आरसपानी

📖 About Araspani आरसपानी — मनाच्या ओलाव्यातून उमटलेले शब्द. (Araspani – Words born from the quiet drizzle of thought.) लेखक: डॉ. राजेश कापसे ✨ अनुभव, विचार आणि जीवनातील छोट्या क्षणांची गोष्ट. 🌐 www.rajeshkapsebooks.com 📸 Instagram: @rajubhai_bams

About Araspani / आरसपानी विषयी

📖 About Araspani आरसपानी — मनाच्या ओलाव्यातून उमटलेले शब्द. (Araspani – Words born from the quiet drizzle of thought.) लेखक: डॉ. राजेश कापसे ✨ अनुभव, विचार आणि जीवनातील छोट्या क्षणांची गोष्ट. 🌐 www.rajeshkapsebooks.com 📸 Instagram: @rajubhai_bams

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

🧠 डोपामिन फास्टिंग : मेंदूला विश्रांती देण्याची एक नवी संकल्पना


✍️

मागच्या काही वर्षांत मोबाईल आपला अविभाज्य साथीदार बनला आहे. फोनची रिंग वाजल्यावर उचलणे स्वाभाविक आहे; पण रिंग न वाजली तरी सतत मोबाईल हातात घेणे — ही आता एक नवीनसवय नव्हेव्यसनच झाली आहे.

क्षणोक्षणी नोटिफिकेशन, लाईक्स, कमेंट्स तपासण्याची अधीरता — जणू काही आपला मेंदू त्यावर जगू लागला आहे. इन्स्टाग्रामवर आलेला लाईक, फेसबुकवरील कमेंट, किंवा व्हॉट्सअॅपचा ब्लू टिक — हे सगळं क्षणिक आनंद देतं, पण आतून रिकामेपणही वाढवतं.

एका क्षणी मला जाणवलं — “ही एक नवीन प्रकारची तलप आहे.”

म्हणून मी फेसबुक अॅप हटवलं. पण लगेच लक्षात आलं — इन्स्टाग्रामवरून थेट फेसबुकला जाता येतं! अशा रीतीने आपण एका डिजिटल जाळ्यात अडकत चाललो आहोत.

ही सर्व “तलप” म्हणजे मेंदूमधील डोपामिन नावाच्या रसायनाचा परिणाम आहे.

डोपामिन हे मेंदूमधील “आनंद” आणि “प्रेरणा” देणारं रसायन आहे. आपण काही आनंददायक गोष्ट करतो — जसं की सोशल मीडियावर पोस्ट टाकणं, स्वादिष्ट अन्न खाणं, किंवा एखादा गेम जिंकणं — तेव्हा मेंदू डोपामिन सोडतो.

परंतु सतत या उत्तेजनांचा ओव्हरलोड झाल्यास मेंदू थकतो, आणि साध्या गोष्टींत आनंद मिळत नाही.

या चक्रातून बाहेर पडण्यासाठी “डोपामिन फास्टिंग” ही संकल्पना वाचनात आली.

हे म्हणजे डोपामिन बंद करणं नव्हे, तर ते अतिरिक्त प्रमाणात वाढवणाऱ्या कृतींपासून जाणीवपूर्वकदूर राहणं.म्हणजे असं,

🧘

• मोबाईल, सोशल मीडिया आणि टीव्हीपासून काही वेळ दूर राहा

• सततच्या गप्पा, संगीत, मनोरंजन टाळा

• फास्टफूड किंवा अनावश्यक खरेदी टाळा

मी स्वतः हा प्रयोग केला.

रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत मी माझा iPhone बंद ठेवायला सुरुवात केली. एक साधा नोकियाफोन घेतला — फक्त कॉलसाठी.

आश्चर्य म्हणजे, दोन तास माझे खरंच माझे झाले. मी पुन्हा पुस्तके वाचायला, बासरीचा रियाज करायला, जीमला जायला लागलो. घरच्यांसोबत वेळ घालवायला वेळ मिळू लागला. आणि मन शांत, प्रसन्न झालं.

🌼 डोपामिन फास्टिंगचे फायदे

• लक्ष केंद्रीत होते व एकाग्रता वाढते

• मन शांत होते, अस्वस्थता कमी होते

• झोप सुधारते

• आत्मनियंत्रण व संयम वाढतो

• साध्या गोष्टींमध्ये पुन्हा आनंद मिळू लागतो

तुम्हाला डोपामिन उपवास करायचा असेल तर खालील डायट प्लॅन नक्की करून बघा,

📅 एक दिवसाचा डोपामिन फास्टिंग प्लॅन

🌅 सकाळ (६.००–८.००)

• मोबाईलवर नजर न टाकता दिवसाची सुरुवात करा

• ध्यान, प्राणायाम किंवा चालणे

• शांतता किंवा हलके संगीत

☀️ पूर्वान्ह (८.००–१२.००)

• आवश्यक कामांवर लक्ष केंद्रित करा

• ईमेल/फोन फक्त ठराविक वेळेतच तपासा

• गप्पा/सोशल मीडिया टाळा

🍵 दुपार (१२.००–२.००)

• जेवताना टी.व्ही./मोबाईल नको

• हळूहळू, मनपूर्वक जेवण

• पचनानंतर थोडा वेळ शांत विश्रांती

🌇 सायंकाळ (५.००–८.००)

• फिरायला जा, पुस्तक वाचा किंवा छंद जोपासा

• स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा

🌙 रात्री (८.००–१०.००)

• मोबाईल एअरप्लेन मोडवर ठेवा

• हलकी प्रार्थना, लेखन किंवा आत्मचिंतन

• झोपण्यापूर्वी ३० मिनिटे पूर्ण शांतता

हे करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्या म्हणजे,

• हे डिटॉक्स नव्हे, तर माइंडफुल ब्रेक आहे

• सुरुवातीला २–३ तासांपासून सुरुवात करावी 

• हळूहळू आठवड्यातून १ दिवस पूर्ण फास्टिंग करा

• याचा उद्देश “टाळणे” नव्हे, तर “जाणीवपूर्वक वापरणे” हा आहे.

डोपामिन फास्टिंग म्हणजे आयुष्यापासून पळ काढणे नव्हे —

तर आयुष्य पुन्हा शांततेत अनुभवण्याचा एक प्रयत्न आहे.

सततच्या बाह्य उत्तेजनांपेक्षा अंतर्गत शांती आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी हा सोपा, पण प्रभावी मार्ग

“आनंद बाहेर शोधू नका — तो शांत मनातच सापडतो.” 🌿

✍️ डॉ. राजेश कापसे

deepakniramay@gmail.com

9819915070

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

कल्याण ते दादर: असेही एक सिमोल्लंघन!

आम्ही आज शिवाजी पार्क दादर येथे स्वत:चे घर घेतले. मागे वळून बघताना बरेच काही आठवते.

२००७ मध्ये मला मुंबईत नोकरी मिळाली. मग घर कुठे करायचे याच्यावर बरीच चर्चा झाली. दादर,घाटकोपर,मुलूंड,ठाणे,डोंबिवली उतरत्या क्रमाने सगळीच ठिकाणं महाग न परवडणारी म्हणून कल्याण त्यातल्या त्यात बरे म्हणून नक्की केले. पुढची पाच वर्षे कल्याणहून दादर १ तास व तिथून मालाड ४५ मि. व तसाच परतीचा प्रवास दररोज किमान चार तास लागणार.अनेकवेळा वाटले की दादरला शिफ्ट व्हावं.पण मनाची तयारी व्हायची नाही. महाग असेल,परवडणार नाही शाळांचा खर्च परवडेल का? असे प्रश्न.कल्याणहून एकवेळ अमेरिकेत शिफ्ट होणे सोपे असेल पण माझ्या मराठी मनाची दादरला जाण्याची हिम्मत होत नसे.

माझे त्यावेळचे बाॅस आणि त्याहीपेक्षा मित्र श्रीनिवास सावंत हे २०१० ते २०१२ सातत्याने मला कल्याणहून दादरला शिफ्ट होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. मला असं वाटत की त्यांनी उपनगरात राहणाऱ्या मराठी माणसांनी दादरमध्ये रहायला यावे यासाठी सतत प्रयत्न करण्याचा पण केला आहे. शेवटी २०१२ मध्ये मी दादरला राहण्यास यायचे ठरवले. दोन वर्ष लागली मनाची तयारी करायला!

माझ्यासोबत काम करणारी पूजा म्हणाली, "अरे किंग जाॅर्ज शाळेत तुझ्या मुलाच्या प्रवेशासाठी अर्ज तर कर. मिळेल ॲडमिशन". मी अर्ज केला आणि साधारणत: एक महिन्याने मला शाळेतून फोन आला. प्रवेशासाठी तुमच्या मुलास कागदपत्रांसह घेवून या!" अजून दादरमध्ये घर घ्यायचे होते. पण अर्णवला शाळेत घेऊन गेलो. शाळेत त्याला प्रवेश मिळाला पण दादरमध्ये घर असेल तरच असे सांगण्यात आले. तो थोडाच कल्याण ते दादर प्रवास करणार होता!

मग घराची शोधाशोध सुरू झाली. डाॅ. अनंत पंढरे सरांना फोन केला. मी त्यांना संकटमोचक म्हणतो. आजपर्यंतच्या माझ्या यशाचे ते शिल्पकार आहेत. त्यांनी परांजपे काकांचा फोन दिला आणि मग श्री. प्रमोद जोशींची ओळख झाली. त्यांना परदेशात मुलाकडे रहायला जायचे होते व त्यांचे दादरचे घर भाड्याने द्यायचे होते. त्यांनी मला ओळखत असलेल्या दोन व्यक्तींचा फोन द्यायला सांगितला. मी म्हणालो विद्यार्थी परिषदचं मी काम केलं आहे. त्यांनी विनयजी सहस्त्रबुद्धे यांना फोन केला. मग म्हणाले 'विनयजींनी सांगितलं आहे नि:शंकपणे राजेशला घर द्या. तो परिषदेचा कार्यकर्ता आहे." घराची व्यवस्था झाली. प्रमोदकाकांनी मला मागचे पाच वर्षे त्यांच्या मुलासारखे प्रेम केलंय. मग केले नक्की आणि दादरला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.

माझी पत्नी प्रज्ञाने मला पुर्ण साथ दिली आणि आम्ही कल्याणहून दादरला आलो. डाॅ. नियती चितालीया मॅडमनी आम्हाला दादरमध्ये स्थिरावण्यासाठी मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय इथे स्थिरावणे शक्यच नव्हते.

या प्रवासात मदत केलेल्या सर्वांचे आभार, या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे सिमोल्लंघन शक्य झाले.

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

शेवटचे दिवस


शेवटचे दिवस नेहमीच अवघड ठरतात.

जन्म देऊन, काळजाचा ठाव काढून वाढवलेली लेकरं,

आनंदाने ओतप्रोत खर्चून केलेली लग्नं,

घरातली गजबज, हशा, आरास…

पण आयुष्याच्या संध्याकाळी

ते सारेच कसे दुरावून जातात!

घरात उरतो केवळ एक शांतपणा—

भिंतींवर घुमणाऱ्या आठवणींचा,

आणि सोबतीला असते एक अनोळखी कामवाली.

तिलाही जगण्यासाठी पर्याय नसतो,

म्हणून तीच ठरते खरी सोबतीण

त्या अखेरच्या क्षणांची.

शेवटचे दिवस सरले की मात्र,

पुन्हा उमटतात ओळखीचे चेहरे.

आठवणींनी भारलेली लेकरं,

दुःखाच्या सावल्या पुसायला धावणारे नातेवाईक,

आणि मग घरभर पसरेल

गोडजेवणाचा सुगंध—

जणू मृत्यूही झाला असेल

फक्त एक सोहळा.

-राजेश कापसे