
२ मे २००८, केतन सोबत साईटसेव्हर्स या संस्थेत रूजू झालो. या संस्थेमध्ये नोकरी मिळण्यासाठी जी मुलाखत घेण्यात आली होती त्यामध्ये सामुहीक चर्चा (ग्रुप डिस्कशन ) हा एक महत्वाचा भाग होता. मुलाखतीसाठी निवड झालेले सर्व उमेदवार त्यात सहभागी झाले होते. चर्चेचा विषय होता, “अंध व्यक्तींचे शिक्षण”. मी जे काही थोडेफार वाचले होते त्याआधारे बोलायला सुरूवात केली. “ अंध व्यक्तींना शिक्षण देण्यासाठी ब्रेल भाषेचा वापर केला पाहिजे, ॲाडीओ बुक्सचे ग्रंथालय असले पाहिजे, त्यांच्यासाठी वेगळ्या शाळा असायला हव्यात इ .” मुलाखतीसाठी जे इतर उमेदवार होते त्यामध्ये एक अंध व्यक्ती होती. माझ्या नंतर त्या अंध व्यक्तीने बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, “Nothing about us without us” हे वाक्य आधी लक्षात ठेवा. आमच्या बद्दल विचार करणार असाल तर तो आमच्या सहभागा- शिवाय करू नका आणि हो ब्रेल ही लिपी आहे भाषा नाही आणि अंधांसाठी वेगळ्या शाळा असाव्यात पण त्या फक्त प्राथमिकच, त्यानंतर त्यांना सर्व मुलांसोबतच शिक्षण दिले पाहिजे.” हे सर्व केतन कोठारी अस्खलित इंग्रजीमध्ये ब्रिटीश लोकांच्या शैलीत बोलत होता. माझे अंध व्यक्ती आणि त्यांचे जग याबद्दलचे अज्ञान केतन कोठारीच्या एकदोन वाक्यातच स्पष्ट झाले.ही नोकरी मला मिळणार नाही हे मला सामुहिक चर्चेच्या सत्रानंतर मनोमन वाटायला लागले. केतनच्या व्यक्तीमत्वाने मी मात्र प्रभावित झालो तो कायमचा. नंतर माझे प्रेझेंटेशन आणि मुलाखत चांगली झाली पण केतन समोर मी काही टिकणार नाही हे माझ्या लक्षात आले. पुढील कांही दिवसांत ईमेल आली आणि माझी निवड झाली आहे आणि २ मे ला नोकरीवर रूजू व्हायचे आहे असे त्यात लिहीले होते. मनात विचार आला, “ एकच जागा होती, जर माझी निवड झाली असेल तर केतनला डावलले गेले असणार!”
मी २ मे २००८ रोजी मालाड येथे असणाऱ्या साईटसेव्हर्सच्या कार्यालयात रूजू होण्यासाठी गेलो. तिथे केतनही जॅाईन होण्यासाठी आला होता. नंतर कळले की आधी एकच पोस्ट होती पण आम्हा दोघांचे इंटरव्ह्यू या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आवडले आणि त्यांनी आम्हां दोघांनाही कामावर घ्यायचे ठरवले. मला एक नवीन मित्र मिळाला.
एका अंध व्यक्ती सोबत काम करण्याचा तसा हा माझा पहिलाच प्रसंग होता. हा प्रवास कसा करणार? ईमेल, संगणकाचे काय? ते कसे काय जमणार, जेवणाचे काय? आणि हा देशभर प्रवास कसा करणार? पैशांची देवाण घेवाण … असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते.
आम्ही सोबत काम करायला सुरुवात केली आणि एक नवीन जग माझ्यासमोर उलगडू लागलं. केतनला कंप्युटर दिला गेला आणि त्यावर त्याने जॅाज नावाचे एक सॅाफ्टवेअर इन्स्टॅाल करून घेतले. केतन अत्यंत शिताफीने संगणक सुरू करायचा आणि नंतर जॅाजच्या मदतीने ते तो वापरायचा. ईमेल वाचणे, त्याला उत्तरे देणे, प्रोजेक्ट प्रपोजल तयार करणे अशी सर्व कामे तो करत असे. त्याने संगणक सुरू केले की जॅाजचा आवाज सुरू होत असे आणि त्या सॅाफ्टवेअरच्या सुचनांनुसार तो संगणकावर काम करत असे. जॅाज त्याला आलेले ईमेल वाचत असे आणि त्याने जे त्या मेलला उत्तर लिहीले आहे ते वाचून दाखवत असे. कानाला हेडफोन असायचा पण एक दोन तास काम केल्यानंतर तो हेडफोन काढून ठेवायचा. जॅाजचा आवाज सुरू असल्याने मला माझे काम करतांना त्रास होत असे. मी एकदा चिडून म्हणालो, “केतन अरे हेडफोन लाव ना. त्रास होतोय त्या आवाजाचा.” त्याचे उत्तर होते, “मित्रा फक्त पाच मिनिटे झाली आहेत हेडफोन काढून तर इतका कंटाळलास. तो आवाज हेच माझं आयुष्य आहे!” मी निःशब्द झालो. मला माझीच लाज वाटली. त्यानंतर मी त्याला कधीच त्या आवाजावरून बोललो नाही. नंतर माझीही त्या आवाजाशी मैत्री झाली. एकदा तो सहज म्हणून गेला, " जब बच्चा जन्म लेता है तो वह रोता है और सब सगे संबंधी खुषीसे हसते है! पर, बच्चा अगर अंधा हो तो बच्चा तो रोता है....मां बाप भी रोते है..." माझे डोळे पाणावले!
मला सतत वाटायचे माझा स्वतःचा लॅपटॅाप असावा. मी एकदा केतनसमोर ते व्यक्त केले, एका आठवड्यात या माझ्या मित्राने उत्तम स्थितीत असलेला लॅपटॅाप अत्यंत कमी किमतीत मला मिळवून दिला.
केतन ॲाडिओ बुक्स ऐकायचा. त्याच्याकडे अशा पुस्तकांची मोठी लायब्ररीच होती. मी कल्याण ते मालाड असा प्रवास करत असे. पुस्तक वाचण्या ऐवजी मी ॲाडिओ बुक्स ऐकावे असे ठरवले. केतनला सांगितले, तो म्हणाला आठवडाभर थांब. त्याने लॅमिंगटन रोडवर जाऊन माझ्यासाठी एक एम पी ३ प्लेअर आणला आणि त्यात काही ॲाडिओ बुक्स टाकून दिली. त्याचे आभार कसे मानावे ते मला कळत नव्हते!
केतनने राज्यशास्त्र विषयात एम.ए. केले होते आणि त्यात त्याला मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदकही मिळाले होते हे विशेष! आणि साइटसेव्हर्स मध्ये काम करताना तो सोशल आन्त्रप्रिनरशीपमध्ये नरसी मोन्जी कॅालेजात एम.बी.ए करत होता. क्रिकेट,साहित्य ते राजकारण अशा अनेकविध विषयांवर आमच्या गप्पा होत असत.
आम्ही लोकलने सोबत प्रवास करत असू. तो माटुंग्याला उतरायचा. बांद्राचा नाला आला की तो लगेच म्हणायचा, “देख बांद्रा आ गया.” मी त्याला विचारले, कसे ओळखलेस तू? म्हणायचा “अरे सोपे आहे. एवढा घाण वास फक्त इथेच येतो."
माझ्या अनेक गुजराथी मित्रापैकी, गुजराथी भाषेच्या प्रभावाशिवाय स्वच्छ मराठी आणि उत्तम इंग्लिश बोलणारा हा माझा एकमेव मित्र!
आम्ही सोबत प्रवास करतांना मी त्याचा हात पकडायचो आणि त्याला सोबत घेऊन जायचो. एक दिवस मला न दुखावता तो म्हणाला असे ओढत जाऊ नकोस रे,मला चालता येते. त्याने अंध व्यक्तीला सोबत घेऊन कसे चालायचे याचे साईटेड मॅन टेक्निक समजावून सांगितले. मग मी त्याचा उजवा हात माझ्या डाव्या हाताजवळ ठेवायचो, तो माझा डावा दंड पकडायचा आणि आम्ही चालायचो, रस्त्यात खड्डा, पायरी असेल तर त्याला मी सांगयचो.
कधी कधी आम्ही चर्चगेट जवळ असलेल्या एका हॅाटेलमध्ये जेवायला जात असू. स्टेशनला उतरल्यानंतर त्या हॅाटेलपर्यंतचा रस्ता केतन मला दाखवायचा. कधी बुफे असेल तर तिथे काय पदार्थ ठेवले आहेत हे सांगूनच त्याला वाढणे अपेक्षित असे. ‘पंगत’ ही भारतीय जेवणाची पध्दतीच सर्वसमावेशक आहे हे त्याचे ठाम मत असे. आम्ही सोबत एक दोन चित्रपटही बघितले. मला प्रश्न पडत असे की हा त्या चित्रपटांत काय बघणार? त्यावर केतनचे उत्तर असायचे, “चित्रपट बघायचा नसतो. अनुभवायचा असतो.” आम्ही कुठे मिटींगला गेलो की तो म्हणायचा, “राजेश, मला फक्त खुर्चीला स्पर्श करून दे, मी माझा बसू शकतो.”
आम्ही बऱ्याच वेळा परराज्यात प्रवासाला सोबत जात असू. जेंव्हा हॅाटेल मध्ये मुक्काम असायचा तेंव्हा त्याच्या रूममध्ये कुठे काय आहे ते त्याला दाखवून दिले की काम झाले. कधी कधी लाईट गेल्यानंतर माझी पंचाईत होत असे. लाईट कधी येणार याची मी अस्वस्थ होऊन वाट बघत असे. त्यावेळी केतन म्हणायचा “लाईट गेल्या नंतर तू अपंग होतोस. मला त्याचा काहीच त्रास होत नाही. हा फायदा आहे बघ अंध असण्याचा.” अशावेळी मी स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघत असे.
दर तीन महिन्यांनी त्याचा रेल्वेचा पास काढण्यासाठी मी त्याच्या सोबत जात असे. तो अंध आहे हे त्या रेल्वे क्लार्कला कळत असे पण अपंगत्व प्रमाणपत्राची प्रत द्यावी लागत असे आणि त्याची मुळ प्रतही दाखवणे गरजेचे असे. हे नसेल तर पास मिळायचा नाही. केतन म्हणायचा,” अरे प्रत नसेल तर झेरॅाक्सच्या दुकानात धक्के खात जा आणि परत या हे नेहमीचेच असते. जरा जास्त वेळ काढूनच मी ही कामे करतो."
सहा वर्ष आम्ही सोबत काम केले आणि मी अंधत्व अनुभवले. त्यातले चढ उतार बघितले. केतन आता सेंट झेवियर्स कॅालेजात मोठ्या पदावर काम करतो. केतननी दिलेली ॲाडीओ बुक्स, लॅपटॅाप, उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी केलेले मार्गदर्शन आणि त्याहीपेक्षा अत्यंत खडतर स्थितीमध्ये हसत खेळत जगण्याचा त्याचा स्वभाव यामुळे मी समृध्द झालो.