच्छा आहे.' ते शब्दाचे पक्के होते. त्यांनी माझी ओळख लंडन स्कूल ऑफ हायजिन मधील प्रोफेसर डॉ.क्लेयर गिल्बर्ट यांच्याशी करून दिली आणि मला त्यांच्यासोबत प्रकल्प दाखवण्यासाठी पुण्याला पाठवले. लहान मुलांमधील रेटिनोपथी या विषयावर त्या संशोधन करत होत्या आणि माझा प्रकल्प त्यांना नक्की आवडेल हे श्रीनिवास यांना माहीत होते. पुण्याला जाताना ते म्हणाले, 'राजेश , प्रकल्प दाखवल्यानंतर त्यांना तुझ्या M.Sc.बद्दल नक्की सांग. त्या मदत करतील तुला." मी त्यांनी जसे सांगितले तसे केले आणि आश्चर्य म्हणजे डॉ.क्लेयर गिल्बर्ट यांनी मला लंडन स्कूल ऑफ हायजिन मध्ये M.Sc.करता येईल व त्यासाठी त्या नक्की मदत करतील असे आश्वासन दिले. माझा माझ्यावर विश्वासच बसत नव्हता. नंतर एका महिन्यातच मला प्रवेश मिळाला आणि शिष्यवृत्ती सुद्धा! साइटसेव्हर्सने मला एक वर्षाची रजा द्यावी यासाठी श्रीनिवास यांनी खूप प्रयत्न केले आणि मी लंडनला जायला निघालो. माझे अनेक वर्षांचे अशक्य असे स्वप्न श्रीनिवास यांच्यामुळे प्रत्यक्षात आले! त्यांचे आभार मानायला गेलो. म्हणाले, 'अभिनंदन! मी काहीच केले नाही. तुझ्या नशिबात होते ते आणि you deserve it! आता चांगल्या मार्कांनी पास हो.!" हा भला माणूस आयुष्यात आला नसता तर लंडनमधील M.Sc.हे फक्त स्वप्नच राहिले असते!

मी लंडनहून परत आलो आणि पुढील काही दिवसातच माझे प्रोग्राम मॅनेजर म्हणून प्रमोशन झाले. आत्तापर्यंत स्वतः काम करत होतो. या प्रमोशननंतर मला इतरांकडून काम करून घ्यायचे होते. ते अधिक कठीण होते. माझ्या कामाचा आवाका वाढवणे गरजेचे होते. त्यासाठी श्रीनिवास यांनी मला मार्गदर्शन केले आणि मॅनेजर म्हणून घडवले. मुंबई आय केयर कॅम्पेनचे काम खूप कठीण होते. लंडन येथील ऑफिसबरोबर जवळून काम करावे लागे. मी ते आत्मविश्वासाने करत असल्याचे पाहून श्रीनिवास म्हणाले, 'राजेश प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून चांगले काम करत आहेस. लवकर शिकलास. हे असेच उत्तम करत राहा." त्यांच्याकडून मिळालेली ही कौतुकाची थाप मला खूप काही देऊन गेली. साईटसेव्हर्स मधील नोकरी, मग प्रशिक्षण, लंडन मधील शिक्षण आणि नंतर प्रमोशन हे केवळ शक्य झाले श्रीनिवास यांच्या परीस स्पर्शानेच!!

आज साईटसेव्हर्स सोडून ११ वर्ष झाली आहेत तरी पण आमची मैत्री कायम आहे!

राजेश कापसे,

९८१९९१५०७०

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

सर्दी, आयुर्वेद आणि मी!

ऋतू बदलला की सर्दी, शिंका, ताप, खोकला, दम लागणे,मग सीट्रीझीन, पॅरासिटेमॅाल, अँटीबायोटीक, नेब्युलायझेशन, स्टीरॅाईडचा अस्थमासाठीचा पंप असा साधारणत: अनेक वर्षांपासूनचा हा माझा आरोग्यक्रम. अगदी वर्षातून किमान चार वेळा नक्कीच असतो.मग काही दिवस रजा, कामावर रूजू झाल्यानंतर अस्वस्थ करणाऱ्या शिंका हे नेहमीचेच असते.

आयुर्वेदाचे शिक्षण घेऊनसुध्दा मी कधी आयुर्वेदिक पध्दतीने या माझ्या आजारावर उपाय केले नाहीत. कारणे खुप होती.वेळ जास्त लागेल, कामावर लवकर रूजू होता येणार नाही, खर्च अधिक होईल,बरा होईन की नाही याबद्दलही मनात शंका असे.

यावेळी वसंत सुरू झाला आणि अगदी ठरल्याप्रमाणे मला सर्दी झाली. हे मला नवीन नव्हते. पण यावेळी मी सीट्रीझीन, अँटीबायोटीक, पॅरासिटेमॅाल किंवा स्टेरॅाईड स्प्रे घ्यायचे नाहीत आणि केवळ आयुर्वेदातील सिध्दांतानुसार स्वत:वर उपचार करायचे ठरवले.

शिंका, नाकातून शेंबूड हे सुरू झाले. मी मीठ, हळद आणि कोमट पाणी वापरून दिवसातून दोन वेळा जलनेती करायला सुरुवात केली. यामुळे सायनस व नाकातील सर्व कफ निघून जाई आणि नाक स्वच्छ होत असे. कोणताही बाम किंवा तत्सम नाक मोकळे करणाऱ्या औषधांचाही वापर टाळला ( हे बामवाले स्वतःला आयुर्वेदिक म्हणत असले तरी असा कोणताही संदर्भ आयुर्वेद ग्रंथात नाही. किमान सर्दी झाल्यानंतर बाम लावा असे मी तरी कधीच वाचलेले नाही!) जलनेतीमुळे नाक चोंदणे हा प्रकारही घडला नाही. घसाही स्वच्छ होत असे.

मी दुसरा उपाय केला तो म्हणजे एक दिवस संपूर्ण विश्रांती घ्यायचे ठरवले. फोन नाही, लॅपटॅापवरील काम नाही, प्रवास नाही, मिटींग नाही इ.

तिसरा उपाय म्हणजे लंघनाचा. मी चोवीस तास काहीही खाल्ले नाही. प्रतिःश्याय बरा करण्यासाठी लंघनाचा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे. लंघना दरम्यान मी गरम पाणी प्यायलो.

याचा परिणाम असा झाला की, मी तिसऱ्या दिवशी ६०% बरा झालो, चवथ्या दिवशी पुर्णपणे बरा झालो आणि पाचव्या दिवसापासून आवाजही पूर्वीसारखा झाला.

एकही पैसा न खर्च करता आयुर्वेदातील सिध्दांत वापरून मी केवळ पाच दिवसांत पूर्ण बरा झालो. Miracle of Ayurveda!

(सूचना : असा प्रयोग केवळ तज्ञ वैद्य अथवा डॅाक्टरच्या सल्ल्यानेच करावा.)

सोमवार, ९ डिसेंबर, २०२४

माझे वजनाचे प्रयोग

    वर्ष २००२ पर्यंत (वय २६ वर्ष) माझे वजन ७६ किलो ते ८० किलो या दरम्यान असायचे. माझ्या १७४ से. मी. उंची साठी ते तसे योग्य होते.कारण पोट कधी दिसायचे नाही. २००३ मध्ये लग्न झाले आणि नंतर वजन वाढीने मात्र वेग कधी धरला ते कळलेच नाही. ७६ किलोपासून ८६ किलोपर्यंत एका वर्षात मजल मारली. माझ्या ढेरीने फेर धरायला सुरूवात केली, चपळता कमी झाली. अचानक एक दिवस पाठ दुखायला सुरूवात झाली.     फिजीयोथेरपिस्टकडे गेलो आणि त्यांनी व्यायाम करावयास आणि वजन कमी करायला सांगितले. त्यांनी विचारले, “तुमचे कॅालेजात शिकत असतांना वजन किती होते?” मी म्हणालो ७६ किलो.” त्या म्हणाल्या, “ दहा किलो वजन कमी करा.” माझे वजन कमी करण्याचे प्रयोग सुरू झाले.

    मी सहज बोलून गेलो, “ दहा किलो वजन कमी करायचे आहे.” आपल्या देशात ९०% लोक डाएटिशीयन आहेत हे माझ्या लगेच लक्षात आले. मी फक्त वजन हा शब्द उच्चारला आणि मला अनेक सल्ले फुकट मिळाले.

1. भात बंद करा

2. रात्रीचे जेवण बंद करा

3. गोड बंद करा

4. चहा बंद करा

5. फळे खा

6. किमान एक तास चाला, व्यायाम करा.

7. ८०% डायट आणि २०% व्यायाम याने वजन कमी होते

8. पोहायला जा

9. सायकल चालवा

10. कपालभाती करा (तेंव्हा रामदेव बाबा नुकतेच उदयास येत होते )

11. आयुर्वेदिक औषधे सुरू करा

12. गरम पाणी, लिंबू, मध असे सकाळी उपाशी पोटी घ्या.

13. योगा करा

14. जोर दंड बैठका काढल्या तरी खुप आहे.अमुक एक वैद्य या वयात २०० दंड बैठका काढतात

15. तू डबल हाडी आहेस, म्हणून वजन जास्त आहे, उगाच ते कमी करायच्या फंदात पडू नको.

16. त्या काळी दिक्षीत आणि दिवेकर प्रकाशझोतामध्ये यायचे होते.त्यामुळे मला दोन वेळा खा किंवा दोन दोन तासांनी खा, असा सल्ला कोणीही दिला नाही.

17. तुझे मसल मास जास्त आहे, स्नायूंचे वजन जास्त आहे, काळजी करू नकोस

    अशा अनेक सल्ल्यांपैकी मी नेमके काय करावे ? हा गहन प्रश्न होता. माझे एक जवळचे आयुर्वेदिक डॅाक्टर मित्र वजन कमी करण्याचा दवाखाना चालवायचे. ते एक विशिष्ट तेल प्यायला द्यायचे आणि मग औषधे आणि  डाएटने वजन कमी करायचे. ते वजन कमी करण्यासाठी खुप प्रसिध्द झाले होते. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी एका मशीनने माझ्या शरीरात किती फॅट आहेत ते तपासले आणि काही रक्ताच्या तपासण्या केल्या. साधारणतः आयुर्वेदिक डॉक्टर नाडी तपासतात. पण हे जरा वेगळे वैद्य होते. मी सर्व काही त्यांनी सांगितले तसे केले. डॉक्टरांनी मला एक तेलाची बाटली आणि काही       आयुर्वेदिक गोळ्या दिल्या. ते तेल वाढत्या क्रमाने प्यायचे होते (३०, ४०, ५०, ६०, ९०,१२० मिली). जिभेला लिंबू लाऊन मी ते तेल पीत असे. हा सगळ्यात अवघड प्रकार होता. ते तेल प्यायल्यानंतर दिवसभर भूक लागत नसे. रात्री भूक लागल्यानंतर मी एक पोळी आणि वरण असे जेवण घेत असे. त्या तेलात आणि गोळ्यात काय औषधे आहेत हे मात्र त्या डॉक्टरांनी सांगितले नाही. मोघम असे काहीतरी सांगितले म्हणजे त्यात तीळाचे तेल आहे त्रिफळा आहे इ .आयुर्वेदिक डॉक्टर असे काही सांगत नसतात असा माझा अनुभव आहे. पहिल्या सहा दिवसातच माझे तीन किलो वजन कमी झाले. एकदम हलके वाटायला लागले. नंतर त्यांनी मला सकाळी एक पोळी/भाकरी आणि एक वाटी वरण आणि रात्री परत तेच असा आहार सांगितला. फळे, भाज्या, साखर, गूळ, मध, बटाटे, भात, पोहे, उपमा, साबुदाणा असे सर्व बंद करायला सांगितले. सुरुवातीला केवळ दोन वेळा आणि ते सुद्धा फक्त एक पोळी आणि वरण असे खाल्ल्यामुळे डोके दुखत असे. पण नंतर सवय झाली आणि म्हणता म्हणता केवळ तीन महिन्यात माझे १२ किलो वजन कमी झाले. एकदम हलके वाटायला लागले, मला माझे सर्व कपडे बदलावे लागले. आता एकदम मी दहा वर्षांनी लहान दिसायला लागलो! पण कुठलीच अवस्था चिरंतन नसते. मला वाटले की आता वजन कधीच वाढणार नाही. डॉक्टरांनी डायट वजन कमी झाल्यानंतरही सुरु ठेवायला सांगितले पण मी मात्र त्यांचा तो सल्ला काही मनावर घेतला नाही. मला वाटले आता वजन कमी झाले आहे ते कधीच वाढणार नाही. मी व्यायामही करत नव्हतो.यथेच्छ गोड, तीन वेळा जेवण, अधून मधून आईस्क्रिम,वड़ा पाव……पुढील केवळ एक वर्षात मी परत ९२ किलोपर्यंत कधी पोचलो ते कळलेच नाही. परत तेच… वाढलेली ढेरी, चालताना होणारा त्रास, वाढलेला आळस….

    आता वजन कमी करण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. मी संभाजीनगरला (औरंगाबाद) काही कामासाठी गेलो होतो. तिथे अनेक वर्षांनंतर माझे एक मित्र भेटले. सुरुवातीस मी त्यांना ओळखलेच नाही. कारण त्यांनी किमान सात किलो वजन कमी केले होते. स्वाभाविकच मी त्यांना वजन कमी करण्यासाठी काय केले? हा प्रश्न विचारला. ते म्हणाले “दिक्षीत डाएट “. तेंव्हा दिक्षीत डाएट नुकतेच फेमस होत होते. त्यांनी मला     डॅा. दिक्षीतांचा फोन नंबर दिला. मी त्यांच्याशी संपर्क केला आणि माझ्या वाढलेल्या वजनाबद्दल सांगितले. त्यांनी काही प्रश्न विचारले आणि मला एका वॅाट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. माझ्यासारखाच ओबेसिटीचा पॅटर्न असलेल्या समवयस्क व्यक्तीची ओळख करून दिली. त्याने मला दिक्षीत डाएट समजावून सांगितले.

1. दोनच वेळा खायचे. अगदी गोळ्यासुद्धा त्याच वेळी घ्यायच्या.

2. जेवणात प्रोटीन, कार्ब, सलाड असावे, गोड कमी, साखरेचा चहा, कॉफी वगैरे सगळं बंद.

3. अगदीच भूक लागली तर ताक किंवा एखादा टोमॅटो चालेल.

    असे काहीसे डाएट करायला सांगितले. मी ते लगेच सुरू केले. सकाळी ११ वाजता पहिले जेवण आणि रात्री ८ वाजता दुसरे जेवण असा क्रम सुरू केला. ४५ मिनिटे चालायला सुरवात केली. म्हणता म्हणता माझे वजन कमी व्हायला सुरुवात झाली. मी पुन्हा ७६ किलोचा झालो. हलके वाटायला लागले. ब्लड प्रेशरची गोळी ५ मिलीग्राम वरून २.५ मिलीग्रामवर आली. सगळेजण कौतुकाने चौकशी करायला लागले. कांहीजण म्हणाले, “दिक्षीतांची मात्रा लागू पडली वाटतं!” पण कांहीच दिवसांनी दिवाळी आली आणि मी दिक्षीतांची रजा घेतली ती कायमची… पुढच्या एक वर्षात मी परत ९२ किलोचा कधी झालो ते कळलेच नाही! परत तेच… वाढलेली ढेरी, चालताना होणारा त्रास, वाढलेला आळस….

परत दिक्षीत डाएट सुरू करावे असे वाटले पण नंतर मी ते करू शकलो नाही. एकदोन दिवस करायचो आणि परत किचनमध्ये जाऊन फ्रिजमध्ये असलेली चॅाकलेट्स, आईस्क्रीमवर ताव मारत असे. मग मी दिक्षीतांचा नाद कायमचा सोडला. पुढे काही महिने तसेच गेले.

एक मित्र अनेक दिवसांनी भेटला. म्हणाला, “किती वजन वाढलंय. काहीतरी कर मित्रा. करिनाने बघ झिरो फिगर केली आहे दिवेकरांच्या मदतीने. मी दिवेकरांचे पुस्तक विकत घेतले आणि अधाश्यासारखे वाचून काढले. त्या पुस्तकाच्या आधारे दर दोन तासांनी काय आणि कसे खायचे याचे वेळापत्रक तयार केले. पण झाले भलतेच..ज्या प्रमाणात खायचे ते मात्र मी कधीच पाळले नाही. दोन दोन तासांनी यथेच्छ खाल्ले आणि मी वजनाची शंभरी कधी पार केली ते कळलेच नाही. मला आता अनेक त्रास सुरू झाले होते..गुडघे दुखी, धाप लागणे, ब्लड प्रेशर वाढणे, छातीत दुखणे….

माझ्या हॅास्पिटलमधील हाऊसकिपींग सुपरवायझर मला भेटायला आले होते. त्यांना मी अनेक महिन्यांनी भेटलो होतो. ते एकदम सडपातळ दिसत होते. त्यांनी २५ किलो वजन कमी केले होते.वास्तविकपणे मी त्यांना सल्ला विचारला…ते म्हणाले, “सर, काळजी करू नका. मी आता डाएट कोच आहे. तीन महिन्यात तुमचे २० किलो वजन कमी करून देतो.” ते लगेच वजनकाटा घेऊन आले. माझे वजन, उंची, बी.एम.आय.ची मोजमापे घेतली आणि म्हणाले, “सर दोन वेळा शेक घ्यायचा, चहाची तलफ आली तर ही पावडर एक चमचा गरम पाण्यात टाकायची आणि प्यायचे. सकाळी आमचा एक वॅाटसॲप ग्रुप आहे त्यामध्ये ५ ते ६ व्यायाम करायचा. म्हणता म्हणता २० किलो कमी..” मी हे सगळे सुरू केले. वजन कमी करण्याचा हा माझा नवीन प्रयोग होता. दोन महिने हे सर्व केले पण फारसा फरक पडला नाही. मग सोडून दिले. माझे वजन फार कमी झाले नाही.

त्याच दरम्यान मला पाठदुखीचा त्रास होऊ लागला. मी माझ्या एका ॲार्थोपेडीक सर्जन मित्राकडे गेलो. तो म्हणाला, “ काय राजेश, काय बेढब झाला आहेस. पाठ दुखणारच. गोळ्या लिहून देतो, पण वजन कमी करावेच लागेल.” त्याने मला किटो डाएट करायला सांगितले. हेच काय ते शिल्लक राहिले होते. मी ते नेटाने केले आणि माझे वजन कमी व्हायला सुरुवात झाली. मी परत २० किलो वजन कमी करू शकलो. आता परत एकदा हलके वाटत होते. मित्र म्हणाला, “हे बघ. आता डाएट हा तुझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. सोडलेस तर परत वजन वाढेल. भात,भाकरी कमी कर, पोळी पूर्ण बंद. वरण, पनीर,अंडी, मासे, चिकन याचे प्रमाण जरा जास्त ठेव. तुप किंवा खोबरेल तेल वापर. गोड पूर्ण बंद. जेवण औषध आहे, ते प्रमाणातच खाल्ले पाहिजे. दररोज व्यायाम हवाच.” यावेळी वजन कमी केल्यानंतर मी मात्र कानाला खडा लावला आणि खाणे नियंत्रित केले. दररोज चालायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्टीची सवय व्हायला वेळ लागतो. पण एकदा सवय झाली की ते अंगवळणी पडते. मग त्याचा त्रास होत नाही. आई सदैव म्हणते त्याचे महत्त्व पटले, “ अन्न तारी,अन्न मारी,अन्न विकार करी…”.

राजेश कापसे

९८१९९१५०७०

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

आई! “अरे, कोणतीच तक्रार नाही!!”

हे लिहिताना मी भावुक झालो आहे खरेतर. मी आईला घेवून पनवेलच्या नवीन घरात आलो. हे गंगाखेड सोडल्या नंतरचे ९ वे घर. २३ वर्षांपूर्वी मी आईला, गंगाखेड सोडून माझ्यासोबत संभाजीनगर (औरंगाबादला) येण्याची विनंती केली. कुठलाही विचार न करता तिने गंगाखेडचा वाडा विकला आणि आम्ही संभाजीनगरला (औरंगाबादला) आलो. एक खोलीचं घर. कधीच तक्रार नाही. तेव्हा मला कमी पगार होता. पण तिने सांभाळून घेतले.

मग आम्ही स्वत:चा फ्लॅट विकत घेतला. ई एम आय भरणे शक्य व्हायचे नाही पण ती घरात पैसे नाहीत म्हणून चिडली नाही कधी. घरी येणारा कधीच न जेवता गेला नाही.

ती मग डॅा. हेडगेवार रूग्णालयात सेवाव्रती म्हणून काम करायला लागली. जरा रमली संभाजीनगरला (औरंगाबादला) पण मी मुंबईत नोकरी करायचे ठरविले आणि कल्याणला शिफ्ट झालो. माझ्यासोबत ती कल्याणला आली. कोणतीही तक्रार नाही.

खरंतर माझे वडील मुंबईत लोकल अपघातात वारले होते. त्या कटू आठवणी असतांनाही ती कल्याणला आली. आम्ही ब्राम्हण सोसायटीत रहायला लागलो.

मला मुंबईतले काम जमत नव्हते. खुप घालमेल व्हायची त्या नोकरीत. तिला ते लक्षात यायचं पण ती कधीच रागावली नाही. मग मला दुसरी नोकरी मिळाली आणि तिथे मी रमलो. माझ्या चेहऱ्यावरचे समाधान बघून तिला हायसं वाटलं असावं.

मग जरा प्रगती झाली, मला लंडनला शिकायला जाण्याची संधी मिळाली. फार कधी मी तिला लंडनहून फोन केले नाही पण तिने कधी तक्रार केली नाही.

नंतर स्वत:चं घर घेतलं कल्याणला. इथवर तिचं शिवणकाम सुरू होतं. तिची अनेक वर्षांची सोबतीण, तिची लाडकी मशीन होती तिच्यासोबत. पण, नवीन घरात अडगळ नको म्हणून तिने ती देऊन टाकली. कुठलीही तक्रार नाही!

मग ती हातानेच विणकाम करायला लागली. लहान मुलींचे फ्रॅाक, साड्या कितीतरीजणींना हातानेच शिवून दिल्या असतील तिने. त्या लहान मुलीं जेंव्हा खुष व्हायच्या त्यातच तिचा आनंद आजही असतो.

मी लंडनहून परत आलो आणि मला लोकल ट्रेनचा प्रवास नकोसा वाटायला लागला. मी दादरला शिफ्ट व्हायचं ठरवलं. तर म्हणाली, “तू जा.. मी कल्याणला रहाते.” कोणतीच तक्रार नाही!!

मी नायजेरियाला जायचे ठरवले. मग ती नाशिकला रहायला गेली. जरा स्थिरावली तिथे. मी परत पुण्यात नोकरी घेतली आणि तिला म्हणालो ये पुण्यात, तिने नाशिक सोडलं. कोणतीच तक्रार नाही.

मी परत मुंबईत पनवेलला यायचं ठरवलं. आई आता ८४ वर्षांची झाली आहे. ती पनवेलला माझ्यासोबत आली. पनवेलच्या घरी परत तोच उत्साह. देवघर लावले, पूजा केली, जेवण तयार केलं.कोणतीच तक्रार नाही.

२३ वर्ष, अनेक शहरं, चढउतार...पण तक्रार मात्र मुळीच नाही!

राजेश कापसे,

९८१९९१५०७०