कोबे, जपान येथील एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये माझ्या रिसर्च पेपरची निवड झाली आणि मला त्याठिकाणी जाण्याची संधी मिळाली. त्यासाठी मला पैशांची जमवाजमव करायची होती. हेडगेवार रुग्णालयातील डॉ अनंत पंढरे सरांनी माझ्यासाठी अनेकांशी बोलणे केले आणि मला स्कॉलरशिप मिळवून दिली. मी सगळा हिशोब केला आणि लक्षात आले की मला अजून दहा हजार रुपयांची गरज आहे. माझ्याकडे तेव्हढे पैसे असणे कठीण होते.
रिसर्च पेपर लिहिणे, त्याची निवड होणे आणि त्या कॉन्फरन्सला जाण्यासाठी शिष्यवृत्तीही मिळाली होती. आता दहा हजार रुपयांची गरज होती. ते मिळाले नाही तर जपानला जाणे मात्र रद्द होणार होते. मी हताश होऊन घरी बसलो होतो.
त्याच वेळी, श्री गणेश देशपांडे, आमच्या घरी आले होते. माझ्या चेहऱ्यावरील हावभावावरून, काहीतरी बिनसले असल्याचे त्यांना जाणवले. मला घरी दीपक म्हणतात. ते मला म्हणाले, 'दीपक, काय झाले. सगळे ठीक आहे ना?" मी काहीच बोललो नाही. आई म्हणाली, 'अहो त्याचे जपानला जायचे ठरले होते, पण काही कारणांनी रद्द होतेय असे म्हणाला. काहीच सांगत नाही." ते क्षणभर काहीच बोलले नाहीत. आई ने त्यांना पाणी दिले, चहा झाला आणि ते निघणार होते त्याआधी, त्यांनी वीस हजार रुपयांचा चेक माझ्या हातात दिला. म्हणाले, "ऑल द बेस्ट!" आणि ते निघून गेले. मला त्यांचे आभार कसे मानावेत ते कळेना. मला प्रश्न पडला, "त्यांना कसे कळले असेल? माझ्या मनातले कसे ओळखले असेल त्यांनी?" मी कृतज्ञतेने त्यांच्याकडे बघत होतो.
जपानला जाण्यापूर्वी त्यांचा निरोप आला, "दीपक, जपानमधील माझे एक मित्र नाईक यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. ते टोकियो मध्ये तुझी राहण्याची व्यवस्था करणार आहेत. त्यांना जपान मध्ये गेल्या नंतर संपर्क करणे." त्यांनी मला नाईकांचा फोन नंबर दिला. मी जपानला गेलो आणि तिथल्या घाई गडबडीत नाईकांना फोन करायचे विसरून गेलो. माझा रिसर्च पेपर आणि जपान, सिंगापुर दौरा खूप चांगला झाला. माझे खूप कौतुकही झाले, सत्कार झाले. श्री गणेश देशपांडे यांनीही माझे फोन करून अभिनंदन केले.
जपानहून परत येऊन एक दोन महिने झाले होते. श्री गणेश देशपांडे काही कामा निमित्त संभाजीनगरला आले होते. त्यावेळी ते घरी आले. येताना पुष्पगुच्छ घेऊन ते आले. माझे कौतुक केले. मला म्हणाले, 'दीपक, तू जपान मध्ये नाईकांना फोन केला नाहीस का? त्यांनी खूप वाट बघितली तुझी. तुझे हॉटेलचे बुकिंगही केले होते. त्यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले, 'माझे हॉटेल बुकिंगचे पैसे वाया गेले त्याचे दुःख नाही, पण त्याने साधा फोनही नाही केला त्याचे जास्त दुःख वाटले'." ते एवढेच बोलले. रागावले नाहीत की चिडले नाहीत. नंतर म्हणाले, 'असे विसरायचे नाही कधी. काळजी घे भविष्यात."
नाईकांनी त्यांना खूप ऐकवले असेल नक्कीच. पण गणेशजींनी अत्यंत सौम्य शब्दात मला समजावून सांगितले आणि मला माफही केले. किती सहजता होती त्यांचा माफ करण्यात! हा प्रसंग आयुष्यभरासाठी माझ्या मनावर कोरला गेला. क्षमाशील असावे तर गणेश देशपांडें सारखे!!!!
-राजेश कापसे
९८१९९१५०७०
मदत करणे नि समजून घेणे शिकायला मिळाले 👍💯
ReplyDeleteइतरांना त्यांच्या गुणदोषांसह समजून घेणे फार कमी लोकांना शक्य होते. माफ करण्यासाठी मन खुप मोठे असावे लागते.
ReplyDelete