Monday, January 13, 2025

माझे आडनाव माझी जात आणि मी..

मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो," कापसे म्हणजे ?' प्रश्नकर्त्याला खरेतर माझी जात कोणती आहे हे विचारायचे असते हे मला लगेच लक्षात येते. मी उत्तर देतो. ' अहो मी तुमच्यापैकीच आहे." मग त्यांना बरे वाटते.

माझे आडनाव कुलकर्णी,जोशी, कर्वे, बर्वे, देशपांडे, जाधव, जगदाळे, भोसले, कांबळे, गायकवाड इ.असते तर साधारणतः माझ्या जातीचा अंदाज, मला प्रश्न विचारणा-यांना आला असता.'कापसे' हे आडनाव तसे जातवाचक नसल्याने अनेकांना मी जातीने कोण ? असा प्रश्न पडतो.

समजा मी एकाच ठिकाणी इमानेइतबारे नोकरी केली असती तरी फार अडचण झाली नसती. कारण एकाच ठिकाणी ५-१० वर्ष काम केले की सहसा आपल्या देशात सर्वकाही माहिती होते किंवा माहित करून घेतले जाते. मी पडलो 'मॉडर्न' भटका विमुक्त'! मागच्या वीस वर्षात मी तीन देश आणि सात नोकऱ्या असा विक्रम केला आहे. दर तीन वर्षांनी नोकरी बदलत असल्याने विविध जाती आणि धर्माच्या लोकांना भेटतो आणि त्यांच्याबरोबर जवळून काम करतो. त्यामुळे मी कोण? हा प्रश्न माझ्या सहकार्यांना पडणे अत्यंत स्वाभाविक !

परदेशात 'Are you from India? 'yes' एवढेच पुरेसे होते. फारतर धर्म माहिती करण्याचा क्वचित प्रयत्न व्हायचा पण त्यापलिकडे कुणी फार चिकित्सा केली नाही. पण आपल्याकडे मात्र विचारू नका. मी माझी जात सांगितली नाही , की लगेच पुढचा प्रश्न, " अहो, तुमचे आजोळ कुठले ?" माझे उत्तर 'नांदेड: मामांचे नाव- देशमुख. प्रश्नकर्ता अधिकच गोंधळात पडायचा," काय करतात ?" "शेती“ मग प्रश्न विचारणारा “हो का ? बरं बरं आमच्यापैकीच वाटतं!" असे अनेकांना वाटत असे. कुणी अधिक चिकित्सक भेटला तर तो अजून काही प्रश्न विचारायचा," सासर कोणते?" वहिनींचे माहेरचे आडनांव काय?" "साबडे" हे उत्तर देताच त्याच्या चेह-यावर अजून मोठे प्रश्न चिन्ह दिसायचे. मग सहज पुढचा प्रश्न,बहीण, भाऊ काय करतात? कुठे असतात? लग्न झाली का?" त्यामध्ये उत्तर देताना बहिणीचे सासरचे नाव सांगितले की यांना हायसे वाटायचे !मग पुढे चर्चा व्हायची. " देशस्थ का ?" मला प्रश्न पडायचा एवढ्या चौकश्या का ? काय मिळतं जात समजून घेऊन ? काय साधतो आपण?

लहान असतांना गंगाखेडला आम्ही एकमेकांना जातीने हाक मारायचो पण त्यामध्ये कधी द्वेष नव्हता. आम्ही सर्व मुलं नवबौद्ध वस्तीमधील साळवे सरांकडे इंग्रजीच्या शिकवणीसाठी जात असू. अनेकवेळा मी इतर जातीच्या मित्राकडे रहायला जात असे. आमच्या घराच्या आसपास सगळीच घरे लिंगायत समाजाची होती. जातीमुळे आमच्या वागण्या बोलण्यात,एकमेकांच्या घरी जेवायला जाण्यात काही अंतर नसायचे. एक प्रकारची समरसता होती असेच म्हणावे लागेल.'कापसे 'या आडनावाची फारशी चिकित्सा कुणी केली नाही.

बारावीपर्यंत जात -आडनाव हा विषय फार कधी महत्वाचा वाटला नाही. पण १२ वीचा अभ्यास करताना मात्र आरक्षणामुळे 'जात' हा विषय जाणवायला सुरुवात झाली. पण ते तेवढ्यापुरतेच होते. १२ वी संपली. मार्क कमी मिळाले आणि M.B.B.S.ऐवजी B.A.M.S ला प्रवेश घ्यावा लागला. पुढे मुंबईला आल्यानंतरही आडनावावरून जातीची चौकशी कुणी केली नाही. पण आमच्या वर्गामध्ये जातीमध्ये विभागलेले ग्रुप मात्र तयार झाले होते. हॉस्टेलवरही थोड्याफार प्रमाणात हे जाती नुसार वर्गीकरण होते. 

पहिल्या वर्षात हॉस्टेलला प्रवेश घेतल्यानंतर तळ मजल्यावर असणाऱ्या खोलीमध्ये मला रहायला जागा मिळाली. माझ्या आडनावावरून माझ्या सिनियरला माझ्या जातीचा अंदाज आला नाही पण चार पाच महिने तिथे राहिल्या नंतर जेंव्हा माझ्या जातीचा अंदाज त्याला आला तेंव्हा मात्र त्याने मला रूम बदलायला सांगितली आणि मी हॉस्टेलच्या पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये रहायला सुरुवात केली. 'आडनाव' आणि जात' याचे चटके, भीषणता मला जाणवायला लागली.पण मुंबईत इतरत्र जात हा विषय तसा फार महत्त्वाचा नव्हता. 'मराठी' या नावाखाली सर्वच जातींचे मराठी भाषिक असं समीकरण होते.

मुंबईतील शिक्षण संपल्यानंतर मी जेव्हा संभाजीनगर (औरंगाबाद) येथे नोकरीसाठी आलो तिथे डॉ. हेडगेवार रुग्णालयात काम करतांना मला माझे आडनाव आणि माझी जात कुणीच विचारली नाही. रुग्णालयाच्या सेवावस्ती प्रकल्पामध्ये नंतर मी काम करायाला सुरुवात केली. तिथे काम करतांना 'जात' हा विषय अधिक विषण्ण करून गेला आणि मी सामाजिक समरसता मंचच्या जातींना जोडणाऱ्या, समरस करणाऱ्या कामाला सुरुवात केली.

हेडगेवार रुग्णालयातील नोकरी सोडल्यानंतर अनेक वर्ष मी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केले.लंडनला शिकायला गेलो.पण कुठेच कुणी आडनाव आणि त्यावरून जात विचारली नाही किंवा त्याची त्यांना गरजच वाटली नसावी. कारण मला माझ्या राजेश याच नावाने बोलले आणि ओळखले जायचे.​

माझ्याबरोबर काम करणारे अनेकजण दक्षिण भारतातील होते. त्यांच्याकडे तर आडनाव ही पद्धतच नव्हती. त्यामुळे जात कोणती हा प्रश्नच मनात येत नसे किंवा कुणी विचारत नसे. तिथे 'महाराष्ट्रीयन', ' कन्नडा', तमीळ इ.पुरेसे असायचे. पुढे लंडनला गेल्यानंतर एशियन पुरेसे असायचे. फारतर 'Indian' एवढीच कधीतरी चौकशी व्हायची. white, Brown, Black अशी कुजबुज कानावर येत असे कधीकधी, मी “व्हाईट”(गोरा) नाही असा विचार यायचा मनात कधी कधी. पण त्यामुळे त्रास झाला असे काही आठवत नाही. पुढे मी नायजेरियात गेलो आणि तिथे मला चक्क 'व्हाईट मॅन ' मास्टर असं काहीस संबोधण्यात येत असे. इंग्लंडमध्ये काळा असणारा मी आफ्रिकेत पांढरा झालो!!! तिथे आडनावापेक्षा रंगाने उजळ ही ओळख जास्त महत्वाची होती. चौकशी फारतर 'इंडियन का? एवढीच!

महाराष्ट्रात आडनाव-जात, देशात साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, परदेशात वर्ण, एशियन, BROWN, BLACK AFRICAN , त्वचेचा रंग पांढरा, काळा, गव्हाळ इ. वर्ण आणि धर्म यामध्ये विभागलेली हाडामासाची रक्ताची माणसं बघताना मन अस्वस्थ होते.

नायजेरियातील काम संपवून मी पुण्यात कामाला सुरुवात केली आणि जातीपातीमधील अंतर खूपच असल्याचे मला जाणवले. सगळ्यात सुरुवातीला विचारले जायचे ते आडनाव ! मी म्हणायचो,' कापसे.' उत्तर असायचे "अरे वा!आमच्यापैकीच ?" तरीपण माझी जात कोणती? हा प्रश्न अनेकांना होता. बरेचजण हा प्रश्न विचारायचेच. पुण्यात काम करताना तिथल्या एका मित्राला मी त्यांच्याच जातीचा आहे असे वाटायचे. तो सर्वांना अभिमानाने सांगायचा, 'हे आपल्यापैकीच आहेत बरं का ?                                   एकदा माझे आत्ये मामा त्यांच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आले होते. साहजिकच वार्डमधील नर्सला मी त्याबद्दल सांगितले. त्यांचे आडनाव बघताच मी कोणत्या जातीचा आहे याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. नंतर काहीजणांनी तर स्पष्टच विचारले," तुम्ही 'कापसे' मात्र तुमचे आत्ये — कसे? तुम्ही जात नक्की काय?" मला मात्र या प्रकाराचा वीट आला होता.मी उत्तर दिले," मी आर्य समाजी हिंदू आहे. आमच्यात जातीभेद नसतो." ते शांत झाले.   

पुण्यातच पुढे अजून एक गमतीशीर प्रसंग घडला. एकाने विचारले, तुम्ही कापसे म्हणजे देशावरचे का? तुमचे गोत्र काय? मी म्हणालो, "देवरात" . तो पुढे म्हणाला, “तुम्ही देशावरचे असे म्हणता. अहो देवरात हे गोत्र तिकडे नसते. जरा शोध घ्या. तुम्ही कण्व असाल." आधी धर्म, मग आडनाव, त्यावरची जात, मग त्याची उपजात, मग गोत्र, गोत्रावरून उपजातीची नको ती चौकशी हा किळसवाणा प्रकार अस्वस्थ करून गेला. गरज होती का त्याची ? 

माझे आडनाव आणि त्यावरून जात विचारणाऱ्या सर्वांना नंतर मी नम्रपणे सांगायला सुरुवात केली," मी आर्य समाजी हिंदू आहे किंवा भागवत संप्रदायाचा आहे “ हे सांगितल्यानंतर हल्ली फार कुणी चौकशीच्या फंदात पडत नाही आणि मी माझी आडनाव आणि जात यातून सुटका करून घेतली आहे ती कायमची.

पण काही वर्षांपासून एक नविन जातीभेद मी अनुभवत आहे..तुम्ही “डॅा. कापसे का? म्हणजे नेमके काय…BAMS, BHMS, DHMS की MBBS! मी त्यावर एक रामबाण उपाय शोधला आहे. माझ्या WhatsApp वरील DP वर सरळ “राजूभाई BAMS” असे लिहिले आहे…

-राजेश कापसे,

९८१९९१५०७०

deepakniramay@gmail.com

Sunday, January 5, 2025

मॅनजेमेंटचे कानमंत्र देणारे माझे गुरु : कर्नल डॉ मदन देशपांडे

२०११ मध्ये मी नुकताच लंडनहून शिक्षण घेऊन परत आलो होतो. मध्यप्रदेशातील सेवासदन आय हॉस्पिटल मध्ये एका कॉन्फरन्ससाठी गेलो असताना माझी ओळख मैत्रीच म्हणा ना कर्नल डॉ. मदन देशपांडे सरांबरोबर झाली. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. भोपाळहून मुंबईला परत येत असताना आम्ही बरोबरच निघालो.दोघांचे विमानही एकाच वेळेस होते. सर अग्निहोत्र न चुकता दररोज करतात हे मला कळले. त्यांना अग्निहोत्राबद्दल विचारले. ते कसे करायचे हे सरांनी समजावून सांगितले आणि क्षणार्धात त्यांच्याजवळ असलेले अग्निहोत्र पात्र आणि इतर अग्निहोत्राचे साहित्यही दिले. मला खूप आश्चर्य वाटले. मी त्यांना म्हणालो, "सर, इतक्या लवकर तुम्ही तुमच्या जवळचे अग्निहोत्र पात्र आणि साहित्यही मला दिलेत?" सर म्हणाले, "अरे, चांगल्या कामाला उशीर कधी करू नये.तू तयारी दाखवलीस, अगत्याने चौकशी केलीस. मग तुला ते दररोज करायचे असेल आणि मी तुला त्यात मदत करू शकत असेन तर तो निर्णय क्षणार्धात व्हायला हवा." मी One minute Manager हे पुस्तक वाचले होते पण त्याचा प्रत्यय आला!

नंतर सर व्हिजन २०२० चे अध्यक्ष झाले आणि परत एकदा माझी त्यांची भेट दिल्ली विमानतळावर झाली. मी जरा चिंतेत असल्याचे सरांना जाणवले. आम्ही दोघेही एकाच कॉन्फरन्सला जात होतो. मग एकाच कारमध्ये निघालो. जातांना त्यांनी सहज चौकशी केली, "काय झाले राजेश?" मी माझ्या अडचणी सांगितल्या. त्यांनी मला अत्यंत महत्वाचे डिप्लोमसीचे तत्व सांगितले. म्हणाले, "राजेश एक श्लोक लक्षात ठेव. दुष्ट तोचि ओळखावा, परी कळोची न द्यावा. महत्व देवोनी वाढवावा वेळोवेळी. राखावी बहुतांची अंतरे, फळ येती तदनंतरे." "हे बघ, कुठेही काही करताना सगळ्यात आधी तिथे दुष्ट कोण आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याला महत्व हवे असते.ते त्याला द्यायचे. त्याला मोठे म्हणायचे.त्यानी आपले काही बिघडत नाही. किमान तो आपल्या बाजूने होतो आणि बऱ्याच अडचणी टळतात. अनेकांची अंतरे म्हणजे मने राखावी लागतात आणि मग यश मिळते. बघ हे सूत्र वापरून नक्की उपयोग होईल." मी त्यांच्याकडून दुसरे महत्वाचे व्यवस्थापनाचे सूत्र शिकलो.

नंतर मी नायजेरियाला गेलो आणि एक दोन वर्षे सरांची भेट झाली नाही. फोनवर बोलणे होत असत. मी नायजेरियाहून परत यायचे ठरवले तेव्हा सरांना फोन केला. क्षणाचाही विचार न करता ते म्हणाले, 'जॉईन हो एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलमध्ये सी.इ.ओ म्हणून. संध्याकाळपर्यंत मला माझे नियुक्ती पत्र त्यांनी ई-मेल केले होते. सरांसोबत काम करण्याची सुवर्ण संधी मला मिळाली होती. मी ती स्वीकारली आणि पुण्याच्या एच. व्ही.देसाई आय हॉस्पिटलमध्ये सी.इ.ओ म्हणून रुजू झालो. तो शनिवारचा दिवस होता. माझ्या जॉईनिंग फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या. त्यांनी मला केबिन दिली. मग मी दुपारी त्यांना भेटलो. ते म्हणाले, 'अरे मुंबईला तुझे कुटुंब वाट बघत असेल.अनेक वर्षांनी परदेशातून परत आला आहेस. काही दिवस त्यांच्या सोबत घालव, मग ये आणि काम सुरु कर." आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी, गरजा ओळखून त्याने काही विचारण्याच्या आत त्याला मदत केली पाहिजे आणि कामाबरोबर कुटुंबही तितकेच महत्वाचे असते हे प्रत्येक प्रमुखाने लक्षात ठेवले पाहिजे हे व्यवस्थापनाचे तिसरे तत्व मी शिकलो. पुढे काम करताना कुणी कर्मचारी नीट वागला नाही तर त्याला लगेच मेमो देण्याऐवजी त्याची अडचण समजून घेण्याची सवय मी स्वतःला लावून घेतली. सरांनी ते वळण लावले.अत्यंत खेळीमेळीचे सहज वातावरण त्यांनी एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये तयार केले होते. जिथे कामासोबतच व्यक्तिगत आयुष्यही तितकेच महत्व होते.

कर्मचाऱ्यांना रजा न देण्याचा माझा स्वभाव होता. त्यांना कुणीतरी हे सांगितले. त्यांनी मला बोलावून घेतले आणि म्हणाले, "राजेश, जर कुणी रजा मागितली ती कधी नाकारायची नाही. कारण तो कर्मचारी काहीतरी कामासाठी रजा घेत असतो. रजा नाही दिलीस तर, तो काम नीट करणार नाही आणि हो जर कुणी राजीनामा दिला तर तोसुद्धा नाकारायचा नाही. त्याला शुभेच्छा देऊन मार्गस्थ करायचे. कारण जो राजीनामा देतो तो नंतर कधीच आनंदाने काम करत नाही." मी व्यवस्थापनाचे चवथे तत्व शिकलो.

सरांना कुठली परवानगी मागितली तर ते काही सेकंदात हो किंवा नाही असा निर्णय देत असत. त्यांना विचारणे मात्र गरजेचे असे. त्यांना त्याबद्दल एकदा विचारले. ते म्हणाले, 'बघ, उगाच ताटकळत कुणाला ठेवायचे नाही. तुला अधिकारी म्हणून तुझ्यासोबत असणारे सहकारी काय करणार आहेत हे माहीत असलेच पाहिजे. कारण शेवटी तू जबाबदार असणार आहेस परिणामांसाठी!" हे व्यवस्थापनाचे पाचवे तत्व त्यांनी शिकवले.

"बाप दाखव नाही तर श्राद्ध कर!" हे त्यांचे खूप आवडते तत्व. जो परिणामकारकता सिद्ध करेल त्यालाच अधिकार मिळतील. फक्त बडबड करून काहीच उपयोग नाही. स्वतःला सिद्ध करता आले पाहिजे. पुढे सरांनी मला NABH चे काम दिले आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारही दिले. त्यांच्या पाठींब्यामुळेच मी ते अवघड काम केवळ ९ महिन्यात पूर्ण करू शकलो. हे काम करताना मध्ये एक वेळ अशी आली होती की, काही कारणांनी ते मिळणार नाही. मी सरांना फोन केला. सर म्हणाले, "ठीक आहे. नाही मिळाले तर नाही. विसरून जा. दुसऱ्या कामाला लाग. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या. तू प्रयत्न केलेस हे मला माहिती आहे. ते कधीच वाया जाणार नाहीत. जो काही ८-९ लाख खर्च झाला आहे, त्याबद्दल ट्रस्टीना मी उत्तर देईन!" मी अवाक झालो आणि व्यवस्थापनापलीकडेही माणूस महत्वाचा असतो हे व्यवस्थापनाचे सहावे तत्व मी त्यांच्याकडून शिकलो. मी परत जोमाने कामाला लागलो आणि पुढे काही दिवसातच आम्हाला NABH मिळाले.

NABH मिळाले म्हणून सरांनी सर्व ट्रस्टीना बोलावून मोठा कार्यक्रम ठेवला आणि माझा सत्कार केला. नंतर गमतीने म्हणाले, "एखादे काम पूर्ण व्हायचे असेल तर चार शहाण्यांसोबत एक मेहनत करणारे गाढव असावे लागते." आम्ही दोघेही खूप हसलो आणि मी व्यवस्थापनाचे सातवे आणि महत्वाचे तत्व शिकलो.

करोना साथीनंतर मी एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल सोडून मुंबईला परत जाण्याचा निर्णय घेतला आणि सरांना ते सांगायला गेलो. त्यांच्या व्यवस्थापन तत्वानुसार त्यांनी "शुभास्ते पंथानःअस्तु!" म्हणून आशीर्वाद दिला. भारतातील नेत्र आरोग्य विषयातील एका उत्तुंग गुरुकडून मी खऱ्या अर्थाने व्यवस्थापनाची मौल्यवान तत्व शिकलो आणि आजही त्याचा उपयोग माझ्या दररोजच्या कामात होतो. सर आजही तितकेच उत्साहात मला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याकडून नवनवीन तत्व शिकायला मिळतात.अशी आयुष्यातील मौल्यवान तत्व शिकवणाऱ्या गुरूंना माझे प्रणाम!

-राजेश कापसे