श्राद्धपक्ष न करणे हा एक नवीन ट्रेंड आला आहे. अनेक घरांत “आम्ही पिंडदान किंवा श्राद्ध पक्ष करत नाही तो मूर्खपणा आहे “ असे म्हणणे आम्ही कसे पुढारलेलो आहोत,पुरोगामी आहोत हे सांगण्याची एक चढाओढ असते.काही घरांत तो विधीपूर्वक पाळला जातो तर काही ठिकाणी तो “अंधश्रद्धा” म्हणून बाजूला ठेवला जातो. परंतु श्राद्धपक्षाकडे आपण नेमके कोणत्या दृष्टीने पाहतो यावर त्याचा अर्थ अवलंबून असतो.
काही वेळा श्राद्धाला पितृदोष, प्रगतीत अडथळे, नोकरी लागत नाही,व्यवसाय चालत नाही,मुलं होत नाही, लग्न जमत नाही अशा भीतीजनक कारणांशी जोडले जाते. भीती निर्माण करून केलेले कोणतेही कर्म हे श्रद्धेचे नसून अंधश्रद्धेकडे झुकणारे असते. परंतु श्राद्धाचा मूळ अर्थच आहे —
“श्रद्धया इदं क्रियते इति श्राद्धम्”
म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध.
जर भीतीचा अंश काढून टाकला आणि कृतज्ञतेचा भाव ठेवला तर श्राद्धपक्षाचा अर्थ पूर्णपणे बदलतो.
माणूस हा केवळ वर्तमानात जगणारा जीव नाही. त्याला स्मरणशक्ती आहे, भावनांची खोली आहे, नात्यांची जाणीव आहे. आपण जाणतो की आज आपण जे आहोत ते आपल्या आई-वडील, आजी-आजोबा यांच्या कष्टांमुळे आहोत.
दैनंदिन आयुष्यात त्यांच्या आठवणी अचानक डोळ्यांत पाणी आणतात आणि आपण पुन्हा कामात गुंतून जातो. पण श्राद्धपक्ष आपल्याला सांगतो —
“थांबा. आजचा दिवस त्यांच्या स्मरणाचा आहे.”
ही जाणीवपूर्वक थांबण्याची संधी आहे.
आधुनिक मानसशास्त्रात ‘रिच्युअल्स’ म्हणजे विधींना विशेष महत्त्व दिले जाते. ठराविक दिवशी ठराविक कृती केल्याने मनाला स्थैर्य मिळते. दडपलेल्या भावना व्यक्त होतात. कृतज्ञतेचा भाव दृढ होतो.
पिंड देणे, तर्पण करणे, ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला भोजन देणे ही सर्व प्रतिके आहेत. आपण मनात कल्पना करतो की “या रूपात माझे पूर्वज आले आहेत.” ही कल्पना म्हणजेच एक प्रकारचे ‘guided visualization’ आहे. ध्यानधारणेत जसे आपण प्रतिमेवर लक्ष केंद्रीत करतो तसेच येथे आपण आपल्या पूर्वजांच्या स्मरणावर लक्ष केंद्रीत करतो.
यातून मनाला एक प्रकारचे भावनिक शुद्धीकरण (catharsis) मिळते. दुःखाच ओझ राहत नाही.ते कृतज्ञतेत परिवर्तित होतं.
जर आपण स्वतः श्राद्धपक्ष पाळला नाही तर पुढच्या पिढीला त्याचा अर्थ कसा कळणार?
संस्कार हे उपदेशाने नव्हे, तर अनुभवाने पुढे जातात. जर मुलांनी पाहिले की घरात आजोबांची आठवण आदराने काढली जाते, त्यांच्या कथा सांगितल्या जातात, त्यांच्या नावाने अन्नदान केले जाते तर त्यांना नात्यांची आणि कृतज्ञतेची किंमत समजते. श्राद्ध म्हणजे केवळ मृत व्यक्तींचा विधी नव्हे; तो जिवंत नात्यांचा सन्मान आहे.
आजच्या काळात श्राद्धाची पद्धत बदलू शकते. पुरोहित कोणत्या जातीचा असावा हा मुद्दा गौण आहे. तो कोणत्याही जातीचा असू शकतो.विधी कसा करायचा हे ज्याला माहिती आहे तो करू शकतो किंवा कुटुंबीय साध्या पद्धतीनेही तो करू शकतो.
• घरात साधे तर्पण
• पूर्वजांचे फोटो ठेवून स्मरण
• त्यांच्या नावाने अन्नदान
• एखादे सामाजिक कार्य
• कुटुंबाने एकत्र बसून त्यांच्या आठवणी शेअर करणे ही सर्व श्राद्धाची आधुनिक रूपे असू शकतात.महत्त्व विधीचे नसून भावनेचे आहे.
श्राद्धपक्ष हा भीतीचा विषय नाही; तो कृतज्ञतेचा आहे. तो पितृदोषाचा विधी नव्हे, पितृस्मरणाचा आहे.तो अंधश्रद्धेचा नव्हे, भावनिक परिपक्वतेचा संस्कार आहे.
अचानक आठवणी येऊन डोळे पाणावण्यापेक्षा,
ठरवून, सन्मानाने आणि प्रेमाने आपल्या पूर्वजांना स्मरण करणे हीच खरी मानवी संवेदनशीलता आहे.
श्राद्धपक्ष आपल्याला हेच शिकवते की,
आपण एकटे नसून आपल्या पिढ्यांच्या प्रवाहाचा भाग आहोत.
— डॉ. राजेश कापसे
९८१९९१५०७०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा