साधारणतः एक वर्षापूर्वी माझी ओळख एका संन्यासी स्वामींबरोबर झाली. माझ्या एका डॉक्टर मित्राने मला फोन केला आणि सांगितले,”अरे माझा M.B.B.S चा एक मित्र स्वामी योगी अनंत (नाव बदलले आहे) तुझ्या हॉस्पिटलजवळच एका आश्रमात राहतो आणि तिथे त्याला मोफत नेत्र शिबीर घ्यायचे आहे. अनेक मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांना त्याचा फायदा होईल. त्यांना भेट नक्की.” मला जरा आश्चर्यच वाटले. कारण M.B.B.S चा क्लासमेट, संन्यासी हे जरा माझ्यासाठी अजबच होते. मी लगेच गाडी काढली आणि त्यांच्या आश्रमाकडे निघालो. त्या आश्रमामध्ये स्वामींची ओळख झाली. त्यांनी माझे खूप प्रेमाने आणि विनम्रपणे स्वागत केले, “नमो नारायण डॉ राजेश! तुमचे स्वागत आहे.” त्यांनी त्या आश्रमात एक आरोग्य केंद्र सुरु केले होते आणि जवळपासच्या ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांमध्ये ते आरोग्य सेवा देण्याचे काम करत होते.
“M.B.B.S झाल्यानंतर का संन्यास घेतला असेल?” हा प्रश्न माझ्या मनात आहे हे त्यांनी माझ्या चेहऱ्यावरील हावभावांवरून ओळखले. अनेक जण M.B.B.S करून पुढे M.D, D.M असे बरेच शिक्षण घेऊन श्रीमंत होण्याची स्वप्न बघतात. अकरावी, बारावीमध्ये तर दिवस रात्र एक करून अभ्यास करून सर्वोत्तम मार्क मिळाले तरच M.B.B.S साठी प्रवेश मिळतो. काही पालक तर करोडो रुपये देऊन या अभ्यासक्रमाला आपल्या मुलांना प्रवेश मिळवून देतात. M.B.B.S साठी काहीपण अशी मानसिकता असणारे अनेक पालक आणि विदयार्थी मी बघितले आहेत. किंबहुना मी सुद्धा त्यापैकीच एक होतो आणि या माणसाने नामवंत अशा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून M.B.B.S चे शिक्षण अत्यंत चांगल्या मार्काने पूर्ण करून चक्क संन्यास घेतला! स्वामीजी मला म्हणाले, “राजेश, हे बघ ही ईश्वरी इच्छा होती. तुम्ही लोक संसार करून समाजासाठी मोठे योगदान देता. मी संन्यस्त राहून वैद्यकीय सेवा देतो. प्रत्येकाचा मार्ग आणि त्यातून मिळणार आनंद वेगळा.” मी त्यांना भेटून भारावून गेलो. मग आम्ही त्यांच्या आश्रमात मोफत नेत्र शिबिरे घ्यायला सुरुवात केली. अनेक रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आमच्या आय हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या. स्वामीजी स्वतः त्या रुग्णांसोबत हॉस्पिटलमध्ये येत असत. आमची खूप चांगली ओळख झाली.
एक दिवस मला स्वामीजींचा फोन आला. म्हणाले, “राजेश, तुझ्या हॉस्पिटलमध्ये श्री व सौ राणे (नाव बदलले आहे) येतील. ते साधारणतः ८५ आणि ८० वर्षांचे आहेत आणि त्यांना डोळ्यांची तपासणी करायची आहे. त्यांची योग्य ती काळजी घे. ते डायबेटिक आहेत. त्यामुळे जरा वेळेत उपचार होतील असे बघ.” मी त्या दोघांना हॉस्पिटलच्या स्वागत कक्षात भेटलो आणि त्यांची तपासणी व उपचार लवकर होतील याची व्यवस्था केली. त्या काकांना बघितल्यानंतर मला स्वामीजी आणि त्यांच्यामध्ये खूप साम्य जाणवले. मी विचार करत होतो, “हे स्वामीजींचे आई वडील तर नसतील?” त्याची तपासणी झाल्यानंतर त्यांना सोडण्यासाठी मी त्यांच्या कारपर्यंत गेलो. माझ्या मनात जे चालले होते, ते न राहवून मी व्यक्त केले, “काका, स्वामीजी तुमच्यासारखे दिसतात.” ते म्हणाले, “हो, ते माझे चिरंजीव होते. ते आता संन्यासी आहेत.” हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. दुसरे कुणी असते तर दु:खी कष्टी दिसले असते पण मुलाने M.B.B.S झाल्यानंतर घेतलेला संन्यास त्यांनी सहजपणे आनंदाने स्वीकारला होता. आपल्या अपेक्षांचे ओझे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मुलांवर ठेवणारे पालक आणि एकुलत्या एक मुलाने M.B.B.S झाल्यानंतर घेतलेला संन्यास सहज स्वीकारणारे हे पालक बघून आश्चर्य आणि आदर या संमिश्र भावनांनी मी त्यांना निरोप दिला.
-राजेश कापसे, 9819915070
deepakniramay@gmail.com