मी नायजेरियामध्ये कार्यरत असताना, साधारण 2014 च्या सुमारास, खुप अस्वस्थ होतो. त्या काळात सतत असं वाटायचं की आपण ध्यानधारणा करावी, स्वतःला थोडं सावरावं, मन शांत करावं. त्याच दरम्यान मी नुकताच एक नवीन आयफोन घेतला होता आणि त्यातील विविध ॲप्स वापरायला सुरुवात केली होती.
माझा एक सहकारी मित्र – डॉक्टर खलिल मोहम्मद – अत्यंत टेक्नो-सॅव्ही होता. मी त्याला विचारलं, “मला ध्यानधारणा करण्यासाठी एखादं चांगलं ॲप सांगशील का?” त्याने क्षणाचाही विलंब न लावता ‘Headspace’ नावाचं अमेरिकन मेडिटेशन ॲप App Store मधून डाऊनलोड करायला सांगितलं. त्यानंतर मी नियमितपणे ध्यानधारणा करायला सुरुवात केली.
या ध्यानधारणेमध्ये एक अतिशय सुंदर ‘इमॅजिनेशन-बेस्ड मेडिटेशन’ पद्धत शिकवली जात होती. डोळे मिटून, सुर्याचा प्रकाश, ऊर्जा, शांतता यांची कल्पना करायला सांगितली जायची. सुर्याचा प्रकाश जेल च्या स्वरूपात संपूर्ण शरीरात अलगद पसरतो आहे आणि मन आणि शरीर शांत, तेजोमय आणि प्सर होते आहे. हे करत असताना मला सहज एक विचार आला—आपण गायत्री मंत्राचा अर्थ कधी नीट समजून घेतलाच नाही.
लहानपणी माझी मुंज झाली होती. त्यानंतर अनेक दिवस आमच्याकडे भटजी येत असत. ते मला सकाळ-संध्याकाळ स्नान, संध्या आणि गायत्री मंत्र म्हणायला शिकवत. मी नियमितपणे गायत्री मंत्र म्हणायचो; पण वयाच्या तब्बल ४२ व्या वर्षापर्यंत त्या मंत्राचा नेमका अर्थ काय आहे, हे मला कधीच माहीत नव्हतं.
त्या दिवशी ध्यानधारणा झाल्यानंतर मी गायत्री मंत्राचा अर्थ वाचला आणि अक्षरशः थक्क झालो. कारण ‘सूर्याचे तेज आपल्या शरीरात आणि मनात पसरत आहे’ अशी जी कल्पना त्या मेडिटेशनमध्ये होती, तीच कल्पना गायत्री मंत्राच्या अर्थामध्ये होती. तेव्हा मला जाणवलं की आपल्या परंपरेत, संस्कारांमध्ये गायत्री मंत्राच्या रूपाने आपल्याला ध्यानधारणाच शिकवली गेली होती—फक्त आपण त्याचा अर्थ समजून घेतला नव्हता.
“ॐ भूर्भुवः स्वः” म्हणजे पृथ्वी, आकाश आणि अंतरिक्ष—संपूर्ण सृष्टी व्यापणारे परम तत्त्व.
“तत्सवितुर्वरेण्यम्” म्हणजे ते परम तेजस्वी, सूर्यरूप तत्त्व.
“भर्गो देवस्य धीमहि” — जे पाप, अंधार आणि नकारात्मकता नष्ट करतं, अशा त्या सूर्यदेवतेचं आपण ध्यान करतो.
“धियो यो नः प्रचोदयात्” — ज्यामुळे आपली बुद्धी प्रकाशित व्हावी, प्रबुद्ध व्हावी.
जर हा अर्थ मला लहानपणीच समजला असता, तर मुंज झाल्यापासून आजपर्यंत मी खऱ्या अर्थाने ध्यानधारणा केली असती. कदाचित माझं मन एका वेगळ्याच पातळीवर पोहोचलं असतं.
माझा दुसरा आवडता मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र.
पुण्याच्या एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये काम करत असताना आमचे चीफ मेडिकल डायरेक्टर कर्नल देशपांडे हे नियमितपणे अग्निहोत्र करायचे. त्यांनी मला ते करायला शिकवलं. अग्निहोत्राच्या सुरुवातीला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर आहुती द्यायची.
या मंत्राबद्दल अनेक गैरसमज माझ्या मनात होते. काही लोक म्हणायचे की हा मंत्र म्हटला की मृत्यूशय्येवरचा माणूसही वाचतो, किंवा हा मंत्र म्हटला की माणूस कधी मरतच नाही. पण जेव्हा मी या मंत्राचा खरा अर्थ समजून घेतला, तेव्हा तो अधिकच सुंदर वाटला.
“ॐ त्र्यंबकं यजामहे” — त्या त्रिनेत्रधारी शंकराची आपण उपासना करतो.
“सुगंधिं पुष्टिवर्धनम्” — जो जीवनात सुगंध, पोषण आणि समृद्धी आणतो.
“उर्वारुकमिव बन्धनान्” — जसं पिकलेला भोपळा वेलीपासून अलगद सुटतो,
“मृत्योर्मुक्षीय मामृतात्” — तसंच मी आयुष्य पूर्ण, परिपक्व झाल्यावर या जीवनरूपी बंधनातून मुक्त व्हावं; अकाली मृत्यू नको, पण मोक्ष हवा.
हा अर्थ कळल्यानंतर हा मंत्र माझ्यासाठी भीतीचा नव्हे, तर स्वीकाराचा, परिपक्वतेचा आणि मुक्तीचा मंत्र झाला.
माझा तिसरा आवडता मंत्र म्हणजे —
“ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु ।
मा विद्विषावहै ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः”
लहानपणी मला वाटायचं की हा मंत्र फक्त जेवण चांगलं व्हावं म्हणून म्हणतात! किती गैरसमज असतात आपल्याला मंत्रांबद्दल. पण जेव्हा मी याचा अर्थ समजून घेतला, तेव्हा जाणवलं की हा मंत्र गुरु-शिष्य नात्यासाठी, कुटुंबासाठी, संघासाठी, सहजीवनासाठी आहे.
आपण एकत्र अभ्यास करू, एकत्र काम करू, एकमेकांना सामर्थ्य देऊ, एकमेकांमध्ये तेज निर्माण करू आणि आपल्यात कुठलाही द्वेष, मत्सर किंवा किल्मिष राहू नये—हा त्याचा खरा अर्थ आहे.
त्यामुळे आज मी प्रत्येक भाषणाच्या, प्रत्येक मीटिंगच्या सुरुवातीला हा मंत्र म्हणतो आणि त्याचा अर्थही सांगतो.
हे तीन मंत्र—
गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र आणि ॐ सह नाववतु मंत्र—
जर तुम्ही अर्थ समजून, मन लावून रोज उच्चारले, तर त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या जीवनात जाणवेल.
-राजेश कापसे
९८१९९१५०७०
rajeshdrkapse@zohomail.in