काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपलं आयुष्यच बदलून जातं. २००५ मध्ये मी संभाजीनगरच्या (औरंगाबाद) सार्वजनिक वाचनालयात काही पुस्तकं शोधत होतो आणि पुर्णिया हाती लागलं आणि दिवसभरात ते मी वाचून संपवलं. मला त्यातली सहज सरळ लिखाणाची शैली इतकी आवडली की त्यानंतर महिन्याभरात डॅा. अनिल अवचटांची त्या वाचनालयातील सगळी पुस्तकं वाचून काढली. आणि पुण्यात जावून त्यांना एकदा भेटायचं ठरवलं.
एवढा मोठा माणूस मला भेटेल का? किती वेळ देईल? जरा मनात भीती होतीच. त्यांचा फोन नंबर शोधायला सुरुवात केली.माझ्या विद्यार्थी परिषदेतील मित्र रत्नाकर पाटील यांनी त्यांचा नंबर मला दिला. फोन केला तो त्यांनीच उचलला.काय बोलावे सुचेना, मी म्हणालो तुम्हाला भेटायचे आहे. त्यांनी सांगितलं, “अरे मी आज जरा व्यस्त आहे, तू उद्या सकाळी ये ८ वाजता.” घराचा पत्ता दिला. माझं जवळचं कुणीतरी माझ्याशी बोलत आहे असं वाटलं. काही माणसांशी आपण क्षणात जोडले जातो.
भेटल्यानंतर ते म्हणाले, “ मला तू ए बाबा म्हण!” मला संकोचाने एवढ्या मोठ्या व्यक्तीला अरेतुरे कसे म्हणायचे ते कळेना.त्यांनी दहा वेळा तसं म्हणवून घेतलं आणि मी त्यांचा जवळचा मुलगा झालो कायमचा! माझे वडील मी लहान असतांनाच वारले. अनेक वर्षांनी बाबा मिळाला. मग आम्ही खूप गप्पा मारल्या.त्यांनी बासरी वाजवली. मी ही बासरी शिकायचो. मी भुप वाजवायचा प्रयत्न केला. न कंटाळता त्यांनी तो ऐकला आणि म्हणाला, ‘एक सुर वाजवल्यानंतर त्यातूनच सहज दुसरा सुर लागला पाहिजे,अगदी अलगद.बघ प्रयत्न कर !’ मी त्या भेटीत खुप काही शिकलो.त्यांना संभाजीनगरला (औरंगाबादला) आलात की नक्की या म्हणालो. त्यांनी ओरिगामीने तयार केलेला मोर मला दिला. ते संभाजीनगरला (औरंगाबादला) एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर अनेकजण त्यांच्या बरोबर होते. मी त्यांना 'बाबा मी राजेश 'असं म्हणालो. त्यांनी जवळ घेतलं. हा माझा मुलगा राजेश !अशी ओळख करून दिली.’ ते रूग्णालय बघायला आले. सगळ्यांशी गप्पा झाल्या.माझ्या घरीही आले. एवढा मोठा माणूस पण कुठलाही अहंभाव नाही.
हेडगेवार रूग्णालयाच्या वतीने मी त्सुनामी मदत कार्यासाठी अंदमानला जातोय असे त्यांना सांगितले. लगेच त्यांनी मला त्याच्या ओळखीच्या आय.पी.एस. अधिकाऱ्याचा नंबर दिला.मी तिथे येतोय, त्याला काही मदत लागली तर नक्की करा असेही सांगितले. मी अंदमानला गेल्यानंतर त्या पोलिस अधिक्षक मॅडम मला घ्यायला आल्या!
काही वर्षांनंतर मी माझी नोकरी सोडायचा निर्णय घेतला आणि मुंबईत जायचे ठरवले. मला मुंबईत काम काही जमत नव्हते. मी खूप निराश झालो. डिपरेशनमध्ये गेलो. बाबाला फोन केला. त्याने मला पुण्याला बोलावले.मला त्याच्या गाडीत स्वत: ड्राईव्ह करत एका जवळच्याच डोंगरावर घेऊन गेला. भरपूर गप्पा मारल्या. डॉ.आनंद नाडकर्णींचा मला नंबर दिला. त्यांना फोन करून माझी काळजी घ्यायला सांगितले. म्हणाला, “ डॅा. आनंदला भेट, आनंदी होशील.” मी बरा झालो.मग प्रमोशन झालं. परदेशात गेलो. माझ्या करिअरमध्ये खुप प्रगती केली.
एकदा माझ्या जवळच्याच मित्राने मला फसविले. मी खूप अस्वस्थ होतो. बाबाला फोन केला. त्याने एक सुंदर दोहा सांगितला, “जावे सो मेरा नहीं मेरा सो जावे नही”.
मागच्या १७ वर्षांत अनेकवेळा अनेक चढउतारांमध्ये बाबाकडे गेलो. त्याला भेटलं की एक नवीन उत्साह, नवीन एनर्जी मिळायची.
कांही वर्षां पूर्वी मी बाबाला फोन केला होता. त्याचा आवाज खूपच थकलेला जाणवला. मी म्हणालो, “बाबा, मी राग भैरव शिकलो आहे, वाजवू का?” ‘जागो मोहन प्यारे 'ही बंदिश मी वाजवली. तो म्हणाला, “वा ! वा! छान वाजवलीस. मला नक्की पाठव.”
दोन दिवसांनी कळले की, बाबा गेला.काही माणसं ही परिसासारखी असतात. त्यांच्या स्पर्शाने सोनं होतं. माझ्यासारख्या असंख्य मुलांची आयुष्य बाबानी घडवली. Baba We miss you!
-राजेश कापसे, 9819915070
deepakniramay@gmail.com