सरांचे अचानक जाणे मनाला चटका लावून गेले. १९९४ मध्ये पोदार आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिली ओळख झाली ती डॉ. मिलिंद पाटील सरांची. सर हिंदी मध्ये बोलायचे. संस्कृत संहिता सिध्दांत हा विषय सर शिकवत असत. तर्कसंग्रह, सुश्रुत संहिता, अष्टांग संग्रह आणि संस्कृत हे विषय सरांचे आवडीचे. हे अवघड विषय सोप्या पद्धतीने ते शिकवायचे. सरांच्या लेक्चरसाठी सर्वच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असायचे. संस्कृत सारखा अवघड विषय सरांनी सोपा करून शिकवला. पण संस्कृत आणि संहितासिध्दांत याही पलीकडे त्यांच्या कडून मी खूप काही शिकलो.
त्या काळात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जात असे. त्या स्पर्धेत मी भाग घ्यावा असे सरांनी मला सुचवले. मी माझे नाव नोंदवले आणि तयारी सुरू केली. भाषण लिहून झाल्यावर मी ते सरांना वाचायला दिले. ते वाचून त्यांनी मला त्यात सुधारणा सुचवल्या आणि माझी उत्तम तयारी करून घेतली. स्पर्धेला जाताना मी सरांचे आशिर्वाद घ्यायला गेलो, म्हणाले, “तू तुझी तयारी उत्तम केली आहेस. बक्षीसाची अपेक्षा न ठेवता उत्तम भाषण कर. शुभेच्छा!” स्पर्धेत मी जिंकणार का? कोणते बक्षीस मिळणार हे दोन चिंतेत टाकणारे विचार आता गौण झाले होते. नावाजलेल्या अशा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मी प्रथमच सहभागी झालो होतो पण मनात भीती अजिबात नव्हती कारण ती सरांनी सांगितल्याप्रमाणे मी भाषणाच्या परिणामाचा विचार करत नव्हतो. माझे भाषण उत्तम झालं आणि या स्पर्धेत मला पहिले पारितोषिक मिळाले. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. हे केवळ सरांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले होते!
माझी पहिल्या क्रमांकाची ट्रॅाफी सरांना दाखवली. सरांनी माझे अभिनंदन केले आणि म्हणाले, “बघ, बक्षीस कोणते मिळणार याचा विचार केला असतास तर भाषणात लक्ष लागले नसते. हे लक्षात ठेव सदैव! भगवद्गीतेमध्ये आहे रे हे सर्व. मी तुला त्याचे आचरण करायला सांगितले एवढेच!”
भगवद्गीता वाचावी आणि समजून घ्यावी असे माझ्या मनात आले. गंगाखेडला गीतेचा १२ अध्याय आम्हाला पाठ करायला लावला होता ,पण त्याचा अर्थ कधीच कळला नव्हता आणि एकदोन वेळा तो म्हणताना चूक झाली म्हणून ओरडा पडला होता त्यामुळे मी भगवद्गीता या ग्रंथाच्या नादी कधी लागलो नाही. पण डॅा. मिलिंद पाटील सरांमुळे मी भगवद्गीता वाचायला लागलो. सरांनी मला संस्कृत श्लोक आणि त्याखाली मराठीत भाषांतर अशी गीता भेट दिली. “हे बघ, गीता वाचताना दोन बिंदू लक्षात ठेवायचे, "
१. अध्याय १: अर्जुन उवाच। दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्।
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ॥28॥
२. अध्याय १८ अर्जुन उवाच।
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥73॥
आपल्या दररोजच्या जीवनात पहिला प्रसंग अनेकदा येतो. आपण अस्वस्थ, उदास असतो. मनातून हरलेलो असतो, शस्त्र टाकून देतो… पण भगवद्गीता वाचून आणि त्यातील श्रीकृष्णाने दिलेल्या संदेशाचे पालन करून “नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा” ही मनाची अवस्था प्राप्त करून युध्दाला सज्ज व्हायचे असते.
मी अनेक वर्षे पहिला अध्याय ते अठरावा अध्याय असे गीतेचे वाचन केले. गीतेच्या सुरवातीलाच गीता वाचन केल्याने काय फळ मिळते असे लिहिले होते.. की. जो व्यक्ती दररोज १८ अध्याय नित्य पठण करतो त्याला ज्ञान प्राप्ती होते आणि त्याला परमपद प्राप्त होते.… त्याबद्दल मी सरांना विचारले तेंव्हा त्यांचे उत्तर खूप समर्पक होते,” राजेश, ते बाजूला ठेवूनच गीतेचा अभ्यास करायला हवा. गीता फलशृती वाचनाची गोडी लागावी यासाठी आहे, सामान्य लोकांसाठी. नाहीतर ते वाचणारच नाहीत. ज्याला समज आहे त्याला फलशृतीची गरज नाही.”
मी अभ्यास करतो आहे की नाही याकडे सरांचे लक्ष असायचे. अभ्यास न करता, मी उगाच पुस्तके विकत घेत असे आणि अभ्यास करण्याचे नाटकच जास्त करत असे. हे त्यांना लक्षात आले तेंव्हा माझ्यावर ते रागावले नाहीत पण कॅालेजमधील इक्लेअर डे च्या दिवशी चॅाकलेट सोबत जे कार्ड मला त्यांनी पाठवले त्यात लिहिले होते, “"खरश्चन्दन भारवाही भारस्य वेत्ता न तु चन्दनस्य ।" पाठीवर चंदनाचे ओझे वाहणाऱ्या गाढवाला त्या चंदनाचे महत्व कळत नाही. अभ्यास कर, नाटक करू नकोस! मला जे कळायचे ते कळले आणि मी अभ्यासाला लागलो.
नंतर अनेक वर्षे सरांची भेट झाली नाही. मी पनवेलला शंकरा आय हॅास्पिटल मध्ये काम करायला सुरुवात केली आणि पनवेल स्टेशनवर सरांची भेट झाली. सर म्हणाले, “ तू भेटला नाहीस अनेक वर्षे पण तू BAMS नंतर जे लंडनला MSc केलेस आणि वेगवेगळ्या संस्थेत काम केले आहेस त्याबद्दल मला माहिती आहे. माझे लक्ष आहे तुझ्याकडे अजून! “ माझे डोळे पाणावले! माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सर आवर्जून आले होते आणि त्यांनी माझे कौतुक केले.
आज सरांचा वाढदिवस, मी त्यांना फोन करणार होतो आणि मेसेज आला,” सरांचे दुःखद निधन झाले आहे.” अचानक जाण्याने अस्वस्थ झालो.
आयुर्वेद, भगवद्गीता, संस्कृत, हिंदी यावर प्रभुत्व असणाऱ्या आणि त्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि हे सर्व सहज करून शिकवणाऱ्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रध्दांजली!
“वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्वाति नरोऽपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही।।”
राजेश कापसे
९८१९९१५०७०
🙏💐
ReplyDeleteआज जागतिक शिक्षक दिन,
ReplyDeleteआजच्या दिनी ऋषितुल्य मिलिंद सरांविषयी आपली प्रेमभावना,
त्यातही वाढदिवसाचा मेसेज करावा;पण दु:खद निधनाचा मेसेज मिळाल्याचे ऐकून खूपच वाईट वाटले.
असो, आपल्या गुरुंना विनम्र अभिवादन.
गुरु जना बद्द्ल आदर प्रश्नसांनीय आहे आणि हेच आपल्या यशाचे गमक आहे. सुंदर लेखन शैली 👌
ReplyDelete