कॉलेजमध्ये असताना हिरो चित्रपटातील फेमस धून मी बासरीवर वाजवायला शिकलो होतो.तेव्हापासून बासरी हे वाद्य आवडायला लागले. कधीतरी ते शिकू असे तेव्हा ठरवले होते. योग,प्रारब्ध,वेळ यावी लागते.या सर्व गोष्टींवर माझा खूप विश्वास आहे. त्याचे कारणही तसेच आहे. बासरीवर हिरोची धून मी १९९६ ला शिकलो आणि नंतर अनेक वर्ष साधारणतः २००१ पर्यंत बासरी शिकणे काही झाले नाही. अचानक २००१ मध्ये एक दिवस मी माझे डॉ. हेडगेवार रुग्णालयातील काम संपवून घरी जात असताना माझ्या बहिणीकडे गेलो असता माझा भाचा अश्विन बासरीवर सा रे ग मा वाजवत असताना मी ऐकले. हा नक्की कुठेतरी बासरी शिकत असेल असे वाटले आणि क्षणाचाही विलंब न करता मी त्याला विचारले, 'कुठे शिकतोस बासरी? मलाही शिकायची आहे." अश्विन म्हणाला, "मामा, आपल्या घराजवळच पंडित श्रीपाद कुलकर्णी रहातात 'सुरश्री' बंगल्यात. मी त्यांच्याकडे बासरी शिकतो. चल एक दिवस माझ्यासोबत." त्याच दिवशी संध्याकाळी मी गुरुजींकडे गेलो.
गुरुजींच्या 'सुरश्री' बंगल्यात शिरताना बासरीचे सुंदर स्वर ऐकू येत होते. दरवाजा उघडाच होता. अश्विनने माझी ओळख गुरुजींबरोबर करून दिली. मी गुरुजींच्या पाया पडलो. त्यांनी चौकशी केली, 'काय डॉक्टर, कुठे प्रॅक्टिस करता. बासरी शिकायची आहे? बरं..." त्यांनी मला एक बासरी दिली आणि म्हणाले, 'जरा वाजवून दाखवा." मी हिरो चित्रपटातील माझी आवडती धून वाजवून दाखवली. म्हणाले, 'ठीक आहे. उद्यापासून या. सकाळी ७ वाजता येताना पेन आणि फुलस्केप वही घेऊन या.' मी दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो. गुरुजींच्या पाया पडलो. त्यांनी माझी वही घेतली आणि त्यावर llश्रीll असे स्वतः लिहिले आणि ती माझ्याकडे दिली. मला बासरी हातात घेऊन वाजवायची घाई होती. गुरुजींनी मला थांबवले. "डॉक्टर, आधी थेअरी नीट समजून घ्या. नंतर बासरी हातात घ्या." त्यांनी मला ५० अलंकार, सर्व थेअरी लिहून घ्यायला सांगितले. लिहून झाल्यानंतर सगळ्यात प्रथम अलंकारांचा रियाज करण्याचे वेळापत्रक माझ्या वहीत लिहून दिले. सोमवार : १ ते १० अलंकार, बुधवार --१० ते २०, शुक्रवार - २० ते ३० . मग A स्केलची बासरी दिली आणि 'सा' वाजवायची प्रॅक्टिस करायला सांगितले आणि त्या दिवशी मी सा रे ग म प ध नी सा वाजवायला शिकलो. गुरुजी म्हणाले, 'डॉक्टर, 'सा म प' या सुरांवर लक्ष द्या. अलंकारांची भरपूर प्रॅक्टिस करा. अलंकार पक्के झाले पाहिजेत. मग पुढे जाऊ." मी अलंकार वाजवायला शिकलो. माझे अलंकार ऐकून गुरुजी म्हणाले, "डॉक्टर, पंचम मजबूत वाजला पाहिजे. प्रयत्न करा, नक्की जमेल. अलंकार चांगले वाजवताय पण ते सर्व लयीत वाजवता आले पाहिजेत. अलंकार पक्के करा त्यातच सर्व आहे." माझे अलंकार चांगले तयार झाले आणि मग गुरुजींनी मला स्वतः तयार केलेल्या A आणि E स्केलच्या बासऱ्या दिल्या. मग त्यांनी राग शिकवायला सुरुवात केली. राग कसा वाजवायचा हे समजावून सांगताना गुरुजी सांगत, "डॉक्टर, जेवण करताना ताटात भाजी असते.चटणी असते. कोशिंबीर असते. लोणचे असते. खूप काही गोडधोड असते, पोळी, वरण, भात आपण ते चव घेऊन त्याचा आस्वाद घेऊन खात असतो. तसेच रंगाचे असते. आलाप, अस्थायी, अंतरा मग परत अस्थायी मग काही लहान ताना, मिश्र ताना, मोठ्या ताना, झाला असा आनंद घेत राग वाजवायचा. मग त्यात रंगात येते." काही महिने भूप शिकल्यानंतर त्यांनी हंसध्वनी, दुर्गा, वृन्दावनी सारंग, मालकंस असे अनेक राग शिकवले. मला बासरीत चांगली गती यायला लागली होती. गुरुजी म्हणायचे, 'डॉक्टर, आता तुम्हाला मी माझ्यासोबत कार्यक्रमांना साथ देण्यासाठी घेऊन जाईन." ते माझ्यासाठी सर्वात मोठे प्रशस्तीपत्र होते. पण प्रारब्धात काही वेगळे लिहिले होते. मी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील नोकरी सोडली आणि मुंबईत आलो आणि बासरी पासून दूर गेलो.
एकदा पुण्यात डॉ.अनिल अवचट यांच्याकडे गेलो असता त्यांच्या बासऱ्या बघितल्या आणि त्यांना म्हणालो, "बाबा, बासरी वाजवू का?" त्यांनी बासरी दिली. इलेक्ट्रॉनिक तंबोरा सुरु केला आणि म्हणाले वाजव. मी भूप वाजवला. अनेक वर्षांनी बासरी वाजवत होतो. ते म्हणाले, "अनेक वर्षांनी वाजवतो आहेस का? चांगली वाजवलीस." मग बाबानी बासरी वाजवली. मी तल्लीन होऊन गेलो. मी विचारले, 'बाबा, तुझ्यासारखी बासरी मला कशी वाजवता येईल?" बाबाचे उत्तर खूप सुंदर होते, "हे बघ राजेश, बासरी वाजवताना एका सुरांतून अलगद दुसरा सूर निघाला पाहिजे अगदी सहज सावकाश.मग त्यात सुंदरता येते. बघ प्रयत्न करून".मी मुंबईत परत आलो आणि अनेक वर्षांनी बासरीचा रियाज सुरु केला. नंतर जेव्हा जेव्हा बाबाकडे जायचो तेव्हा बासरी वाजवायचो आणि बाबाची बासरी ऐकायचो. एका सुरांतून दुसऱ्या सुरापर्यंतचा अलगद प्रवास आणि त्यातील गोडवा मी बाबाकडून शिकलो.
मुंबईच्या धावपळीत बासरी वाजवण्यात सातत्य मात्र राहिले नाही. त्यावेळी "ऑनलाईन" हा प्रकार फारसा नव्हता. त्यामुळे पंडित श्रीपाद कुलकर्णी गुरुजींकडून बासरी शिकणेही शक्य नव्हते आणि कल्याण ते मालाड दररोजचा प्रवास करून दुसरे काहीच करणे शक्य नव्हते. मग लंडन,नायजेरिया असा शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने बराच प्रवास झाला. त्यामुळे बासरी थोडी बाजूला पडली. पण अधून मधून वाजवायचो. अनेक वर्ष निघून गेली आणि कोरोनाच्या काळात परत बासरी शिकायचे ठरवले. माझ्या एका मित्राकडे पंडित रोणु मजुमदार सरांचा फोन नंबर होता. तो त्याच्या कडून घेतला आणि पंडितजींना फोन केला.ते म्हणाले तुमचं रेकॉर्डिंग मला पाठवा. मग कळवतो. माझे हंसध्वनी रागाचे रेकॉर्डिंग त्यांना पाठवले आणि त्यांचे एक दोन दिवसांनी उत्तर आले, 'राजेश, मै आपको सिखाऊंगा." पंडितजींकडून बासरी शिकायला मिळणार या कल्पनेनेच मी सुखावून गेलो. मग पंडितजींनी माझे ऑनलाईन क्लास सुरु केले. माझी ओळख त्यांनी संगीतातील दहा थाटांबरोबर करून दिली आणि माझ्याकडे असलेले ५० अलंकार या दहा थाटांत वाजवायला सांगितले. आता मला ५०० अलंकारांचा रियाज करायचा होता. मी खूप अभ्यास केला आणि या दहा थाटांची चांगली तयारी झाल्यानंतर पंडितजींनी मला गायकी अंगाने बासरी कशी वाजवायची ते शिकवले. पुढे तीन वर्ष मी सातत्याने त्यांच्याकडून बासरी शिकलो आणि काही राग उत्तम तयार झाले. मी वाजवलेला यमन राग ऐकून पंडितजी म्हणाले, "राजेश ये स्टेज जानेके लायक हो गया है. वा!बहोत सुंदर!" माझ्यासाठी हे दुसरे महत्वाचे प्रशस्तिपत्रक मिळाले. कोरोना नंतर सगळे काही सुरळीत व्हायला सुरु झाले.लॉकडाऊन संपला आणि पंडितजींचे अनेक कार्यक्रम सुरु झाले आणि त्यांना वेळ मिळेनासा झाला. पण दोन तीन महिन्यात एक असा एखादा क्लास ते घेत. यावेळी मात्र मी ठरवले होते की बासरी शिकणे सुरु ठेवायचे.
इच्छा असली की मार्ग सापडतो.अर्थात ते नशिबातही असावे लागते. पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल मध्ये मी कामाला सुरुवात केली आणि आमच्या शेजारी असलेल्या शिव मंदिरात माझी भेट श्री भुरे सर यांच्याशी झाली. त्यांनी घरी चहासाठी बोलावले आणि त्यांच्या घरी मी तबला बघितला आणि त्यांना कुतूहलाने त्याबद्दल विचारले. ते म्हणाले, त्यांचा मुलगा श्री पांचाळ सर यांच्याकडे तबला शिकतो आहे आणि तो विशारदच्या परीक्षेची तयारी करत आहे. मी त्यांना बासरी बद्दल सांगितले. ते म्हणाले, "डॉक्टर गांधर्व विद्यालयाच्या परीक्षा द्या. अभ्यासही होईल आणि बासरी उत्तम शिकाल." मी श्री पांचाळ सर याना भेटून लगेच अर्ज भरला. सर म्हणाले, 'तुम्ही दुसरी परीक्षा देऊ शकता." मी दुसऱ्या परीक्षेचा सिलॅबस घेतला आणि तयारी सुरु केली. काही राग नवीन होते आणि ते शिकण्याची गरज होती. काय करावे असा मी विचार करत होतो. त्याच दिवशी माझ्या हॉस्पिटलमध्ये पनवेलमधील एक चार्टर्ड अकाउंटंट श्री पाटील सर आले होते. त्यांनी माझ्या केबिन मध्ये बासरी बघितली आणि म्हणाले, 'अहो माझे मित्र पंडित एकनाथ ठाकूर उत्तम बासरी वादक आहेत." मी क्षणाचाही विलंब न करता त्यांचा फोन नंबर घेतला आणि पनवेलच्या मिडल क्लास कॉलोनीतील त्यांच्या घरी गेलो.
पंडित एकनाथ ठाकूर सरांकडे खूप विद्यार्थी बसले होते आणि ते त्यांना बासरी शिकवत होते. मी सरांच्या पाया पडलो. त्यांनी E स्केलची बासरी दिली आणि मला वाजवायला सांगितले. मी यमन वाजवला. सर म्हणाले, "या डॉक्टर. आपण दुसऱ्या परीक्षेची उत्तम तयारी करू. दोन महिनेच आहेत आपल्याकडे, पण काळजी करू नका मी शिकवीन तुम्हाला." त्यांचा प्रेमळ आणि आश्वासक स्वभाव मला आत्मविश्वास देऊन गेला. पुढच्या दोन महिन्यात त्यांनी माझ्या कडून आठ राग तयार करून घेतले.ताल शिकवले. खमाज रागातील "वैष्णव जन तो .." हे भजन शिकवले आणि परीक्षेची तयारी पूर्ण झाली. मी सरांचे आशीर्वाद घेऊन परीक्षेला गेलो. परीक्षा उत्तम झाली आणि मी विशेष प्राविण्यासह परीक्षा पास झालो. बासरीचे शिक्षण पंडित एकनाथ ठाकूर सर आणि कधी कधी पंडित रोणू मजुमदार सर यांच्याकडे सध्या सुरु आहे. कण स्वर, आलाप, विलंबित ख्याल आणि अनेक नवीन राग शिकतोय. पंडित एकनाथ ठाकूर सर संगीतातील क्लीष्ट रचना सहज करून शिकवतात. बासरी वाजवताना त्यात सौंदर्य कसे आणायचे, त्यात कण स्वर कसे वाजवायचे हे शिकताना मी स्वतःला विसरून जातो. मन विचारशून्य होते. ताण कुठे निघून जातो ते कळतही नाही. सर म्हणतात, "डॉक्टर, बासरी सुंदर वाजवण्यासाठी मनही सुंदर होणे गरजेचे आहे. राग, अहंकार बाजूला ठेवला तरच बासरीवर राग चांगला वाजवता येतो." सरांच्या प्रेमळ स्वभावाचा आणि त्यांच्या सुरेल स्वरांचा मी आनंद घेतो आहे. अलंकार पर्यंत शिक्षण पूर्ण करायचे ठरवले आहे. प्रारब्धात असेल तर हा संकल्प नक्की पूर्ण होईल!