माझ्या मुलाची (ओजसची) युनिट टेस्ट संपल्यावर ओपन हाऊससाठी शाळेची ई मेल आली. मी रजा टाकली आणि आम्ही ओपन हाऊससाठी शाळेत गेलो. जरा लवकरच पोचलो. कारण गर्दी झाली असती. सगळ्यात आधी त्याच्या वर्गात गेलो. मग त्याच्या क्लास टीचरने त्याचे सर्व पेपर काढून दिले. आम्ही प्रत्येक विषयाचे पेपर बघितले आणि त्यात काय चुकले ते समजून घेतले. मार्क चांगले मिळाले होते.मी ओजसचे अभिनंदन केले आणि “अजून चांगला अभ्यास कर!” असा सल्ला दिला. मग आम्ही क्लास टीचरना भेटलो आणि नेहमीप्रमाणे “कसा काय नीट अभ्यास करतो ना हा? वर्गात नीट वागतो ना?” असे प्रश्न विचारले. त्या म्हणाल्या, “ तो हुशार आहे, व्यवस्थित लक्ष देतो, प्रश्न विचारतो.गुणी आहे मुलगा. जरा बडबड जास्त करतो पण ठीक आहे. सिली मिस्टेक टाळायला हव्यात.हस्ताक्षर चांगले करायला पाहिजे.” सही करून आम्ही त्याच्या वर्गातून बाहेर पडलो. मग तो मला त्याच्या विविध विषयांच्या शिक्षकांना भेटायला घेऊन गेला. सर्वांनी त्याचे कौतुक केले. मला त्याची प्रगती पाहून अभिमान वाटला. बाबाला सर्वांनी चांगले सांगितले होते त्यामुळे आमचे चिरंजीव आनंदात होते. मग आम्ही कॅंटीनमध्ये नाश्ता केला आणि निघालो.
घरी आल्यावर मनात विचार आला, “प्रत्येक तीन महिन्यांनी माझेही असेच ओपन हाऊस झाले तर?” मग मी कल्पना विश्वात रमून गेलो. “कसे असेल माझे ओपन हाऊस?” माझ्या हॅास्पिटलचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, माझे बासरीचे गुरूजी, माझ्या पुस्तकाचे प्रकाशक, माझे आर्थिक सल्लागार वसंत कुळकर्णी, माझे कार्डिओलॅाजिस्ट, हे सगळे माझे तीन महिन्यांचे स्कोअर कार्ड घेऊन बसलेले असतील. आता आई थकली आहे.अण्णा कधीचेच हे जग सोडून गेले.त्यांच्यापैकी कोणी येणार नाही ओपन हाऊससाठी! मीच असेन, माझे यश अपयशाचे स्कोअर कार्ड तपासायला! आपण मोठे होतो, पायावर उभे राहतो.आई-वडील थकलेले असतात किंवा दोघांपैकी एक किंवा दोघेही नसतात.कधी पालक जिवंत असतानाही आपण आपल्याला पोरके करून टाकतो! काय हरकत आहे आपले विचार त्यांच्या बरोबर शेअर करायला? जसा मला अभिमान वाटला,आनंद झाला तसेच त्यांनाही वाटेल नक्कीच! जरा या विचाराने डोळे पाणावले. मग विचार चक्र सुरू झाले.
माझे बोर्ड ॲाफ डिरेक्टर्स नंबर्स आणि नफा यांच्या मी तयार केलेल्या प्रेझेंटेशनवर मला तासतील.डेफिसीट कमी करण्यासाठी, बिझनेस वाढविण्यासाठी स्टॅटर्जीज सांगतील.मग ओपन हाऊस (त्रैमासिक मिटींग) संपेल.त्यातले तसे काही डिरेक्टर म्हणतील, “राजेश, you are doing good but you know you need to work hard to achieve more numbers!!” काहीजण जरा त्रागा व्यक्त करतील. मग लंच करून ओपन हाऊस संपेल.८०% टार्गेट पूर्ण केल्यामुळे “सा** नोकरी नाही जाणार.” हे समाधान आणि पुढच्या तीन महिन्यांचे टार्गेटचे ओझे घेवून मी बाहेर येईन..
मग बासरीचे ठाकूर गुरूजी म्हणतील, “राजेश तिसऱ्या परीक्षेचे सात राग चांगले तयार झाले आहेत. पण भैरवी नीट नाही झाली.जरा कोमल रिषभ चढा लागतो.बासरीची फुंक अजून मजबूत व्हायला हवी.प्रत्येक स्वर चांगलाच वाजायला हवा. पण खूप सुधारणा आहे.कौतुक आहे हो तुमचं.युनिट हेड म्हणून काम करूनही खूप वेळ काढून बासरी शिकताय तुम्ही! तुमचा वृंदावनी सारंग मस्त जमला आहे!”
आर्थिक सल्लागार कुळकर्णी म्हणतील, “राजेश तुमचा पोर्टफोलीओ बरा आहे पण अजून गुंतवणूक वाढवायला हवी.तुम्हाला पेन्शन नाही.मुले मोठी होत आहेत,त्यांच्या शिक्षणाची सोय करायला हवी पण ठीक आहे एकूण १२% रिटर्न मिळतो आहे. छान!”
मग रक्त, ईसिजी, स्ट्रेस टेस्ट, 2D Echo, वजन असे रिपोर्ट बघून कार्डिओलॅाजीस्ट म्हणतील,” कोलेस्टेरॅाल जरा वाढले आहे राजेश. ब्लड प्रेशर ठीक आहे.बाकी रिपोर्ट नीट आहेत पण वजन वाढले आहे खूप.जरा डायट करा.खूप स्ट्रेस घेताय तुम्ही.रात्री झोप लागायला हवी.गोळ्या चुकवू नका. जरा मीठ कमी करा.व्यायामासाठी वेळ काढा.मेडिटेशन करा.” मग ते प्रिस्क्रिप्शन देतील आणि मी रिलॅक्स होऊन बाहेर पडेन.
संध्याकाळची 6.37 ची वडाळा लोकल पकडून वडाळ्याला माझ्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशकाकडे जाईन. ते म्हणतील, “राजेश, पुस्तक बरं झालं आहे पण काही ठिकाणी भरकटले आहे.जरा काही भाग काढून टाकला पाहिजे. मग ते १६०-१७० पानांचे झाले की वाचनीय होईल. तुमचे लिखाण वाचून छान वाटले.तीन महिन्यांनी प्रकाशित करू आपण!” मी एकदम आनंदाने तिथून बाहेर पडून स्कूटर स्टार्ट करून मग दादरला घरी येईन. ओपन हाऊस तसे बरे झालेले. त्यामुळे मग आम्ही सगळे जेवायला बाहेर जाऊ.शिवाजी पार्कला फिरताना बायकोबरोबर दिवसभराच्या गप्पा होतील.घराचा ई एम आय,शिल्लक कर्ज, मालवणच्या घराचे काम,मोठ्या मुलाची CET, त्याचा अभ्यास,पुढच्या तीन महिन्यातील आमच्या दोघांचे कामामुळे होणारे प्रवास,घराचे नियोजन म्हणता म्हणता रात्रीचे अकरा कधी वाजतील ते कळणार नाही. ओपन हाऊस संपताना मनात विचार असतील, “पुढच्या तिमाहीत मला किती नंबर्स करायचे आहेत, किती नफा व्हायला हवा नाहीतर पुढची बोर्ड मिटींग अवघड असेल, वजन कमी करण्यासाठी परत दिक्षीत डायट करायला पाहिजे बॅास, नाहीतर परत कार्डिओलॅाजिस्ट ओरडतील.बासरीच्या परीक्षेतील थेअरी राहिली आहे, झपताल अजून लक्षात रहात नाही,बायको म्हणेल, “अरे सकाळी ७.१० ची लोकल पकडायची आहे ना? नाहीतर लेट मार्क होईल. बस झाले विचार करणे, झोप आता.”
मग सकाळची ७.१० ची लोकल, हॅास्पिटल,नंबर्स, पेशंट, बासरी क्लास पुढच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळण्यासाठी प्रयत्न.पुढच्या ओपन हाऊस ची तयारी.असो "ये जीवन है, इस जीवनका यही है रंगरूप..."
-राजेश कापसे, 9819915070
deepakniramay@gmail.com