माझ्या पहिल्या नोकरीत साधारणतः पाच वर्षे काम केल्यानंतर माझ्या कुरबुरी वाढायला लागल्या. जरा खटके उडायला लागले. स्वतःकडून आणि संस्थेकडून अपेक्षा जास्त वाढल्या. पण ज्या चौकटीत मी काम करत होतो त्यामध्ये माझ्या वाढलेल्या आर्थिक अपेक्षा आणि हवी असलेली पदोन्नती त्यावेळी पूर्ण होणे शक्य नव्हते. मी जरा अधिकच अस्वस्थ होतो. त्यावेळी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे विद्यार्थी परिषदेचे प्रतिभा संगम हे साहित्य संमेलन होते.त्यासाठी रत्नाकर दादा आला होता. मी आवर्जून त्याला भेटायला गेलो.
नेहमीप्रमाणे त्याने "काय मित्रा, कसा आहेस?" असे म्हणून स्वागत केले. मी जरा नाराज असल्याचे त्याला जाणवले. "काय! सगळे ठीक सुरु आहे ना?" असे त्याने विचारले. मी माझ्या मनातील खदखद त्याच्यासमोर व्यक्त केली. माझ्या वाढत्या आर्थिक गरजा, मला अपेक्षित असलेली पदोन्नती आणि मी 'बी.ए.एम. एस'. असल्यामुळे माझ्या प्रगतीसाठी असणाऱ्या मर्यादा इ. मी त्याला सांगितले.
रत्नाकरदादाची प्रतिक्रिया खूप छान होती. तो म्हणाला," हे बघ, आयुष्यात अनेक गोष्टी ह्या पॅकेज डीलसारख्या असतात. पॅकेज म्हटले की त्यात चार चांगल्या वस्तू असतात, दोन कमी दर्जाच्या आणि काही अगदीच कामचलाऊ असतात. पॅकेज म्हणून आपण ते लगेच विकत घेतो. पण उघडल्यानंतर मात्र लक्षात येते की सगळेच काही चांगले नाही. तरीपण आपण ते स्विकारतो. जे चांगले आहे ते वापरतो आणि जे अगदीच कामचलाऊ असते ते बाजूला टाकतो. नोकरी, व्यवहार, मैत्री या सगळ्यात पॅकेज डील कुठेतरी असतंच. त्यात सगळेच मनासारखे आणि उत्तम कधीच मिळत नाही. जर ते टिकवायचे असेल तर चांगले ते घ्यायचे आणि वाईट ते सोडून द्यायचे. असे केले तरच दीर्घकाळ समाधानाने काम करता येते. पण त्यातले सगळेच नकोसे झाले तर मात्र पर्याय शोधणे गरजेचे असते. कारण आनंदी असणे गरजेचे तरच मजा आहे यार. बघ विचार करून..." आम्ही चहा घेतला आणि मी निघालो.
रत्नाकरदादाने सांगितलेल्या पॅकेज डीलच्या कन्सेप्टचाच मी दिवसभर विचार करत होतो. माझ्या त्या नोकरीत अनेक चांगल्या गोष्टी होत्या. सुरक्षितता होती. समाजासाठी काहीतरी उत्तम करत असल्याचे समाधान होते. चांगले सहकारी होते. काही अडचणी होत्या, नक्कीच. पण पॅकेज डीलप्रमाणे सगळेच कसे चांगले असेल. नंतर मी एक वर्ष तिथे काम केले. पण एक वेळ अशी आली की हाताशी असलेले पॅकेज डील बाजूला सारून त्यातून बाहेर पडून थोडे मोठे पॅकेज डील स्विकारायचे ठरवले.मी नोकरी सोडली. मुंबईत आलो. नवीन ठिकाणी नवे पॅकेज डील होते.पगार भरपूर होता. पद, प्रतिष्ठा होती, पण सुरक्षितता नव्हती. समाधान नव्हते.शेवटी हेही एक पॅकेज डीलच होते. थोडे गोड, थोडे खारट, थोडे कडू स्विकारणे गरजेचे होते!
राजेश कापसे
९८१९९१५०७०
https://rajeshkapsebooks.com/
रत्नाकर पाटील साहेबांनी दिलेलं खूप सुंदर व बोधक उदाहरण पॅकेज डील याला आपण खूप सुंदर लेख स्वरूप दिल आहे सर.
ReplyDeleteखरे तर आयुष्य हे एक पॅकेज डील आहे!आपल्यातले वाईट बाजूला सारून,चांगले ते देत राहिले पाहिजे हा या डील चा आत्मा आहे. पण आपण काय वाटतोय त्यावर आपले समाजातील स्थान ठरतअसते.व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळे पॅकेज डील येत असतात.काय घ्यायचे आणि काय सोडायचे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.
ReplyDelete