मी पंडित एकनाथ ठाकूर यांच्याकडे बासरी शिकायला सुरुवात केली. एकदा माझ्याकडे बासरी नव्हती. पंडितजींनी मला बासरी दिली आणि स्वरमाला सुरू केली व म्हणाले, “डॉक्टर, ही बासरी थंपींची आहे आणि स्वरमालाही.” हे सांगताना पंडित एकनाथ ठाकूर हळवे झाले. मी पंडितजींना थंपीबद्दल विचारले. पंडितजी त्यांच्याबद्दल सांगत होते ते ऐकताना माझ्याही डोळ्यात पाणी आले.
थंपी मूळचे केरळचे. मुंबईत कामानिमित्त आले आणि मालाडला स्थाईक झाले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी सेवा निवृत्ती घेऊन बकेट लिस्टमधील अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी त्यांनी मालाडचे त्यांचे घर विकले आणि पनवेल जवळ स्वतःचे घर घेऊन ते कुटुंबासह कायमचे शिफ्ट झाले.
नोकरीच्या धावपळीत बासरी शिकायची इच्छा अपूर्ण राहिली होती. पनवेलमध्ये आल्यानंतर त्यांना कुणीतरी पंडित एकनाथ ठाकूर सरांचा पत्ता दिला आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पंडितजींचे शिष्यत्व स्वीकारले आणि बासरी शिकायला सुरुवात केली. केरळवरून बासऱ्यांचा सेट आणला.स्वरमाला विकत घेतली आणि बासरीचे शिक्षण सुरू झाले. हृदयापासून शिकणारा शिष्य आणि सहृद होऊन शिकवणारा गुरु असा दुग्धशर्करा योग जुळून आला. अगदी एक महिन्यात थंपी बासरी चांगली वाजवू लागले.
त्यांची जिद्द आणि चिकाटी खूप होती. क्लासची वेळ ते कधी चुकवत नसत. एकदा त्यांच्या स्कुटरचा अपघात झाला.त्यांच्या पायाच्या अंगठ्याचे नख पूर्ण निघाले.ते तसेच पंडित एकनाथ ठाकूर सरांच्या घरी क्लाससाठी हजर! पंडितजींचे लक्ष त्यांच्या अंगठ्याकडे गेले आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी घरातील औषधांनी त्यांचा अंगठा स्वच्छ केला.अंगठ्याला मलम लावून पट्टी बांधली. आपल्या गुरूने केलेल्या या सेवा-सुश्रुषेने थंपी भारावून गेले. ते म्हणाले, “आपल्या शिष्यांवर आईसारखे प्रेम करणारे तुमच्या सारखे गुरु मिळणे नशिबात असावे लागते.”
बासरीवर वेगवेगळे राग, गाणी असे शिक्षण सुरु होते. पनवेलच्या जवळपास असलेल्या डोंगरांवर ट्रेकिंगलाही ते पंडितजींसोबत जायचे. एकदा ट्रेकिंगला गेले असता वयाच्या सत्तरीत असलेल्या पंडित एकनाथ ठाकूरांनी माथेरानचा ट्रेक थंपींच्याआधी पूर्ण केला. पन्नाशीत असलेले थंपी पंडितजींच्या पुढे नतमस्तक झाले.
थंपींच्या आयुष्यातील संध्याकाळ खूप सुंदर सुरू होती. अचानक कोरोनाने थैमान घातले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वयाच्या पन्नाशीत असलेले थंपी गेले.
सौ. थंपींना भेटायला पंडितजी गेले तेंव्हा त्यांना थंपींच्या सर्व बासऱ्या, स्वरमाला पंडितजींना दिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होते. त्या म्हणाल्या, “पंडितजी, थंपी गेले, पण त्यांच्या या बासऱ्या, स्वरमाला तुमच्याकडे कायमस्वरुपी जिवंत राहतील. माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहे.”
आजही अनेक वर्षांनंतर आम्हाला बासरी शिकवताना पंडित एकनाथ ठाकूर थंपींची स्वरमालाच लावतात.त्या रूपाने त्यांचा आवडता शिष्य त्यांना दररोज भेटतो!
- राजेश कापसे
Awesome. I don't know what swarmala is. But guess its something important.
उत्तर द्याहटवा