Friday, September 20, 2024

आभाळा एवढी मोठी स्वप्नेही प्रत्यक्षात आणता येतात : डॉ अनंत पंढरे

डॉ. हेडगेवार रुग्णालयात दीड वर्ष विविध विभागात काम केल्यानंतर मला तिथे पर्मनन्ट करायचे असा निर्णय झाला. माझी नोकरी पक्की झाली. रुग्णालयाच्या नागरी सेवा वस्ती प्रकल्पावर वैद्यकीय अधिकारी म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक या जबाबदारी व्यतिरिक्त, नागरी सेवा वस्ती या प्रकल्पाचे पालक म्हणून डॉ अनंत पंढरे सर काम बघायचे. रुग्णालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतांना सरांसोबत ओळख झाली होती.त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्व, प्रभावी आवाज, अनेक नामवंत व्यक्तींसोबत त्यांचा असलेला परिचय, रुग्णालयासाठी त्यांनी उभा केलेला निधी, या आणि अश्या अनेक गोष्टींमुळे त्यांच्याबद्दल आम्हां सर्वांमध्ये एक आदरयुक्त भीती होती.

माझी नागरी सेवा वस्ती प्रकल्पावर नियुक्ती झाल्यानंतर त्या प्रकल्पाचे पालक या नात्याने त्यांनी मला भेटायला बोलावले. मनात भीती होती.छातीत धडधडत होते. मी त्यांच्याकडे संकोचलेल्या अवस्थेत गेलो. त्यांच्या सहाय्यकाला सांगितले आणि प्रतीक्षागृहात त्यांच्या निरोपाची केबिन बाहेर वाट बघत बसलो. त्यांच्या सहाय्यकाने त्यांना मी आल्याचे सांगितले. आश्चर्य म्हणजे सर स्वतः बाहेर आले. त्यांनी माझे स्वागत केले आणि म्हणाले "काय राजेश, काय म्हणतोस?कसा आहेस? अरे एवढा घाम का आहे तुझ्या कपाळावर? बस.पाणी घे." त्यांच्या केबिनमध्ये हेडगेवार रुग्णालयाच्या त्यावेळी तयार झालेल्या आणि भविष्यातील भव्य वास्तूचे चित्र होते. 

ते म्हणाले "राजेश अभिनंदन! तुला शुभेच्छा देण्यासाठी मी बोलावले आहे. तू जे नागरी सेवा वस्त्यांमध्ये काम करणार आहेस ते तेथील लोकांसाठी आणि संस्थेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी तुला शुभेच्छा!" सरांनी मला एक सुंदर ग्रीटिंग कार्ड दिले, त्यावर त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिले होते, "अंत्योदयासाठी हार्दिक शुभेच्छा! आपण सोबत मिळून मोठे काम करू.ऑल द बेस्ट!" आमची भेट संपली आणि भारावलेल्या अवस्थेत मी तेथून बाहेर पडलो.

माझे काम सुरु झाले. सरांसोबत प्रत्येक आठवड्यात आमची आढावा बैठक असे. त्यात ते आमच्यासमोर सदैव मोठे आव्हान ठेवायचे. प्रत्येक काम हे जागतिक दर्जाचे आणि भव्य असले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. त्यासाठी लागेल ते सर्व उभे करण्याची त्यांची तयारी असायची. मिलिंदनगर या सेवावस्तीमध्ये वस्ताद लहुजी साळवे आरोग्यकेंद्राची नवीन इमारत बांधायची होती. डॉ. दिवाकर कुलकर्णी सर म्हणाले, "आरोग्यकेंद्राची इमारत लहुजींचे व्यक्तिमत्व प्रकट करणारी असावी. त्यांचे ते स्मारक व्हावे." डॉ पंढरे सरांनी सर्वांशी चर्चा केली आणि वस्ताद लहुजी साळवे यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून ती इमारत कशी असेल याबद्दल वास्तुविशारदाला कळवले. वास्तुविशारदाने जेव्हा इमारतीचा आराखडा आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले तेव्हा संस्थेतील अनेकांनी असे मत व्यक्त केले की, "सेवावस्तीतील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एवढा खर्च का करायचा? साधी छोटी अशी इमारत बांधा खूप झाले." पण सर त्यांच्या मतावर ठाम होते.जे करायचे ते भव्यच असायला हवे, त्यात कोणतीही कसूर नको. या       इमारतीसाठी त्यांनी निधी उभा केला आणि एक भव्य स्मारक "वस्ताद लहुजी साळवे आरोग्य केंद्र" या रूपाने दिमाखात उभे राहिले. हे सर्व काम डॉ. हेडगेवार रुग्णालयाची त्यांची प्रमुख जबाबदारी सांभाळून ते करत असत. Passion या इंग्रजी शब्दाचा अर्थ डॉ अनंत पंढरे सरांच्या कामाची पद्धत अनुभवताना मला समजला!

काही दिवसांनी मला डॉ दिवाकर कुलकर्णी सर यांनी HIV-AIDS जनजागृती प्रकल्पाची जबाबदारी दिली. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने काही कार्यक्रम करायचे होते. मी एक लहान रॅली करावी असे ठरवले आणि त्याबद्दल डॉ अनंत पंढरे सरांना सांगायला गेलो. सर म्हणाले, "लहान का? आपण संपूर्ण संभाजीनगर (औरंगाबाद) शहराला कळेल असे भव्य काहीतरी करू." क्षणाचाही विलंब न करता ते मला त्यांच्या कारमधून संभाजीनगर (औरंगाबाद)च्या प्रमुख अशा क्रांती चौक येथे घेऊन गेले आणि क्रांती चौक ते देवगिरी कॉलेज अशी भव्य मॅरेथॉन आयोजित करायचे नियोजन त्यांनी मला समजावून सांगितले. १ डिसेंबर रोजी या मॅरेथॉनसाठी संभाजीनगर (औरंगाबाद) मधील डिस्ट्रिक्ट कलेक्टर, कमिशनर, खासदार, आमदार, महापौर आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. तो कार्यक्रम त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला!

HIV-AIDS या विषयावर काम करत असताना मी "Impact of Behaviour Change Communication on Slum Population " हा एक रिसर्च पेपर लिहिला आणि तो जपान मध्ये होणाऱ्या एक कॉन्फरंससाठी पाठवला आणि आश्चर्य म्हणजे त्याची निवडही झाली पण मला स्कॉलरशिप मिळाली नव्हती. मी हे सरांना सांगायला गेलो. क्षणार्धात ते म्हणाले, "राजेश,  २ जुलैला हा रिसर्च पेपर तू जपान येथील कोबे येथे सादर करायला जायचे आहेस! मी तुला सर्व ती मदत करतो." माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता! माझ्यासाठी असे काहीतरी अशक्यप्राय  होते कारण मी परदेशात सोडा, विमानानेही कधी प्रवास केला नव्हता! त्यात जपानला जाणे हे स्वप्नवतच होते. पण पंढरे सरांनी ठरवले की ते कितीही अशक्यप्राय असले तरीही प्रत्यक्षात येतच असे. केवळ एका महिन्यात त्यांनी माझ्या जपानवारीसाठी लागणाऱ्या निधीची व्यस्था केली आणि २ जुलै २००५ मध्ये मी माझा रिसर्च पेपर कोबे, जपान येथे सादर केला. माझे सादरीकरण झाल्यानंतर मी सरांना फोन केला. त्याच दिवशी सरांचा वाढदिवस होता. सर म्हणाले, "अभिनंदन राजेश! अभिमान वाटतो तुझा.माझ्या वाढदिवसाचे हे सर्वात मोठे गिफ्ट आहे."  ज्युनियरला डावलून स्वतः परदेशात जाणारे बॉस अनेकांनी बघितले असतील, पण माझ्यासारख्या ज्युनियरला परदेशात पाठवणाऱ्या बॉसबरोबर मी काम केले आहे याचा मला अभिमान वाटतो!

डॉ.हेडगेवार रुग्णालयातील अत्यंत नाविन्यपूर्ण अशी ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असणारा "सेवाव्रती" हा उपक्रम, जागतिक दर्जाची "दत्ताजी भाले" रक्त पेढी किंवा "संगणक प्रज्ञा" हा सेवावस्तीतील मुलांसाठी सुरु केलेला प्रकल्प, आसाममधील भव्य हॉस्पिटल  या आणि अश्या असंख्य प्रकल्पांची संकल्पना तयार  करणे, त्यासाठी लागणार निधी उभा करणे आणि ते उत्तम पद्धतीने चालतील यासाठी प्रयत्न करणे हे काम सर अव्याहतपणे करत आहेत.

अनेक वर्षांनी नुकताच मी डॉ.हेडगेवार रुग्णालयात काही कामानिमित्त गेलो होतो. २३ वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या पूर्णाकृती इमारतीचे जे चित्र सरांच्या   केबिनमध्ये मी बघत असे नेमकी तशीच भव्य इमारत पाच एकर जागेत दिमाखाने उभी राहिली होती आणि एवढेच नाही तर "श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज" च्या त्याहूनही मोठ्या प्रकल्पाचे काम सुरु झाले होते.

अनंत भव्य दिव्य स्वप्नं प्रत्यक्षात आणणाऱ्या डॉ. अनंत पंढरे सर यांच्याबरोबर मला काही वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि मी मोठी स्वप्ने बघून प्रत्यक्षात आणायला शिकलो. ईश्वराचे रूप अनादी-अनंत असते हे मी ऐकले आहे. अनादी नाही पण "अनंत" रूप मी जवळून बघितले आहे

2 comments:

  1. डॉ.अनंत पंढरे सर यांनी केलेल्या मोलाच्या कामगिरीस मनापासून सलाम
    त्यांच्या सानिध्यात राहून आपण त्यांचे आदर्श घेऊन आभाळ एवढी मोठी स्वप्नेही साकारत आहात व आमचे आदर्श बनत आहात सर.

    ReplyDelete
  2. तुम्ही स्वतः कर्तुत्ववान आहात आणि म्हणूनच अशा दैवी व्यक्तिमत्वाचा सहवास लाभला.

    ReplyDelete