Sunday, January 5, 2025

मॅनजेमेंटचे कानमंत्र देणारे माझे गुरु : कर्नल डॉ मदन देशपांडे

२०११ मध्ये मी नुकताच लंडनहून शिक्षण घेऊन परत आलो होतो. मध्यप्रदेशातील सेवासदन आय हॉस्पिटल मध्ये एका कॉन्फरन्ससाठी गेलो असताना माझी ओळख मैत्रीच म्हणा ना कर्नल डॉ. मदन देशपांडे सरांबरोबर झाली. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. भोपाळहून मुंबईला परत येत असताना आम्ही बरोबरच निघालो.दोघांचे विमानही एकाच वेळेस होते. सर अग्निहोत्र न चुकता दररोज करतात हे मला कळले. त्यांना अग्निहोत्राबद्दल विचारले. ते कसे करायचे हे सरांनी समजावून सांगितले आणि क्षणार्धात त्यांच्याजवळ असलेले अग्निहोत्र पात्र आणि इतर अग्निहोत्राचे साहित्यही दिले. मला खूप आश्चर्य वाटले. मी त्यांना म्हणालो, "सर, इतक्या लवकर तुम्ही तुमच्या जवळचे अग्निहोत्र पात्र आणि साहित्यही मला दिलेत?" सर म्हणाले, "अरे, चांगल्या कामाला उशीर कधी करू नये.तू तयारी दाखवलीस, अगत्याने चौकशी केलीस. मग तुला ते दररोज करायचे असेल आणि मी तुला त्यात मदत करू शकत असेन तर तो निर्णय क्षणार्धात व्हायला हवा." मी One minute Manager हे पुस्तक वाचले होते पण त्याचा प्रत्यय आला!

नंतर सर व्हिजन २०२० चे अध्यक्ष झाले आणि परत एकदा माझी त्यांची भेट दिल्ली विमानतळावर झाली. मी जरा चिंतेत असल्याचे सरांना जाणवले. आम्ही दोघेही एकाच कॉन्फरन्सला जात होतो. मग एकाच कारमध्ये निघालो. जातांना त्यांनी सहज चौकशी केली, "काय झाले राजेश?" मी माझ्या अडचणी सांगितल्या. त्यांनी मला अत्यंत महत्वाचे डिप्लोमसीचे तत्व सांगितले. म्हणाले, "राजेश एक श्लोक लक्षात ठेव. दुष्ट तोचि ओळखावा, परी कळोची न द्यावा. महत्व देवोनी वाढवावा वेळोवेळी. राखावी बहुतांची अंतरे, फळ येती तदनंतरे." "हे बघ, कुठेही काही करताना सगळ्यात आधी तिथे दुष्ट कोण आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याला महत्व हवे असते.ते त्याला द्यायचे. त्याला मोठे म्हणायचे.त्यानी आपले काही बिघडत नाही. किमान तो आपल्या बाजूने होतो आणि बऱ्याच अडचणी टळतात. अनेकांची अंतरे म्हणजे मने राखावी लागतात आणि मग यश मिळते. बघ हे सूत्र वापरून नक्की उपयोग होईल." मी त्यांच्याकडून दुसरे महत्वाचे व्यवस्थापनाचे सूत्र शिकलो.

नंतर मी नायजेरियाला गेलो आणि एक दोन वर्षे सरांची भेट झाली नाही. फोनवर बोलणे होत असत. मी नायजेरियाहून परत यायचे ठरवले तेव्हा सरांना फोन केला. क्षणाचाही विचार न करता ते म्हणाले, 'जॉईन हो एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलमध्ये सी.इ.ओ म्हणून. संध्याकाळपर्यंत मला माझे नियुक्ती पत्र त्यांनी ई-मेल केले होते. सरांसोबत काम करण्याची सुवर्ण संधी मला मिळाली होती. मी ती स्वीकारली आणि पुण्याच्या एच. व्ही.देसाई आय हॉस्पिटलमध्ये सी.इ.ओ म्हणून रुजू झालो. तो शनिवारचा दिवस होता. माझ्या जॉईनिंग फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या. त्यांनी मला केबिन दिली. मग मी दुपारी त्यांना भेटलो. ते म्हणाले, 'अरे मुंबईला तुझे कुटुंब वाट बघत असेल.अनेक वर्षांनी परदेशातून परत आला आहेस. काही दिवस त्यांच्या सोबत घालव, मग ये आणि काम सुरु कर." आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी, गरजा ओळखून त्याने काही विचारण्याच्या आत त्याला मदत केली पाहिजे आणि कामाबरोबर कुटुंबही तितकेच महत्वाचे असते हे प्रत्येक प्रमुखाने लक्षात ठेवले पाहिजे हे व्यवस्थापनाचे तिसरे तत्व मी शिकलो. पुढे काम करताना कुणी कर्मचारी नीट वागला नाही तर त्याला लगेच मेमो देण्याऐवजी त्याची अडचण समजून घेण्याची सवय मी स्वतःला लावून घेतली. सरांनी ते वळण लावले.अत्यंत खेळीमेळीचे सहज वातावरण त्यांनी एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये तयार केले होते. जिथे कामासोबतच व्यक्तिगत आयुष्यही तितकेच महत्व होते.

कर्मचाऱ्यांना रजा न देण्याचा माझा स्वभाव होता. त्यांना कुणीतरी हे सांगितले. त्यांनी मला बोलावून घेतले आणि म्हणाले, "राजेश, जर कुणी रजा मागितली ती कधी नाकारायची नाही. कारण तो कर्मचारी काहीतरी कामासाठी रजा घेत असतो. रजा नाही दिलीस तर, तो काम नीट करणार नाही आणि हो जर कुणी राजीनामा दिला तर तोसुद्धा नाकारायचा नाही. त्याला शुभेच्छा देऊन मार्गस्थ करायचे. कारण जो राजीनामा देतो तो नंतर कधीच आनंदाने काम करत नाही." मी व्यवस्थापनाचे चवथे तत्व शिकलो.

सरांना कुठली परवानगी मागितली तर ते काही सेकंदात हो किंवा नाही असा निर्णय देत असत. त्यांना विचारणे मात्र गरजेचे असे. त्यांना त्याबद्दल एकदा विचारले. ते म्हणाले, 'बघ, उगाच ताटकळत कुणाला ठेवायचे नाही. तुला अधिकारी म्हणून तुझ्यासोबत असणारे सहकारी काय करणार आहेत हे माहीत असलेच पाहिजे. कारण शेवटी तू जबाबदार असणार आहेस परिणामांसाठी!" हे व्यवस्थापनाचे पाचवे तत्व त्यांनी शिकवले.

"बाप दाखव नाही तर श्राद्ध कर!" हे त्यांचे खूप आवडते तत्व. जो परिणामकारकता सिद्ध करेल त्यालाच अधिकार मिळतील. फक्त बडबड करून काहीच उपयोग नाही. स्वतःला सिद्ध करता आले पाहिजे. पुढे सरांनी मला NABH चे काम दिले आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारही दिले. त्यांच्या पाठींब्यामुळेच मी ते अवघड काम केवळ ९ महिन्यात पूर्ण करू शकलो. हे काम करताना मध्ये एक वेळ अशी आली होती की, काही कारणांनी ते मिळणार नाही. मी सरांना फोन केला. सर म्हणाले, "ठीक आहे. नाही मिळाले तर नाही. विसरून जा. दुसऱ्या कामाला लाग. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या. तू प्रयत्न केलेस हे मला माहिती आहे. ते कधीच वाया जाणार नाहीत. जो काही ८-९ लाख खर्च झाला आहे, त्याबद्दल ट्रस्टीना मी उत्तर देईन!" मी अवाक झालो आणि व्यवस्थापनापलीकडेही माणूस महत्वाचा असतो हे व्यवस्थापनाचे सहावे तत्व मी त्यांच्याकडून शिकलो. मी परत जोमाने कामाला लागलो आणि पुढे काही दिवसातच आम्हाला NABH मिळाले.

NABH मिळाले म्हणून सरांनी सर्व ट्रस्टीना बोलावून मोठा कार्यक्रम ठेवला आणि माझा सत्कार केला. नंतर गमतीने म्हणाले, "एखादे काम पूर्ण व्हायचे असेल तर चार शहाण्यांसोबत एक मेहनत करणारे गाढव असावे लागते." आम्ही दोघेही खूप हसलो आणि मी व्यवस्थापनाचे सातवे आणि महत्वाचे तत्व शिकलो.

करोना साथीनंतर मी एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल सोडून मुंबईला परत जाण्याचा निर्णय घेतला आणि सरांना ते सांगायला गेलो. त्यांच्या व्यवस्थापन तत्वानुसार त्यांनी "शुभास्ते पंथानःअस्तु!" म्हणून आशीर्वाद दिला. भारतातील नेत्र आरोग्य विषयातील एका उत्तुंग गुरुकडून मी खऱ्या अर्थाने व्यवस्थापनाची मौल्यवान तत्व शिकलो आणि आजही त्याचा उपयोग माझ्या दररोजच्या कामात होतो. सर आजही तितकेच उत्साहात मला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याकडून नवनवीन तत्व शिकायला मिळतात.अशी आयुष्यातील मौल्यवान तत्व शिकवणाऱ्या गुरूंना माझे प्रणाम!

-राजेश कापसे

No comments:

Post a Comment