Friday, November 29, 2024

वृध्दत्व, दारिद्र्य आणि २० रुपयाचे मोबाईल रिचार्ज!

काल आई सोबत गप्पा मारताना मोबाईल रिचार्जचा विषय निघाला. तिने नवरात्रात घडलेला एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली,'२० रूपयांच्या रिचार्जलासुद्धा मोठी किंमत आहे रे!" मला काही कळले नाही. मी तिला म्हणालो, 'अगं पाच मिनिटात संपतो २० रू. रिचार्ज. काहीच होत नाही त्यात!

आई म्हणाली,"तुम्हां तरूण पिढीला नाही कळायचं ते!" नवरात्रीत एक आजी जोगवा मागत होत्या. मी १० रूपये टाकले आणि तुझ्या मावशीने १० ...झाले २० रूपये.

त्या आजी नंतर मला बाजूला घेवून गेल्या आणि खुप रडल्या. त्या म्हणाल्या, मोबाईल आहे पण मागचे दोन महिने रिचार्ज करायला पैसेच नाहीत. मुलाला विनंती केली पण तो सुद्धा नाही करत रिचार्ज. माझ्या भावाचा दोन महिने होऊन गेले पण अजुन फोन नाही आला. त्यालाही नाही पेन्शन बिन्शन..या उतार वयात नसतील पैसे त्याच्या- कडेही......माझी अवस्थाही तशीच.......मला सांगा २० रुपयांचे रिचार्ज होईल का हो?आज जोगव्यात मिळालेले २० रूपये वापरून करता येईल का मोबाईल रिचार्ज? जर तो करता आला तर मी करेन आणि बोलीन भावाला." आई त्यांना जवळच्या दुकानात घेवून गेली आणि फोन रिचार्ज करून दिला.२० रू. चा रिचार्ज! फोन रिचार्ज केल्यानंतर त्या भावाशी बोलल्या. त्यांना खुप बरं वाटलं.

२० रुपयाच्या मोबाइल रिचार्जबद्दल आईने जे सांगितले त्यामुळे मी खुप अस्वस्थ झालो. उतारवयात नसणारे पैसे, केलं जाणारं दुर्लक्ष, मनाला बोचरी वेदना देवून गेलं.

Saturday, November 23, 2024

सर्वसामान्यांना तत्परतेने मदत करणारे देवेन्द्रजी फडणवीस, एक ह्रदयस्पर्शी आठवण!

काही वर्षांपूर्वी जसोटा कुटीर, दादर पश्चिम येथील मध्यमवर्गीय सोसायटीमधील रहिवाश्यांनी ठरवले की सोसायटीची जमीन सोसायटीच्या मालकीची व्हावी. बिल्डरने जे करायचे तेच केले. सोसायटी रजिस्टर करून दिली आणि जागा सोसायटीच्या नावावर करून देतो असे आश्वासन दिले आणि पुढे काहीच केले नाही. नंतर अनेक वर्ष तशीच गेली. मग सोसायटीच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये डीम्ड कॉन्व्हेयन्स करण्याचे ठरले आणि विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यामध्ये डीम्ड कॉन्व्हेयन्स का महत्वाचे आहे याबद्दल सर्व सभासदांना माहिती देण्यात आली आणि सर्वांनी बहुमताने तो ठराव मान्य केला.

    पुढची अडचण होती सोसायटी, बिल्डिंग आणि जागेच्या कागदपत्रांची. बिल्डरने कोणतीच कागदपत्रे दिली नव्हती. मग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी    सोसायटीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, जागेचे लेआऊट, बिल्डिंगचा नकाशा आणि सर्व फ्लॅटचे क्षेत्रफ़ळ अशी कागदपत्रे मुंबई महापालिकेतून मिळवली. पुढचा भाग होता सर्व सभासदांच्या फ्लॅटची कागदपत्रे जमा करण्याचा. काहीजणांनी रजिस्ट्रेशन केले होते तर    काहीजण हे बिल्डरचे भाडेकरू होते. त्या सर्वांची उपलब्ध असलेले सर्व कागदपत्रे (रजिस्ट्रेशन डिड, हस्तांतराचे प्रमाणपत्र, टॅक्स पावत्या इ.) जमा करण्यात आली आणि सोसायटीच्या वकीलांकडे देण्यात आली.

सोसायटीच्या सर्व सभासदांनी वकीलांचे शुल्क, कोर्ट फी आणि इतर प्रशासकीय खर्च इ.सोसायटीकडे जमा केला. मग वकीलांच्यामार्फत डेप्युटी रजिस्टार, सहकारी संस्था यांच्याकडे डीम्ड कॉन्व्हेयन्ससाठी अर्ज करण्यात आला. डेप्युटी रजिस्टारकडून बिल्डरकडे नोटीस पाठवण्यात आली पण त्याचे कोणतेच उत्तर आले नाही. सोसायटीच्या सभासदांनी मात्र डेप्युटी रजिस्टार यांच्या कार्यालयातील सर्व मिटींगना (सुनावण्या) उपस्थिती नोंदवली आणि सर्व पत्रव्यवहार नेमाने पूर्ण केला. सर्व कागदपत्रांची पूर्तता, सुनावण्यांना वेळेत उपस्थिती यामुळे शेवटी डेप्युटी रजिस्टारने जसोटा कुटीर सोसायटीच्या बाजूने डीम्ड कॉन्व्हेयन्सचा निकाल दिला. आम्ही अर्धी लढाई जिंकलो.

मग सोसाटीची एक सर्वसाधारण सभा बोलावली आणि त्यामध्ये प्रॉपर्टी कार्डसाठी जिल्हाधिकारी, मुंबई यांच्याकडे अर्ज करण्याचा ठराव पास करण्यात आला. हे काम करण्यासाठी एका व्यक्तीने आम्हाला लाखो रुपये लागतात असे सांगितले. ते सोसायटीच्या आवाक्याबाहेर होते. आम्ही त्या व्यक्तीला स्पष्ट नकार दिला आणि स्वतःच अर्ज करायचे ठरवले. डीम्ड कॉन्व्हेयन्सची ऑर्डर आणि अर्ज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केला आणि त्याची पोच पावती घेतली. पुढे एक महिन्यांनी आम्हाला तिथून पत्र आले त्यात लिहिले होते की, अजून काही कागद-पत्रांची पूर्तता करण्यात यावी अन्यथा आपला अर्ज रद्द करण्यात येईल.

    काही सभासदांनी स्टॅम्प ड्युटी भरली नव्हती त्यांना आम्ही ती भरायला सांगितली आणि त्याचे पुरावे सादर केले. आम्हाला आशा होती की आता प्रॉपर्टी कार्ड आमच्या नावावर होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाने जी काही कागदपत्रे मागितली होती त्यापैकी जी आमच्याकडे उपलब्ध होती ती आम्ही जमा केली पण काम होईल की नाही याची शाश्वती नव्हती. आधीच खूप खर्च झाला होता आणि त्यात अजून खर्च करणे अशक्य होते. त्यावेळी मला माझे एक मित्र म्हणाले, तुम्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सचिव श्री अतुलजी वझे यांना भेटा. ते नक्की तुम्हाला मदत करतील.

मी श्री वझे यांना भेटलो, त्यांनी आमच्या सोसायटी बद्दल माहिती घेतली आणि लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात फोन लावला आणि म्हणाले, “तुम्ही तिथे जा तुमचे काम होईल. “काही माणसे देवासारखी भेटतात आणि मदत करतात. मी तेथील अधिकाऱ्यांना भेटलो आणि आश्चर्य म्हणजे पुढील काही महिन्यात आमच्या सोसायटीचे प्रॉपर्टी कार्डचे काम पूर्ण झाले आणि प्रॉपर्टी कार्ड तयार झाल्यानंतर मला जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला, 'तुमचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहे, कृपया घेऊन जाणे." माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. देवेन्द्रजी तुमच्या कार्यालयातील टीमने आमचे काम आस्थेने पुर्ण केले. तुमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!

राजेश कापसे,

९८१९९१५०७०

Friday, November 15, 2024

क्षमाशील देशपांडे!

कोबे, जपान येथील एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये माझ्या रिसर्च पेपरची निवड झाली आणि मला त्याठिकाणी जाण्याची संधी मिळाली. त्यासाठी मला पैशांची जमवाजमव करायची होती. हेडगेवार रुग्णालयातील डॉ अनंत पंढरे सरांनी माझ्यासाठी अनेकांशी बोलणे केले आणि मला स्कॉलरशिप मिळवून दिली. मी सगळा  हिशोब केला आणि लक्षात आले की मला अजून दहा हजार रुपयांची गरज आहे. माझ्याकडे तेव्हढे पैसे असणे कठीण होते.

रिसर्च पेपर लिहिणे, त्याची निवड होणे आणि त्या कॉन्फरन्सला जाण्यासाठी शिष्यवृत्तीही मिळाली होती. आता दहा हजार रुपयांची गरज होती. ते मिळाले नाही तर जपानला जाणे मात्र रद्द होणार होते. मी हताश होऊन घरी बसलो होतो. 

त्याच वेळी, श्री गणेश देशपांडे, आमच्या घरी आले होते. माझ्या चेहऱ्यावरील हावभावावरून, काहीतरी बिनसले असल्याचे त्यांना जाणवले. मला घरी दीपक म्हणतात. ते मला म्हणाले, 'दीपक, काय झाले. सगळे ठीक आहे ना?" मी काहीच बोललो नाही. आई म्हणाली, 'अहो त्याचे जपानला जायचे ठरले होते, पण काही कारणांनी रद्द होतेय असे म्हणाला. काहीच सांगत नाही." ते क्षणभर काहीच बोलले नाहीत. आई ने त्यांना पाणी दिले, चहा झाला आणि ते निघणार होते त्याआधी, त्यांनी वीस हजार रुपयांचा चेक माझ्या हातात दिला. म्हणाले, "ऑल द बेस्ट!" आणि ते निघून गेले. मला त्यांचे आभार कसे मानावेत ते कळेना. मला प्रश्न पडला, "त्यांना कसे कळले असेल? माझ्या मनातले कसे ओळखले असेल त्यांनी?" मी कृतज्ञतेने त्यांच्याकडे बघत होतो. 

जपानला जाण्यापूर्वी त्यांचा निरोप आला, "दीपक, जपानमधील माझे एक मित्र नाईक यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. ते टोकियो मध्ये तुझी राहण्याची व्यवस्था करणार आहेत. त्यांना जपान मध्ये गेल्या नंतर संपर्क करणे." त्यांनी मला नाईकांचा फोन नंबर दिला. मी जपानला गेलो आणि तिथल्या घाई गडबडीत नाईकांना फोन करायचे विसरून गेलो. माझा रिसर्च पेपर आणि जपान, सिंगापुर दौरा खूप चांगला झाला. माझे खूप कौतुकही झाले, सत्कार झाले. श्री गणेश देशपांडे यांनीही माझे फोन करून अभिनंदन केले. 

जपानहून परत येऊन एक दोन महिने झाले होते. श्री गणेश देशपांडे काही कामा निमित्त संभाजीनगरला आले होते. त्यावेळी ते घरी आले. येताना पुष्पगुच्छ घेऊन ते आले. माझे कौतुक केले. मला म्हणाले, 'दीपक, तू जपान मध्ये नाईकांना फोन केला नाहीस का? त्यांनी खूप वाट बघितली तुझी. तुझे हॉटेलचे बुकिंगही केले होते. त्यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले, 'माझे हॉटेल बुकिंगचे पैसे वाया गेले त्याचे दुःख नाही, पण त्याने साधा फोनही नाही केला त्याचे जास्त दुःख वाटले'." ते एवढेच बोलले. रागावले नाहीत की चिडले नाहीत. नंतर म्हणाले, 'असे विसरायचे नाही कधी. काळजी घे भविष्यात." 

नाईकांनी त्यांना खूप ऐकवले असेल नक्कीच. पण गणेशजींनी अत्यंत सौम्य शब्दात मला समजावून सांगितले आणि मला माफही केले. किती सहजता होती त्यांचा माफ करण्यात! हा प्रसंग आयुष्यभरासाठी माझ्या मनावर कोरला गेला. क्षमाशील असावे तर गणेश देशपांडें सारखे!!!!

-राजेश कापसे

९८१९९१५०७०

Saturday, November 9, 2024

मैं एक वक्त्त पे एक काम करता हूं !

माझा मित्र, श्रीपाद कुलकर्णी नाशिकला स्वतःची लेबल प्रिंटिंगची मोठी कंपनी चालवतो. एकदा त्याच्या सोबत त्याच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये गेलो असता एक वेगळेच मॅनॅजमेन्ट तत्व शिकलो. त्याच्याकडे त्याच्या कामाची एक डायरी होती आणि त्यात तो सर्व कामे पेन ने लिहीत होता. साधारणतः महिन्यात करावयाच्या कामांची विस्तृत यादी त्या डायरीत त्याने लिहिली होती. ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळ्यात प्रथम तो डायरी उघडून त्यातील दिवसभरात करण्याची कामे एका लहान कागदावर लिहीत होता. मी त्याला कुतूहलाने विचारले तर तो म्हणाला, 'मी इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरात नाही. मी पेन, डायरी आणि या छोट्या फ्लॅश कार्डचा वापर करतो." मला आश्चर्य वाटले कारण एव्हडी मोठी कंपनी चालवताना सध्या बाजारात उपलब्ध असलेले हायटेक मोबाईल फोन आणि त्यातील ॲप वापरण्यापेक्षा तो चक्क डायरी, पेन आणि लहान कागद वापरात होता. स्वाभाविकपणे तो असे का करतो हा माझा पुढचा प्रश्न होता.

तो म्हणाला, 'हे बघ, मोबाईल मध्ये कामांची यादी लिहिली की त्याचे रिमाइंडर्स आपण टाकतो. मग वेळोवेळी फोन चा आवाज येतो आणि आपण फोन बघतो. फोन मध्ये कामाच्या यादी सोबत असंख्य गोष्टी असतात. वॉट्सअप, ई-मेल, मॅसेजेस, इंस्टाग्राम, फेसबुक एक ना अनेक. कामाचे रिमाइंडर बघण्यासाठी आपण फोन उघडतो आणि काम सोडून इतर गोष्टी बघण्यात आपण किती वेळ वाया घालवतो ते कळतच नाही. काम बाजूला पडते आणि नको त्यात वेळ वाया जातो. त्यापेक्षा डायरी बरी, कारण त्यात भरकटवणाऱ्या गोष्टी नसतात. ती एकटीच असते बिचारी! आणि त्यात फक्त कामेच लिहिलेली असतात. डायरी उघडल्यानंतर समोर काम असते आणि लगेच ते करायला सुरुवात करता येते."

'सध्या अनेकजण म्हणतात की आम्ही मल्टिटास्किंग करतो. व्हाट्सअप मॅसेजवर काम करतो, लगेच ई-मेल बघतो मग लगेच इन्स्टावर कंमेंट देतो, फेसबुक वर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मग ऑफिस मधील कामही करतो..... मराठीत एक म्हण आहे, "एक ना धड भाराभर चिंध्या'. अशी अवस्था असते बघ. माझी कामाची पद्धत सोपी आहे, एका वेळी एक काम! मग समोरचे काम करत असताना, मी फोन, ई-मेल, कॉम्पुटर सगळे बाजूला ठेवतो. ई-मेलला उत्तरे देण्याची वेळ नक्की केली आहे. नंतर मी ई-मेल बघतही नाही. व्हाट्सअप बघण्याची वेळही नक्की आहे. प्रत्येक तासात काही मिनिटे त्यासाठी, नंतर बंद. आलेला प्रत्येक फोन लगेच घेतला पाहिजे याचीही गरज नसते. जे महत्वाचे फोन नसतात, असे सर्व कॉल्स मी संध्याकाळी पूर्ण करतो. त्यामुळे कामे लवकर आणि व्यवस्थित होतात. कामे लक्षपूर्वक करता येतात."मल्टी-टास्किंग ऐवजी मी सिंगल टास्किंगला महत्व जास्त देतो. त्याने मला गुप्त सिनेमातील ओम पुरी यांचा एक डायलॉग ऐकवला, "मैं एक वक्त्त पे एक काम करता हूं !"

-राजेश कापसे

९८१९९१५०७०

Saturday, November 2, 2024

आनंद आणि दुःख 

विचार शून्य अवस्था आणि आनंद याबद्दल विचार करताना अनेक लहान सहान घटना आठवल्या. दिवसभर न आवडणारे काम आणि त्याहूनही नआवडणारा प्रवास केल्यानंतर जर जेवणात मनापासून आवडणारा पदार्थ असेल तर मी भान हरपून जेवण करतो आणि लगेच थकवा जाऊन फ्रेश वाटायला लागतं. 

भान हरवणे म्हणजेच विचार शून्य होणे. विचारशून्य अवस्था आणि आनंद या दोन गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. मराठीतील ‘मन हलके होणे’ हे वाक्य मला खुप आवडते. विचारांनी जड झालेलं मन विचारमुक्त झालं की हलक होतं आणि अल्हाददायक वाटायला लागतं. 

 मंबईतल्या सिमेंटच्या जंगलाचा आणि गर्दीचा कंटाळा आला की मी सिंधुदूर्गात जातो. तिथल्या निसर्गात मन कधी हरवून जातं ते कळतच नाही. मन हरवले की धावपळ, दगदग, कंटाळा हे विचार हद्दपार होतात आणि मी आनंदी होतो. 

सुंदर फुल, पेंटींग, सुगंध यामध्ये मन रमते आणि आनंददाई होते. 

संध्याकाळी जिममध्ये जाऊन व्यायाम करतांनाही विचार दूर पळून जातात. जिमधील वजने उचलतांना ज्या वेदना होतात त्यापूढे ॲाफिसात झालेल्या अपमानाच्या शाब्दिक वेदना क्षुल्लक वाटायला लागतात आणि माझा प्रवास परत आनंदी होण्याकडे सुरू होतो. 

माझ्या ऐका मित्राला पोहायला खुप आवडते. पाण्यात उडी  मारली की तो पाण्या सोबत एकरूप होतो आणि दुनिया विसरतो… भान हरपून पोहतो. 

सोमवार ही आठवड्याची सुरवात, त्या दिवशी ॲाफिसात बरीच कामे असतात.  सोमवारी संध्याकाळी माझा बासरीचा क्लास असतो. गुरूजींना नमस्कार करून फोन बंद केला आणि षड्ज लावला की पुढचा एक तास मी भान हरपून बासरी शिकतो. क्लास संपल्या नंतर मी आनंदाच्या अत्युच्च शिखरावर असतो. 

आपल्या आवडत्या गायकाचे गाणे ऐकताना आपली समाधीच लागते! म्हणजेच आपण विचारशुन्य होतो. 

दुःखातून जाताना आपल्या मनाची अवस्था नेमकी  विरुध्द असते. असंख्य विचार मनात असतात. आपली जवळची व्यक्ती जग सोडून गेल्या नंतर त्या व्यक्तीच्या आठवणींनी मन भरून जातं. डोळे भरून येतात. आपण दुःखाच्या गर्तेत लोटले जातो. 

कुणी टाकून बोलले, अपमान केला की त्याबद्दलचे विचार मनात चक्री वादळा सारखे घोंगावू लागतात आणि डोकं जड होतं. 

दुःखाकडून आनंदाकडे जाण्याचा मार्ग खुप सोपा आहे.. मन हलक करण्याचा मार्गही खुप सोपा आहे….भान हरवून जाईल असे काही तरी करावे. संगीत, व्यायाम, खेळ, आवडत्या व्यक्तीचा सहवास, आपल्या आवडत्या पेट (कुत्रा, मांजर) सोबत घालवलेला वेळ, जवळच्या मित्राशी मारलेल्या मोकळ्या गप्पा, चांदण्यांनी भरलेलं आकाश, हिरवागार डोंगर किंवा अथांग समुद्र ….हे अखर्चिक उपाय किती अमूल्य आहेत, नाही का?

-राजेश कापसे

९८१९९१५०७०