संभाजीनगर (औरंगाबाद) पासून पंधरा कि.मी. अंतरावर असणाऱ्या चितेगाव या लहान गावात मी माझे क्लिनिक सुरु केले होते. सात आठ महिने प्रॅक्टिस केल्यानंतर मला त्याचा कंटाळा यायला लागला आणि काहीतरी वेगळे करावे असे मला सतत वाटत होते. माझी प्रॅक्टिस तशी बरी सुरु होती, कमाई तशी चांगली होत असे. पण त्यात मन रमत नसे. मला वाटायचे की अजून शिकले पाहिजे. त्याचबरोबर मला सामाजिक कामाचीही आवड होती. काहीतरी चांगले काम करायला हवे असेही वाटत असे. मी जे काही करतोय ते फक्त स्वतःसाठी आहे याची खंत वाटत असे.
संभाजीनगर (औरंगाबाद) येथे असलेल्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाबद्दल आणि त्यांच्या सामाजिक कामाबद्दल बरेच ऐकले होते. माझे काही मित्रही तिथे काम करायचे. माझे क्लिनिक बंद करावे आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयात काम करावे असे अनेक वेळा मनात येत असे. पण त्यात अनेक अडचणी होत्या. स्वतःची चांगली सुरु असलेली प्रॅक्टिस बंद करून नोकरी करणे हा तसा मोठा निर्णय होता. कारण प्रॅक्टिस सुरु करण्यासाठी बराच खर्च झाला होता. त्यामुळे अचानक ती बंद कारण्याचा निर्णय घरातील कुणीही मान्य केला नसता. त्यापेक्षाही एक महत्वाचा प्रश्न होता, नोकरीत पगार किती मिळणार हा. प्रशिक्षणार्थी म्हणून सुरुवातीला पगार नक्कीच कमी मिळणार होता.
माझे क्लिनिक बंद करून नोकरी करण्याचा निर्णय जेंव्हा मी घरी सांगितला तेंव्हा आभाळ कोसळले. सर्वांनी त्याला कडाडून विरोध केला. माझ्या मनात "To be not to be" हा गोंधळ सुरु होता. या कठीण काळात माझी ओळख डॉ.अभय शिरसाट यांच्याशी झाली. डॉ.अभयचे माझ्यासारखेच बी.ए.एम.एस.पर्यंत शिक्षण झाले होते आणि तो संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये स्वतःचे क्लिनिक चालवत होता. अत्यंत शांत, सुस्वभावी असा डॉ.अभय खूप बॅलेन्सड आहे आणि त्याची विचार करण्याची पद्धत तर्कनिष्ठ (रॅशनल) होती. माझ्या मनातील सर्व गोंधळ मी त्याच्यासमोर व्यक्त केला. माझे सगळे बोलणे ऐकून घेतल्यानंतर तो म्हणाला, "राजेश, निर्णय घेणे महत्वाचे असते. आपण घेतलेला निर्णय बरोबर अथवा चूक आहे की नाही हे केवळ निर्णय घेतल्यानंतरच ठरते. पण निर्णय न घेणे किंवा अनिर्णित असणे ही अवस्था मात्र अत्यंत घातक असते. कोणताही निर्णय घेतल्यानंतर त्याचे चांगले वाईट परिणाम हे होतच असतात आणि त्याची मानसिक तयारी आपण करणे गरजेचे असते. त्यामुळे तुझ्या मनातला जो गोंधळ सुरु आहे तो केवळ निर्णय घेतल्यानंतरच संपणार आहे."
मला त्याचे म्हणणे पटले. त्या रात्री बराच विचार केल्यानंतर माझे चितेगावचे क्लिनिक बंद करायचे आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयात नोकरीसाठी अर्ज करायचा आणि मिळाली तर तेथे जॉईन व्हायचे असा निर्णय मी घेऊन टाकला. मन एकदम शांत झाले आणि नवीन मार्ग दिसायला लागला. अर्थात त्याचे चांगले वाईट परिणाम असणारच होते.
कालांतराने सहा वर्ष डॉ. हेडगेवार रुग्णालयातील नोकरी सोडून मुंबईत नवीन नोकरी करण्याचा आणि मुंबईत कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेण्याची जेंव्हा वेळ आली तेंव्हा मला डॉ. अभयचा सल्ला आठवला, "निर्णय घेणे महत्वाचे, परिणाम नंतरच कळतील!" मी मुंबईत परतलो आणि तिथे कायम स्वरूपी स्थायिक झालो. पुढे लंडनला शिकायला जाण्याचा निर्णय असेल किंवा नायजेरियामध्ये काम करण्याचा निर्णय असेल अथवा कल्याणहून डायरेक्ट दादरला स्थायिक होण्याचा निर्णय असेल मी ते सर्व निर्णय हिमतीने घेतले. कारण "निर्णय घेणे महत्वाचे असते" हा डॉ. अभयचा सल्ला मला सदैव आठवतो आणि प्रेरणा देतो.
राजेश कापसे
९८१९९१५०७०
https://rajeshkapsebooks.com/
No comments:
Post a Comment